Fri, Jun 05, 2020 17:23
    ब्रेकिंग    होमपेज › Bahar › बंडोबा

बंडोबा

Last Updated: Oct 13 2019 1:14AM
प्रा. सुहास द. बारटक्के

‘टिंग टाँगऽऽ’ दारावरची बेल वाजवली. मी पुढे होत दार उघडलं तर दारात खांद्यावर झेंडा घेऊन बंडोपंत उभे होते.
‘या, या, बंडोपंत आगलावे, या.’
‘नमस्कार सर, आत येऊ का?’
‘अहो, मी या म्हणतोय तरी तुम्ही पुन्हा विचारताय? ...केव्हढी ही नम्रता.’
‘आमच्या पक्षात नम्रतेलाच महत्त्व आहे सर... पण काय सांगू... ही नम्रताच सोडायची वेळ आली आहे. आम्ही नम्र असल्यानेच अजून मागे राहिलो ना? आमचा पक्ष सोडायची वेळ आली ना?’
‘म्हणजे?’
‘म्हणजे काय सर, पेपर वाचता की नाही? आम्ही यावेळी बंडखोर उमेदवार म्हणून उभे आहोत ना?’

‘हो हो... म्हणजे अपक्ष म्हणून स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराविरोधात उभे आहात नाही का? तुमचं एक बरंय निवडून आलात तर पक्ष तुम्हाला ‘आपलं’ म्हणणारच आणि नाही आला तर आपोआपच तुमचा पत्ता कट; पण खरं सांगू का बंडोपंत, यावेळी प्रत्येक पक्षात एवढे बंडोबा उभे राहिलेत ना, की त्यातले निम्मे निवडून आले ना तरी त्यांचा एक स्वतंत्र पक्ष होईल... कदाचित त्याला ‘बंडगार्डन’देखील म्हणता येईल.’
‘व्वा! चांगली सूचना आहे सर... पण मी तुमचा सल्‍ला घेण्यासाठीच तुमच्याकडे आलोय...’
‘कसला सल्‍ला?’
‘निवडून कसं यायचं, याचा सल्‍ला हवाय मला.’
‘ते जर मला ठाऊक असतं तर मीच नसतो का उभा राहिलो?’
‘तरीपण माझी ही पहिलीच निवडणूक आहे, म्हणून जरा मार्गदर्शन करा ना.’
‘निवडून येण्याकरिता आधी निवडणुकीला उभं राहावं लागतं.’
‘तो तर राहिलो आहेच. हायकमांडने सांगूनही अर्ज मागे घेतला नाही. अजून दोन दिवस मुदत आहे म्हणा.’
‘ठीकाय. आता ईव्हीएम मशिनवर माझा पूर्ण विश्‍वास आहे, असं जाहीर करा.’
‘पण, मग निवडून नाही आलो तर कशावर अविश्‍वास दाखवणार?’
‘म्हणूनच म्हणतोय मी निवडणूक यंत्रणेवर पूर्ण विश्‍वास जाहीर करा आणि मगच लोकांना आवाहन करा.’
‘काय आवाहन करायचं?’
‘तुम्ही इतकी वर्षे काय काय जनसेवा केलीत, त्याचा अहवाल द्या... तुमच्यावर पक्षानं कसा अन्याय केला, त्याची कैफियत द्या आणि मग करा आवाहन मतं देण्यासाठी.’
‘आम्ही जनसेवा केली म्हणजे डायरेक्ट नाही ना केली? पक्षाच्या माध्यमातून केली.’
‘म्हणजे स्वतःच्या खिशातून नाहीच केली तर?’

‘नाहीच म्हणायचं... पण पक्षानं मात्र माझ्यावर अन्याय केला. अहो, गेल्या निवडणुकीत माझ्याकडे बूथवर वाटण्यासाठी आठ-दहा लाख रुपये आले, त्याचाही हिशेब मागितला.’
‘मग दिलात?’
‘नाही. मी कशाला देतोय? अहो, पक्षातल्या कार्यकर्त्यांना रोज चहापाणी करावं लागतं, त्याचाही खर्च द्या, असं उलट कळवलं, तसे वरिष्ठ गप्प बसले?’
‘व्वा! म्हणजे तुम्ही खरे संघटक आणि उत्तम कार्यकर्ते.’
‘हो, उत्तम कार्यकर्ता म्हणून मागे माझा सन्मानही केला ना बापूसाहेबांनी.’

‘मग संपलं तर... उत्तम कार्यकर्ता हा नेहमी उत्तम कार्यकर्ताच राहावा. त्यानं नेता बनण्याचा प्रयत्न करू नये. त्यानं आहे त्यात- बूथ कमिशनमध्ये वगैरे- समाधान मानावं, अशीच तर रचना आहे ना, आपल्या संघटनेची? तेव्हा बंडोबा, तुम्ही आपला अर्ज मागे घेणं हेच उत्तम आहे बघा. तुमच्या खिशात घडी करून ठेवलेला दुसरा झेंडा बाहेर काढू नका. निवडणुकीच्या मोसमात चार पैसे मिळवायचे सोडून पैसे घालवायची काय अक्‍कल सुचली तुम्हाला कुणास ठाऊक!’
असा सल्‍ला देत मी बंडोपंतांची पाठवणी केली...