परीक्षांचा पाठलाग?

Last Updated: May 23 2020 8:00PM
Responsive image


वैजनाथ महाजन 

शालेयस्तरावरील असंख्य परीक्षांपासून विविध स्पर्धा परीक्षा आणि केंद्रीयस्तरावरील तितक्याच परीक्षांबाबत फार मोठे प्रश्नचिन्ह उभे राहणे हे प्राप्त परिस्थितीत स्वाभाविकच आहे. संपूर्ण देश अत्यंत आपत्कालीन अशा आणीबाणीच्या काळातून जात असताना आता आपल्या तमाम सार्‍या परीक्षांचे काय होणार, असे भलेमोठे प्रश्न सार्‍याच परीक्षांर्थीसमोर उभे राहणे व त्यावर समाधानकारक असा ठोस उपाय केव्हा समोर येतो, असा बिकट प्रश्न उभा राहणे ही बाब संबंधित सर्वांनाच परीक्षेची अपरिहार्यता रचित करणारी आहे. अर्थात, हे जरी अशा राष्ट्रीय आपत्तीच्या निमित्ताने उभे राहिलेले शैक्षणिक प्रश्नचिन्ह असले, तरी या आपल्या अनेक परीक्षांच्या अंमलबजावणीबाबत आणि एकूणच परीक्षा पद्धतीबाबत गेली अनेक वर्षे आपल्याकडे तशी चर्चा सुरूच असते. ही चर्चासुद्धा थेट परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्याव्यात ते परीक्षांची गरज, काळ अशा कक्षेत फिरत राहणारी अशीच असते.

आपल्याकडेच नव्हे, तर सर्वच प्रगत आणि प्रगतिपथावर असलेल्या देशांत शैक्षणिक वर्षाची समाप्ती परीक्षेनेच होत असते. कुठे परीक्षा काळात अभ्यास करण्याची पद्धत त्या तेथील शैक्षणिक तत्त्वानुसार सिद्ध झालेली असते, तर कुठे चक्क समोर प्रश्नच ठेवून त्यातून उत्तर नक्कलून काढण्यास मुभा देण्यात आलेली असते. यापर्यंत असे विभिन्न पर्याय परीक्षेसाठी खुले असतात; पण एकूणच परीक्षेइतकेच शैक्षणिक वर्ष अभ्यासपूर्ण बनविण्याकडे बहुतेक सार्‍या देशांचा कल असतो. हेच आजवर समोर आलेले आहे. 

आपल्याकडे शैक्षणिक वर्षाचे सर्वस्वच परीक्षा घेऊन बसल्याने परीक्षेला जीवन-मरणाच्या प्रश्नाइतके महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसले आहे. एकूण वर्षभर दिलेल्या विविध विषयांचे अध्यापन आणि त्या अध्यापनाचे संबंधित परीक्षार्थीला झालेले आकलन हे तपासून निश्चित करणे ही तशी अपरिहार्यताच असते आणि आहे. म्हणून परीक्षाच नकोत, हा विचार आपणास तसा नेहमीच आततायी वाटत आलेला आहे. यातच आणखी एक परिणाम समोर आला आणि तो म्हणजे गुणांकन पद्धतीतून निर्माण झालेली अत्यंत अनिष्ट अशी पद्धत. याला परीक्षा घेणारे व ती देणारे यांच्यापेक्षा पालक अधिक जबाबदार असल्याचे वेळोवेळी स्पष्ट होत आलेले आहे. आपली वार्‍यावर सुटलेली स्वप्ने आपल्या पाल्याकडून पूर्ण करून घेण्यासाठी आपले पालक आपल्या विद्यार्थी असलेल्या पाल्याला ठार परीक्षार्थी बनवत असतात. गुणानुक्रमे क्रमवारीत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींची यादी बनविण्याची पद्धत आपण अलीकडेच बंद केलेली आहे. तरीपण एकूणच आपल्या तमाम सार्‍या परीक्षांवर गुणांकनाचा वरचष्मा असल्याचे आजही दिसून येत आहे. यातून घोकमपट्टीचा थोर मार्ग अवलंबला जातो आणि तो शिक्षणातील जाणकारांना अनावश्यक वाटत असतो. 

विद्यार्थ्यांचे एकूण विषयाचे आकलन कसे समजून येणार, हा प्रश्न पुन्हा तसाच टांगलेल्या अवस्थेत राहत असल्याने मग गुणांच्या जागी श्रेणी प्रदान करण्याचा विचार समोर असल्याचे दिसते. प्रश्नच गुणांपेक्षा श्रेणीचाच विचार प्राधान्याने केला गेल्याचे आता समोर येत आहे; पण वर्षभर आपण परीक्षांचाच पाठलाग करणे म्हणजेच शिक्षण घेणे असे जर मानणार असू, तर नेमके काय सिद्ध होणार, असा प्रश्न आजच्या आपत्कालीन परिस्थितीत आपण विचारधीन ठेवायला हरकत नाही, असे मात्र जरूर वाटते आहे. स्पर्धा तर राहणारच. त्या स्पर्धेला त्या तोलामोलाने भिडण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाला सक्षम बनविणे, तगडा बनविणे हे तर शैक्षणिक वर्षाचे काम असणार. तसे झाले तर वर्षभर आभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेबद्दल कुतूहल, आनंद पद्धतशीरपणे तयार होणार. हे जर अत्यंत स्वाभाविकपणे आकाराला येत असेल, तर परीक्षेची दहशत का निर्माण होते आणि त्यातील अपयशाने जीवनाला विराम देण्याइतपतचा टोकाचा विचार का तयार होतो? हा या मार्गाचा अत्यंत महत्त्वाचा असा आणि आपणास टाळता येणार नाही, असाच गंभीर प्रश्न आहे. यासाठी आपण आपली परीक्षा पद्धती एके परीक्षा या घाण्याला जुंपली. काही गोष्टी आणि आपत्काल ही संधी मानण्यास हरकत नसावी, असे वाटते. परीक्षा देणे आणि घेणे हा शिक्षण व्यवस्थेचाच एक आनंददायी असा भाग वाटायला हवा. 

आपण एकूणच परीक्षेचा चेहरामोहरा बदलू टाकू काय याचापण आज विचार करणे तितकेच गरजेचे आहे. असे जर आपण काही वेगळे आणि तितकेच वेधक करू शकलो, तर आपल्या मनात परीक्षा म्हणजे आनंददायी, असे काही नवे शैक्षणिक प्रकल्प-पद्धत आकारण्यास सुरुवात होऊ शकेल, असे वाटते. त्यामुळे परीक्षा ही असायलाच हवी. तिला पूर्णांशाने विराम देण्याची कल्पना फारशी मान्य करू शकणार नाही. वर्षभर अध्यापन आणि त्याकरिता अध्ययन हे याकरिता तर सुनिश्चित करण्यात आलेले असते. त्यामुळे त्यास शिकण्यास आनंद वाटतो, प्रसन्नता वाटते अशा तमाम सार्‍या विद्यार्थ्यांना आपण वर्षभरात काय शिकलो हे तपासून घेण्यात पण तितकाच आनंद व उत्साह वाटला पाहिजे, असे आपण आपले शैक्षणिक वर्ष केले पाहिजे, असे मात्र जरूर वाटते आहे. 

देशाच्या सर्वच स्पर्धात्मक क्षेत्रांना उजागर करण्याकरिता परीक्षा या असणारच असणार. त्याशिवाय विश्वाची कवाडेपण सर्वांकरिता खुली होणार नाहीत. मग अशा सार्‍या परीक्षा म्हणजे एक चैतन्यानंद व्हायला काय हरकत आहे. झाली बुवा एकदाची परीक्षा, कटकट संपली! या व्यवहाराची जर यानिमित्ताने विधिवत सांगता करता आली, तर शिक्षण क्षेत्रातसुद्धा आपणास हीच आपली इष्टापत्ती मानता येईल!

सोनिया गांधींकडून मोठा निर्णय! गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी हार्दिक पटेल यांची वर्णी!


राज्यात कोरोनाबाधितांचा आजवरचा विक्रम मोडीत


सांगली झेडपीचे जितेंद्र डुडी नवे 'सीईओ'


मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचे कोरोनाने निधन


कोरोना : राज्यात १ लाख ६४ हजार गुन्हे दाखल


कोल्हापूर : परितेत कोरोनाबाधित सापडल्याने भोगावती परिसर हादरला


पुण्यात निर्णयांचा धडाका सुरुच; मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली!


शाळेतून पुस्तके गणवेश खरेदी करण्याची सक्ती केल्यास गुन्हे दाखल करा : मंत्री बच्चू कडू


औरंगाबाद : रस्त्यालगतच्या ५१ निराश्रीतांना आसरा


ठाणे जिल्हा १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन