Sat, Jul 20, 2019 22:13होमपेज › Bahar › कालच्या काळात

कालच्या काळात

Published On: Sep 09 2018 2:14AM | Last Updated: Sep 08 2018 8:32PMवैजनाथ महाजन

भूतकाळात रममाण होणे हा सर्वसामान्य माणसाचा स्वभावधर्म असतो. त्यामुळे त्याकाळातील आठवणी सतत उगाळत राहण्यात त्याला जणू धन्यताच वाटत असते आणि हे आजूबाजूच्या आपल्या परिसरातील लहान-थोरांना सांगण्याचा यातूनच एक छंद जडून जात असतो. इंग्रजी साहित्यात अशा आठवणींना व त्यावरील साहित्याला तशी किंमत नसते. एकप्रकारे अशा आठवणीत रमलेल्या साहित्याला तिकडे साहित्यमूल्य नाही, असे ठणकावून सांगितले जाते. आपल्याकडे असे नाही. आपला एकूणच जगण्याचा जो व्यवहार आहे तो भूतकाळाला अनुकूल आणि भविष्याला प्रतिकूल अशा स्वरूपाचा असल्यामुळे आपण भविष्यात डोकावण्याचा फारसा प्रयत्न करतच नसतो. भूतकाळ आणि भविष्यकाळ याच्यामध्ये वर्तमानकाळ आहे आणि काळाची आपणाला शिकवण अशी असते की, आपण वर्तमानात जगले पाहिजे. यालाच साहित्याच्या भाषेत समकालीन साहित्य व्यवहारात जगणे असे म्हणतात. याला जे महत्त्व आहे ते आपण समजून घेतले पाहिजे.

‘सांगे वडिलांची कीर्ती’ याला तसा फ ार अर्थ नसतो. आपल्या पूर्वजांच्या पुण्याईवर जगण्याने आपले कार्य कदापि समाजासमोर येत नसते. त्यामुळे गेलेला काळ परत येणार नाही, हे आपण अत्यंत प्रांजळपणे समजून घेतले पाहिजे. असे झाले तर आपण भूतकाळाला अलविदा करून वर्तमानात प्रवेश करू शकतो. आपल्या काळात किती स्वस्ताई होती? याचा आज गळा काढून काय साध्य होणार. आजच्या काळाशी आपण आपला सांधा जुळवून घेण्याशिवाय आपणाला आपली नित्याची वाटचाल कशी शक्य होणार. कधी काळी आपण तीन आण्यात सिनेमा पाहिला, हे तसे खरेच असते; पण आजच्या मल्टिप्लेक्सशी कशी तुलना होणार? पुढे जाणारा काळ आपल्याबरोबर नवे देखावे घेऊन येत असतो. शाळेतील पाटी आज राहिली नाही म्हणून विषाद वाटून काय उपयोग. कारण, त्या पाटीची जागा नव्या लेखन सामग्रीने सहज काबीज केली आहे.

हे सरत्या पिढीला समजून घेणे जरी त्रासाचे होत असले, तरी शाळेत जाणार्‍या मुलांच्या द‍ृष्टीने अगदी सहज बनून गेलेले आहे. हे आपण पचनी पाडून घ्यायला नको काय? त्याशिवाय आपणाकडून नव्या दिशेचा शोध कसा सुरू होणार. जग तर नित्य नव्याने पुढे झेपावते आहे. त्याची गती विलक्षण वेगाची आहे. या वेगाला आपल्या कवेत घेण्याचे सामर्थ्य आपण कसे प्रकट करणार? जग आता आपल्याकरिता नव्या ग्रहाच्या शोधात बाहेर पडलेले आहे. येत्या पन्‍नास वर्षांनंतर पृथ्वी माणसाला राहण्याकरिता योग्य राहणार नाही, असे अनुमान शास्त्रज्ञांनी काढलेले असून, ते जगापुढे ठेवलेले आहे. अशावेळी आपण नेमके कोठे असणार, याचा अंदाज आताच घ्यायला हवा.  

याकरिता माणसाने वर्तमानात जगत भविष्यात डोकावण्याची सवय मनाला लावून घ्यायला हवी. तसे नव्या जगाचे संस्कारपण कसे रुजविले जातील, हेही कटाक्षाने पाहायला हवे. त्यातील चूक काय, बरोबर काय, हेपण समजून घेऊन सर्वांसमोर सातत्याने मांडायला हवे. ज्ञान आणि विज्ञान याचे संतुलन आपणाला जमल्याशिवाय याला पर्याय नाही. मनुष्य आज गगनचुंबी इमारती लिलया बांधतो आहे. गरुडाच्या गतीने आकाशी झेपावतो आहे. ही गती अशीच पुढे जात राहणार, तुम्ही जर या गतीबरोबर राहिला नाही, तर तुमची अवस्था कोपर्‍यात रुसून बसलेल्या मुलासारखी होईल. कारण, ही गती एखाद्या अथवा एक-दोघांच्या मनावर मुळीच अवलंबून नाही. त्यामुळे अशावेळी आपण फरफटत जात नाही ना, याची आपणास नोंद घ्यावीच लागेल. म्हणून आपल्या जगण्याचा आपण जो सारासार विचार करत असतो तो वारंवार तपासून पाहिला पाहिजे आणि आपण काळाबरोबर आहोत ना? हेपण तपासून पाहणे गरजेचे असते. आपणाला बदलते पर्यावरण मानवते की नाही, हेपण आपण पुनपुन्हा तपासून पाहणे अगत्याचे असते.

कालच्या सुरावटींना कमी लेखण्याचे कारण नाही आणि येणार्‍या नव्याचा दु:स्वास करण्याचे त्याहून कारण नाही. कारण, आपण कालच्या काळातही होतो आणि आजच्या काळातही आहे, ही जाणीव तशी आनंद देणारी असते. म्हणून कवींनी आपणास ‘जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून अथवा पुरुनी टाका,’ असे आपणास शतकापूर्वी सांगून ठेवले आहे आणि कवी हा तुमच्या-आमच्या पुढे असतो. म्हणून त्याची वाणी तितकीच महत्त्वाची असते. या अर्थाने आपण कालच्या काळात जगण्यात धन्यता मानण्याची सवय सोडून द्यायला हवी. त्याशिवाय आपणाला नवी क्षितिजे दिसत नाहीत आणि नव्या क्षितिजाचा शोध हा तर आपला स्थायीभाव असयाला हवा. त्याशिवाय जगाबरोबर आपण पुढे कसे जाणार? म्हणून ‘थांबला तो संपला,’ हे जे आपणास काळ बजावून सांगतो आहे ते आपण तितक्याच गांभीर्याने सतत याचे भान ठेवून समजून घेतले पाहिजे, असे मनोमन वाटते आहे. काळाचा रेटा अगाध असतो, असे म्हणतात आणि ते तितकेच खरेही आहे. जे त्याच्याबरोबर नाते ठेवून असतात, त्यांना तो सहज समजून घेत असतो; पण ज्यांना हे उमजत नाही, त्यांची परिस्थिती फार विचित्र होत असते. त्यांना ना ऐलतीर ना पैलतीर अशी अवस्था अनुभवावी लागत असते. त्यातून कदाचित निराशेशिवाय काहीही हाती लागत नसते.

याकरिता सदैव आपण काळाशी हितगूज करत राहिले पाहिजे. त्यातून आपणास काळही समजतो आणि आपणपण नेमके कुठे आहोत, हे समजते. याकरिता घड्याळ केवळ मनगटावर असून चालत नाही, तर त्याचे ठोके आपणास आत ऐकू यावे लागतात. ज्यांना ते तसे ऐकू येतात त्यांना काहीच कधी सांगावे लागत नाही. म्हणून काळाची परीक्षा फार फार महत्त्वाची असते. जे या कसोटीवर टिकतात त्यांना काळाची शाबासकी मिळत असते आणि उद्याची चाहूल सहज लागत असते. म्हणून नित्य जगण्याचा आपला विचार कालच्या काळाला निरोप देऊन उद्याच्या दिशेने वाटचाल करणारा असला पाहिजे असे वाटते. असे झाले तर आपण सारेच काळाला सामोरे गेलो, अशी काळाचीच नोंद होत असते आणि ही नोंदच आपल्या जगण्याला बळ देणारी असते. म्हणून त्याचे महत्त्व केवळ कालातीत हे निश्‍चित होय.