Mon, Jun 01, 2020 20:55
    ब्रेकिंग    होमपेज › Bahar › कांदा आणि  गाजरं

कांदा आणि  गाजरं

Published On: Oct 06 2019 1:29AM | Last Updated: Oct 05 2019 8:47PM
प्रा. सुहास द. बारटक्के

निवडणुकीच्या बातम्यांनी भरलेले रविवारचे पेपर... त्यांच्या पुरवण्या मनसोक्त वाचून झाल्यावर जेवण होईपर्यंत जरा आरामखुर्चीत पहुडले होतो. कधी डुलकी लागली ते कळलंच नाही. डोळ्यांसमोर एक नटली-सजलेली सुंदर स्त्री दिसू लागली. हा हा म्हणता त्या स्त्रीचं रूपांतर एका सोन्याच्या सिंहासनात झालं. तेव्हा त्यात तिकडून भगवा, हिरवा झेंडा फडकावत तारस्वरात ओरडत कुणी जाकीटवाले सद्गृहस्थ दाखल झाले-
‘...सरकार आमचेच असेल... मुख्यमंत्री मीच असेन... आम्हीच असूू शतप्रतिशत...’
त्यांना मध्येच विरोध करीत एक पोरसवदा तरुण चिरक्या आवाजात ओरडला- ‘मला नवा महाराष्ट्र घडवायचाय... तुम्ही एक संधी द्या. तुमच्या मनात असेल तर मुख्यमंत्रीही होईन...’
तेवढ्यात त्या दोघांच्या मधून गर्दीतून वाट काढीत एक वयोवृद्ध नेते हलक्या आवाजात पुटपुटले-
‘ईडी कशाला माझ्याकडे येतेय... मीच ईडीकडे जातो-’
या सगळ्या गदारोळात हातात बिनझेंड्याची काठी घेऊन एक सद्गृहस्थ सिंहासनाजवळ जाण्याचा प्रयत्न करीत होते. 
‘कोकणचा विकास हाच ध्यास.’

त्यांना कुणीतरी मागे खेचू लागलं तशी त्यांनी काठी उगारली, मग मात्र तिथं एकच धुमश्चक्री सुरू झाली. जो तो एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत ओरडायला लागला. कुणीतरी शिटी वाजवली तसे शेट्टी हातात कांद्याची टोपली घेऊन दाखल झाले. मग फेकाफेक सुरू झाली ती कांद्याची. मग मागे उभा राहून गंमत बघत असलेलो मी ताबडतोब पुढे झालो आणि कांदे गोळा करू लागलो. 
‘कांदे... कांदे...’ मी ओरडलो...
‘अहो  सर, कांदे कांदे काय ओरडताय?’  तुमच्या नाकाला लावायला आणू का एखादा कांदा? किती महाग झालाय ना कांदा? त्याचंच टेन्शन आलंय का तुमच्यावर?’ 
...शेजारचे मंगुअण्णा मला आरामखुर्चीत खांदा धरून हलवत प्रश्न विचारत होते. मी घाबरून डोळे उघडले.
‘कांद्याचं टेन्शन आलंय का सर? मग कांदा थोडा कमी खा. नाही तर कांदा, लसूणविरहित जैन जेवण जेवा थोडे दिवस.’
‘नाही हो... कांदा ऐंशी रुपये झालाय ते खरंय; पण अजून आणतो आम्ही. पेट्रोल ऐंशी-नव्वद; कांदा ऐंशी-नव्वद, अशी सवय झालीय. इलेक्शन आलंय ना?’
‘पण मग सर, कांदा उलट स्वस्त व्हायला हवा. ’
‘कशाला? कांदा कशाला लागतो? गाजरं स्वस्त झालीत.’
‘गाजरं?’
‘हो ना, गाजरं लागतात ना या काळात...’
‘गाजर संक्रांतीला लागतात. आता इलेक्शनकाळात कशासाठी?’
‘असं काय करताय अण्णा... गाजरं दाखवावी लागतात ना?’
‘कुणाला?’

‘हेच ते. आयराम-गयाराम यांना गाजरं दिसलं की इकडून तिकडे पटकन उडी मरतात. या पक्षातून त्या पक्षात, त्यांना फक्त खुर्चीशी मतलब. कार्यकर्ते, जनता, यांचं सोयरसूतक थोडंच असतं त्यांना?’
‘मग यांना आपण निवडून द्यायचं?’
‘ते आता जनतेनंच ठरवायला हवं, खरंतर निवडून येण्याच्या क्षमतेवर त्यांना पक्षात प्रवेश दिला जातो?’
‘आणि समजा ते नाही निवडून आले तर?’
‘तर काय?...’ अखेर ‘स्वगृही’ परत.
‘म्हणजेच परत इकडून तिकडे उडी.’
‘हो, आता पण तिकडे गाजरं असतील तरच/म्हणून म्हणतो अण्णा, कांदा महागला तरी चालेल, गाजरं स्वस्त हवीत.’
‘पटलं बुबा तुमचं म्हणणं...’ अण्णा टाळी देत म्हणाले...