चला, आता जगू या!

Last Updated: May 23 2020 8:08PM
Responsive image


नितीन विनायक कुलकर्णी

नमस्कार मंडळी! आपल्या बहार पुरवणीच्या माध्यमातनं बरेच दिवसांनंतर शब्दसंवाद साधता आला. ‘भेटीलागी जीवा लागलीसी आस’ संत तुकारामांच्या अभंगातील विनवणी म्हणजे विठुरायाच्या भेटीची ओढ. निरंतर भक्ती करणारे थोर संंत. आपण सामान्य संसारी माणसं; पण या ओळीचा अर्थ आपल्याला भेट होऊ शकत नाही त्यावेळी कळला. दोन महिने झाले बघा सगळी माणसं आपापल्या घरात. शेजार दूर करणारा असला आजार येईल, बाजार थंड होईल आणि माणसांची अशी सत्त्वपरीक्षा घेईल, असं स्वप्नातसुद्धा कुणाला वाटलं नसंल. कामात मग्न होतो तेव्हा भेटायला सवड नव्हती आणि आता काम नाही, पाहिजे तेवढा वेळ आहे; पण भेटता येत नाही, असा उलटा खेळ सुरू आहे. पोटासाठी, संसारासाठी राबत असताना उभ्याउभ्या खायला फुरसत मिळत नव्हती आणि आता घरात निवांत बसून खायचं आहे; पण ते गोड लागत नाही. नुसतं बसून खाणं किती अवघड आहे, हे लक्षात आलं. या साथीवर मात करायची महत्त्वाची उपाययोजना म्हणून लॉकडाऊन सुरू झाला. तेरड्याचा रंग तीन दिवस, तसं सुरुवातीला कुठलीही गोष्ट मजेची वाटती. त्याला एन्जॉय म्हणायचं. त्या गोष्टीचं स्वरूप दिवसेंदिवस तेच राहिलं की, हुरूप निघून जायला लागतो आणि आपलं रूप हळूहळू बदलायला लागतं.

पहिल्यांदा आमच्याकडचं चित्र जसं होतं तसं तुमच्याकडं होतं का नाही तुम्ही बघा.‘जगात शिकण्यासारखं खूप आहे. जे या आधी राहून गेलं ते शिकण्याची संधी या वेळेनं आपल्याला दिली.’ नेमकं काय शिकायचं, या विचारात मार्चचा तिसरा आठवडा गेला. चौथ्या आठवड्यात व्यवहार जरी नसला, तरी मार्च एंडची घरबसल्या जाणीव झाली. प्रत्येकाचं इन्कम टॅक्स भरण्यासारखं आणि शिल्लक जर पुढचं चालवण्यासारखी असती, तर बसून खाणं तेवढं काळजीचं वाटलं नसतं. विषाणूचं जंतरतंतर आणि माणसांमध्ये अंतर. कुणी कुणाकडं इंटर करायचं नाही आणि ज्यानं त्यानं घरी नुसती रेस्ट घ्यायची. त्या कारणानं कशातच इंटरेस्ट वाटंना झाला. मार्ग काढायचा तर वाट बघून चालत नाही. काही तरी शिकायचं तर शिकवणारीच सगळी आहेत. कुणाकडून शिकायचं आणि आपल्याला शिकवण्यासारखं त्याच्याकडं काय आहे, याचा आढावा घेण्यात एप्रिलचा पहिला आठवडा गेला.

आईच्या, बायकोच्या हातचं केलेलं खाताना त्या पदार्थात मीठ जास्त झालं आणि जरा तिखट पाहिजे होतं, मसाला कमी पडल्यानं खायला मजा आली नाही. शेजारच्या वहिनींसारखी भाजी तुम्हाला जमत नाही. आत्त्याची पावभाजी, मावशीनं केलेला तांबडा-पांढरा रस्सा, सुक्कं मटण खाण्यातली मजा औरच. हे सगळं सांगताना आपण किती चवीचं खाणारा माणूस आहे याचा अभिमान. बायको म्हणायची साधं ताक करताना दह्यात पाणी किती घालतात हे माहिती नाही. एखादा पदार्थ करून दाखवा, मग सांगा मीठ-मसाल्याचं. या वाक्यानं स्वाभिमान दुखावला होता म्हणून म्हटलं वेळ, संधी आहे स्वंयपाकातलं शिकू. मोठ्या जिद्दीनं काही करायचं ठरवलं तेव्हा... जिरे आणि बडिशेप, मोहरी आणि नाचणा, मक्याचा रवा आणि गव्हाचा रवा दिसायला एकसारखे; पण फरक किती हे लक्षात आलं. कांदा चिरायला गेलो सुरी बोटावर आणि कांदा निसटून फ्रीजखाली. आयुष्यात बोलण्यापलीकडं तुम्हाला काही जमणार नाही, हे बायकोनं बहाल केलेलं प्रशस्तिपत्र घेऊन परत हॉलमध्ये टी.व्ही.समोर कर्त्या पुरुषाच्या भूमिकेत गप्प बसलो. घराघरांतील टाईमपास म्हणत पत्त्यातले राजा, राणी, गुलाम, एक्का पिसून निघाले.

कॅरमची कटकट भिंतींना असह्य झाली. नियतीनं माणसांना दिलेली सक्तीची सुट्टी थोडे दिवस बरी वाटली; पण अजून ही किती दिवस, हा प्रश्न सतावायला लागला. शिकण्यासारखं खूप आहे; पण निसर्गानं स्वतःच्या शुद्धीकरणासाठी माणसाला थांबवलं. एकाचवेळी आपल्याला सर्वांना जे शिकवलं ते लक्षात ठेवायला, धडा घ्यायला पाहिजे. संकटावर मात करण्यासाठी उपयोगाची ठरली ती माणुसकी, एकी, समाजाप्रति असलेली सेवाभावी वृत्ती. आता हे संकट सरल्यानंतर ‘जगा आणि जगू द्या. स्वतःसोबत समाजाचे हित जोपासा. भले मैलांमध्ये कितीही अंतर असू द्या, मनांमध्ये अंतर नको.’ नियतीने आपल्याला सुधारण्यासाठी दिलेली शिकवण संधी समजून घेतली, तर खर्‍या अर्थाने सर्वांच्या दारी सुख येईल याची खात्री असू द्या. अभ्यासात मार्क आणि प्रयासात, जीवन प्रवासात गुण प्राप्त करणं हे खरं शिकणं.