राजे

Published On: Sep 08 2019 1:36AM | Last Updated: Sep 07 2019 8:44PM
Responsive image


प्रा. सुहास द. बारटक्के

‘सर, आमचे दोन्ही राजे भाजपात गेले बरं का?’ शेजारचे मंगूअण्णा आमच्या घरात डोकावीत म्हणाले. ‘हो, वाचलं मी ते. एक राजे आधीच गेले होते. आता दुसरेही गेले भाजपात... साहेबांचा पक्ष पोरका झाला.’ ‘पण काय हो सर, ईडीला घाबरून तर ते भाजपात गेले नसतील ना? की आपल्या पक्षाला गळती लागलीय. धरण फुटायच्या आत बाहेर पडलेलं बरं, असं वाटलं असेल त्यांना?’ ‘ते कशाला असा पळ काढतील? ते ज्या पक्षात जातील तो पक्ष आपोआप वजनशीर होईल ना? भाजप उद्या ‘भारदस्त जनता पार्टी’ म्हणून ओळखला जाईल, आणि ईडीला घाबरून म्हणाल तर परवा राजेच नाही का म्हणाले!’ ‘काय म्हणाले?’ ‘माझ्यासाठी माझी रयत एवढी येडी हाय, की तिच्यापुढे ईडी काहीच नाही करू शकत?’ ‘मग तलवार म्यान करून पक्ष सोडलाच कसा? आता तलवार म्यान करूनच तिकडे वावरणार ना?’ ‘छट् तो स्वभावच नाही राजांचा, आमचे राजे कुणाला दबून राहणार थोडेच? त्या मोठ्या साहेबांनाही त्यांनी वेळोवेळी सुनावलंच ना? रोखठोक बोलणं आहे त्यांचं. कशालाही घाबरत नाहीत ते.’ ‘ईडीलासुद्धा घाबरत नाहीत म्हणता, हे मात्र पटत नाही. ते काँग्रेसचे माजी मंत्री तरी कुठे घाबरत होते? पण, अधिकारी यांच्या कार्यकर्त्यांवर कुरघोडी करून कुंपणावरून उडी मारून आत गेलेच ना?’ पण, हे कुंपणावर लटकणारे लोक नाहीत बरं का. राजे आहेत राजे. लोक त्यांना देवासमान मानतात. तेही रयतेवर तितकंच प्रेम करतात.’ ‘म्हणूनच ते भाजपवाल्यांना हवे आहेत ना? असे देव हाती लागले की मखरात बसवून पूजा करायला ते मोकळे.

पक्षाचा फायदाच होणार की.’ ‘पण दोन्ही राजे पुन्हा एकाच पक्षात म्हणजे तलवारींचा पुन्हा खणखणाट होणार नाही काय?’ ‘यामध्येही एक राजकीय खेळी आहे म्हणे, त्या जाणत्या राजाची. ’ ‘कसली खेळी?’ ‘भाजपचा खुळखुळा करण्याची. पुन्हा एकाच पक्षातून दोघेही उभे राहिले किंवा दोघांनाही तिकीट मागितले, तर तिकीट कुणाला देणार?’ ‘हं...आहे खरा वादाचा मुद्दा. एकाला दिलं की दुसरा बंडखोरी करणारच, अशी ती खेळी असावी.? ‘काय सांगावं? राजकारण हा असा खेळ आहे की कोणता खेळगडी बाजी मारेल त्यावर राजकीय गणितं ठरत असतात?’ ‘भाजप त्यांना आपल्यात घेऊन त्यांना तसंच ‘जैसे थे’ करून ठेवणार नाही कशावरून? त्यांचा मखरातला ‘नारायण’ करणार नाहीत कशावरून?’ ‘तसं नाही करता येणार त्यांना.. दिल्लीश्वर ‘शहा’जोगपणे एवढंच म्हणतात की, निवडून येण्याची ज्याची क्षमता आहे, त्याला तिकीट देऊ, पद देऊ, नीट सांभाळू. ‘राजांची रयत त्यांना लिवडून देणारच. कुणीही कितीही प्रयत्न केले तरी तेथील जनतेला राजेच हवेत?’ ‘ते बरोबर आहे... पण कोणते राजे? हे आधी भाजपात आलेले, की नंतर आलेले?’ ‘दोघेही निवडणुका जाहीर होण्यापूर्वी आलेत हे महत्त्वाचे. आणि हे लक्षात ठेवा, राजे काही तिकिटासाठी भाजपकडे धावलेले नाहीत... शेवटी कोणत्याही राजाला भगवाच प्रिय असतो, हे लक्षात ठेवा.’ ‘तरीच त्यांनी तो वादावादीचा प्रश्न सोडला असावा...’ 
विचारमग्न होऊन टकलावर तर्जनी आपटीत मंगूअण्णा परत गेले.