Thu, Jun 27, 2019 15:43होमपेज › Bahar › बाेटं माेडणारे

बाेटं माेडणारे

Published On: Sep 09 2018 2:15AM | Last Updated: Sep 08 2018 8:29PMप्रा. सुहास द. बारटक्के

सरकारने अशी माणसं ठेवलीयत ना.’ 
‘अशी म्हणजे कशी?’ 
‘अशी म्हणजे जादूटोणा करणारी संत-महंत मंडळी... बोटे मोडणारी मंडळी... तोंडाला येईल ते बरळून पक्षाचं नाव खराब करणारी मंडळी... 

‘गंदी नालीके कीडे...ऽऽऽऽऽ खडे हो जाँव... नहीं तो तुम्हे मेंटल हॉस्पिटलमे भेजूंगा... खडे हो जाँव... गंदी नालीके..?’ ‘-अहो, मंगुअण्णा काय चाललंय् काय? आणि त्या कुत्र्यावर असे काय ओरडताय? आणि तेसुद्धा हिंदीत? अहो, आपला मराठी गावठी कुत्रा आहे तो.’ 
‘मग काय झालं? रोज आमच्या दारात बसून घरातल्या हॉलमधला समोर दिसणारा टी.व्ही. पाहत असतो. त्याला हिंदी का कळू नये? गेले दोन दिवस हीच वाक्य येताहेत ना टी.व्ही.वर? मग याची पाठ झाली असतीलच.’

‘तो तसा उठणार नाही मंगुअण्णा... तुम्ही असं करा, तुमच्या दोन्ही हातांची बोटं एकमेकांत गुंतवा बघू आणि मग म्हणा तुमची ती वाक्य.’
...मंगुअण्णांनी खरोखरच हातात हात गुंफले, तळवे उलटे केले आणि त्वेषानं ती वाक्यं म्हटली. त्याबरोबर त्यांच्या दारात आडवा झोपलेला तो काळू कुत्रा गुपचूप उठून उभा राहिला आणि बाजूला गेला. अण्णा चकित झाले. ‘हे असं करणं म्हणजे काय हो सर?’ 
‘यालाच म्हणतात दुसर्‍याच्या नावाने बोटं मोडणं.’ 
‘पण, हे असं सगळ्यांच्या बाबतीत घडतं?’ 

‘नाही प्राण्यांच्या बाबतीत घडू शकेल. कारण, ते माणसांच्या हातवार्‍याला घाबरतात; पण माणसांच्या बाबतीत नाही.’
‘तरीही ते असं म्हणतात कसं?’ 
‘ते म्हणजे कोण?’ 
‘आपले माननीय मंत्रिसाहेब चौबेसाहेब नाही का म्हणाले?’ 
‘कुणाला?’ 
‘राहुलना... आता अशा शिव्याशाप दिल्या की राहुल थेट हिमालयातच निघून नाही का जाणार?’
‘ते तसे जावेत म्हणूनच बी.जे. सरकारने अशी माणसं ठेवलीयत ना.’ 
‘अशी म्हणजे कशी?’ 

‘अशी म्हणजे जादूटोणा करणारी संत-महंत मंडळी... बोटे मोडणारी मंडळी... तोंडाला येईल ते बरळून पक्षाचं नाव खराब करणारी मंडळी... म्हणजे बघा पक्षात तीन प्रकारची माणसं सामावून घेतलेली आहेत. एक म्हणजे विचार करणारी विचारपूर्वक बोलणारी, कृती करणारी मंडळी, दुसरी केवळ धार्मिक गोष्टींना प्राधान्य देणारी, धर्मसेवा म्हणजेच जनसेवा मानणारी आणि लोेकांचे मत आपल्याकडे खेचून घेणारी मंडळी आणि तिसरी ही बोटं मोडून शिव्याशाप देत विरोधकांचे खच्चीकरण करणारी मंडळी... तिन्हींचा मिळून एक गोळा विरोधकांच्या तोंडावर मारण्याची ही सोय करण्यात आली आहे.’

‘पण, यामुळे जनतेच्या मनातून तुम्ही उतरता त्याचं काय? उलट विरोधकांना बोलण्यासाठी विषय मिळतो, त्यांची बाजू मजबूत होते त्याचं काय?’
‘मंगुअण्णा हे तुम्हाला कळतं; पण त्या मोठ्या पदावर बसलेेल्यांना नाही ना कळंत? तसं असतं तर दर पंधरा दिवसाला एखादा मंत्री किंवा उच्चपदस्थ कशाला बरळला असता?’
‘खरंच यांना का कळू नये? मध्यंतरी आपल्याकडेही काही पोपट असंच विचित्र बरळत होते. सध्या गप्प आहेत बरे.’
‘त्यांना तंबी दिली नाही का? आपल्या सी.एम.नी? तसं आता पक्षानं आदेश काढूनच या बोटं मोडणार्‍यांवर कारवाई करायला हवी. नाहीतर विरोधकांचं आयतंच फावेल.’
‘पण, एवढं होऊनही राहुलनी काहीच प्रतिक्रिया कशी दिली नाही?’ 
‘दिली की त्यांच्या पक्षानं. उलट अशावेळी गप्प बसणं म्हणजे आम्ही किती मोठे आहोत, ते सिद्ध करणं. लोक समजतात मग शिवराळ कोण आणि स्वच्छ कोण ते. त्यांचं काम आपोआप होतं.’

‘अस्सं होय... म्हणजे शेवटी फायदा त्यांनाच त्या राहुलच्या पक्षालाच; पण सर, त्या पांढर्‍या टोपीवाल्यांच्या पक्षातपण असे लोक असतीलच ना?’
‘आहेत की; पण बराच काळ सत्ता उपभोगल्यावर त्या पक्षाला कळून चुकलंय् की अशा तोंडाळ आणि शिवराळ लोकांना कसा डच्चू द्यायचा ते.’
‘कसा देतात डच्चू..?’
‘त्यांना कुजवत ठेवतात... एकटं पाडतात, मग ते आपोआप पांढर्‍या टोपीवाल्यांचा पक्ष सोडून बी.जे. पक्षाची वाट धरतात. पक्ष वाढवायच्या नादात अशा लोकांना सामावून घेतल्यामुळे बी.जे. पक्षात चौबे प्रकारच्या बोटमोडे लोकांची संख्या वाढलीय् हे खरंय्...’
‘हे बाकी खरं...’ असं म्हणत मंगुअण्णांनी मान डोलावली.