रोम जळत होते आणि...

Last Updated: May 23 2020 8:04PM
Responsive image


सत्येंद्र राठी

आपल्या जबाबदारीचे भान न बाळगता खुशालचेंडू जगणार्‍या व्यक्तींसाठी ‘रोम जळत होते आणि नीरो फिडल वाजवीत होता...’ या उक्तीचा वापर केला जातो, याचे इथे उल्लेख करण्याचे कारण की, लॉकडाऊनचा काळ सुरू होताच कित्येक लोकांच्या दोनवेळच्या अन्नाची भ्रांत निर्माण झाली, तर त्याचवेळी अनेक उच्च-मध्यमवर्गीय लोकांनी आपले पाक कौशल्य आजमावण्यास सुरुवात केली. यात काही गैर आहे, असे मानणे बहुधा उचित ठरणार नाही; पण पुढे जाऊन त्या खाद्यपदार्थांचे रसभरीत वर्णन आणि त्यांचे चित्र सोशल मीडियावर झळकू लागले. तेव्हा मात्र हे फोटो वेदनादायक ठरू लागले. एकीकडे उपासमार, तर दुसरीकडे खाण्या-पिण्याचा उच्छाद. या कठीण समयी समाजात उमटलेले हे टोकाचे चित्र विदारक तर होतेच; किंबहुना माणूस म्हणून आपली संवेदनशीलता खालावत असल्याचे निदर्शकही होते.

इथं एक कहाणी आठवते की, एका तहानलेल्या माणसाने दुकानदाराला विनंती करत बाहेरूनच विचारले, ‘शेटजी, प्यायला थोडे पाणी द्याल का?’
दुकानदार ग्राहकांच्या गर्दीत व्यग्र होता. ग्राहकाला पिशवी देत तो त्याला म्हणाला,
‘पाणी द्यायला आता कोणी माणूस नाहीये.’
यावर तहानलेला माणूस नम्रपणे म्हणाला...
‘शेटजी थोड्या वेळाकरिता तुम्ही ‘माणूस’ व्हा ना!’ 

गर्भितार्थ हाच की, सुबत्तेमुळे कधी कधी आपणास आपण माणूस असल्याचेही भान राहत नाही. माणूस म्हणून आपल्याकडून अभिप्रेत असलेली करुणा, दया, सहानुभूती या गुणांचाही आपल्याला विसर पडतो.

‘वसुधैव कुटुंबकम्’ अर्थात ‘विश्व हेची माझे घर’ हा भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया आहे. शेजारचा उपाशी असेल, तर आपल्या गळ्याखाली अन्न उतरता कामा नये, असे वाडवडिलांनी आपल्याला शिकवले आहे; पण आता ही शिकवण कदाचित मागे पडू लागली असावी.

राष्ट्रपिता महात्मा गांधी अंगरक्षण करण्यापुरते म्हणून केवळ पंचा नेसत. ते यासाठी नव्हे की, त्यांच्याकडे पुरेशी वस्त्रे नव्हती, तर देशातील नागरिकांकडे लज्जा रक्षणासाठी पुरेशी वस्त्रे नसताना आपण संपूर्ण वस्त्रांनिशी राहणे त्यांना अपराधीपणाचे वाटत असे. ही त्यांची देशवासीयांसाठी असलेली तदानुभूतीच होती.

लालबहाद्दूर शास्त्री देशाचे पंतप्रधान असताना एका अडचणीच्या वेळी देशात अन्नटंचाई निर्माण झाली, त्यांनी देशवासीयांना आठवड्यातून एकवेळचा उपवास करण्याचे आवाहन केले, जेणेकरून उपाशी असणार्‍यांची क्षुधा शांत होण्यास सहाय्यता होईल. त्यांच्या या आवाहनास जनतेने आपली नैतिक जबाबदारी समजून भरभरून प्रतिसाद दिला आणि टंचाईची झळ कमी होण्यास मदत झाली. पुण्यातही पीडितांच्या दु:खात व्यथित होणार्‍या अशाच एका व्यक्तीचा उत्सव साजरा केला जातो ते नाव म्हणजे श्रियाळ शेठ. तेराव्या शतकात बहामनी बादशाहनी त्यांना औटघटका अर्थात साडेतीन तासांसाठी राजेपद दिले, खरं तर या संधीचा लाभ ते स्वतःच्या हितासाठी घेऊ शकले असते; पण त्यांनी या अधिकाराचा उपयोग करत गरीब रयतेसाठी धान्य कोठारे खुली केली. अशा संस्कारात वाढलेलो आपण अचानक असे अनाकलनीय वागू लागलो की, अचंबित व्हायला होते. विचार करा की, ज्यांच्याकडे अन्नाचा कणही नाही त्यांना व्यंजनाचे असे फोटो किती वेदना देत असतील.

असे फोटो सोशल मीडिया, इन्स्टाग्राम, फेसबुक इत्यादीवर अपलोड केल्याने त्यांच्या मनात किती रोष निर्माण होत असेल. अशाने समाजात दरी नाही वाढणार का? असे फोटो मिरवण्यापेक्षा घरटी एक डबा गरजवंताला दिला असता, तर कित्येकांची पोटाची खळगी भरण्यास मदत झाली असती, सामाजिक समरसता वाढीस लागली असती. काहीअंशी समाज ऋण फेडल्याचे समाधानही मिळाले असते. आपले वागणे जनसामान्यांशी सहानुभूती दर्शविणारे असायला हवे, ही आपली सभ्यता आहे.

माणूस म्हणून आपल्यातील करुणा जागरूक ठेवणे, इतरांच्या जखमेवर फुंकर घालणे, अडल्या नडल्याची मदत करणे हेच आपले धर्म आहे.
दुसर्‍याला वाईट वाटू नये म्हणून आपण थोडे सहन केले तर काय बिघडले?
अशा आपत्कालीन स्थितीत उच्च-नीच, श्रीमंत-गरीब या परिभाषेच्या पलीकडे जात जाणीवपूर्वक एकमेकांच्या पाठीशी उभे राहायला हवे. माणूस म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्याआधी माणुसकीची धुळाक्षरे गिरवणे हे तितकेच आवश्यक आहे.

सोनिया गांधींकडून मोठा निर्णय! गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी हार्दिक पटेल यांची वर्णी!


राज्यात कोरोनाबाधितांचा आजवरचा विक्रम मोडीत


सांगली झेडपीचे जितेंद्र डुडी नवे 'सीईओ'


मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचे कोरोनाने निधन


कोरोना : राज्यात १ लाख ६४ हजार गुन्हे दाखल


कोल्हापूर : परितेत कोरोनाबाधित सापडल्याने भोगावती परिसर हादरला


पुण्यात निर्णयांचा धडाका सुरुच; मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली!


शाळेतून पुस्तके गणवेश खरेदी करण्याची सक्ती केल्यास गुन्हे दाखल करा : मंत्री बच्चू कडू


औरंगाबाद : रस्त्यालगतच्या ५१ निराश्रीतांना आसरा


ठाणे जिल्हा १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन