वडापच्या गाडीला विमानाचं भाडं

Last Updated: Mar 21 2020 10:54PM
Responsive image


नितीन विनायक कुलकर्णी

माणूस बोलता बोलता सहजच म्हणत असतो, ‘असल्या चिलटास्नी मी भितोय व्हय, ही असली घुंगुरटी माझं काय बिघडणार हायत... बारा गावचं पाणी प्यालोय मी. माझ्यासमोर असली काय टिकत्यात?’ फुशारकीचं माणसाचं शब्द आता या चिलटानी खोटं ठरिवल्यात. एक साधा डास चावल्याचं निमित्त आणि डेंग्यूसारखा तापाचा आजार माणसाच्या जीवासाठी धोकादायक झालाय. आजाराचं निदान होईपर्यंत निम्म शरीर भोंग्यानं लाकूड पोखरावं तसं पोखरल्यालं असतंय. झाली सुधारणा, वाचला जीव, तर डॉक्टरी शास्त्र लई प्रगत झालंय म्हणायचं आणि यश नाही आलं, जीव गेला, तर आपलं नशीब खोटं म्हणायचं. आताचं जग लई फास्ट हाय म्हंत्यात, तसं आजारबी भलतं फास्ट झाल्यात. विषाणूचा संसर्ग हवेतनं होतोय म्हणून वार्‍यासारखं पसराय लागल्यात. एका आजारावर औषधाचा शोध लागतोय तोवर दुसरा आजार माणसांचं जीव गिळायला टाळा पसरून उभा राहतोय. अंगावर धावून आल्याल्या मारक्या बैलाला धाडसानं चाबूक दाखवून वेसण घालता येती; पण अंगात घुसून जीवावर उठलेल्या विषाणूस्नी करायचं तरी काय? कोरोनाच्या साथीनं सगळं जग भयभीत झालंय. 

आजाराचा प्रसार जास्त होऊ नये ह्योच सध्या त्याच्यावरचा उपाय हाय म्हणून सगळं व्यवहार बंद करायची वेळ आली. पिसाळल्यालं कुत्रं गावात आलं की, ते कुठल्या गल्लीतनं जाईल आणि कुणाला चावंल, हेचा अंदाज सांगता येईल का? बर्मोड्यावर गेलं तर चावंल आणि फूल पँट घालून गेल्यावर चावणार नाही, असं म्हणून आपलं शहाणपण सिद्ध करायची ती वेळ हाय का? कुत्रं पिसाळलंय खरं. ते चावायच्या आधी माणसानं पिसाळल्यासारखं वागावं का? हेचा विचार करायला पाहिजे. काळजी करत बसण्यापेक्षा सांगितल्याली काळजी घेतली तर काय दंडाची पावती फाडत्यात का कोण? डोस्कं असून माणसं खुळ्यावानी वागत्यात आणि मग पश्चात्ताप करत बसायची वेळ येती. अशा वेळेला मग त्या माणसाला बोलत नाही त्यो खुळा असं होतंय... ‘खाली बसल्यावर कुत्रं कधी चावत नाही’ हे कधी सांगत्यात त्या पेशंटला, बघायला गेल्यावर त्यावेळी त्याची बेंबीतली तीन इंजेक्शन झालेली असत्यात. बरं भेटायला म्हणून गेल्यावर भीती घालायची काय गरज हाय का? ‘नशीब चांगलं, कुत्रं साधंचं होतं, पिसाळल्यालं न्हवतं, नाही तर आतापर्यंत पेशंटनं शंभर टक्के भुंकायला चालू केलं असतं.

मागं चार-सहा महिन्यांपूर्वी एका गावात एका दुभत्या म्हशीला पिसाळलेलं कुत्रं चावलं, मालकाला कायच माहीत नाही. त्यानं धार काढली दूध डेरीला घातलं... दोन दिवसानं कुत्रं चावलेली घटना सगळ्यास्नी कळली. ज्या माणसांनी डेरीतनं दूध विकत घेतलं होतं, ती माणसं शिनीमा बघायला गेल्यासारखी बायको-पोरांसकट दवाखान्यात... तिथनं ते दूध टेम्पोनं दूध संघात गेलं म्हणून काय अख्ख्या जिल्ह्यानं दवाखान्यात तपासाय जावं का? निष्काळजीपणा अजिबात असू नये, खरं इतकं घाबरून जाऊ नये की, ब्लडप्रेशर एकदम वाढंल. आजार, उपचार, सुधारणा, जीवाला दगा या गोष्टी माणूस म्हणल्यावर आल्याच; पण आजारावर मात करण्यासाठी उपचाराइतकीच प्रतिकारकशक्ती महत्त्वाची. आजच्या फास्ट झालेल्या जगात धावणार्‍या माणसास्नी स्वत:ची काळजी घ्यायला वेळ मिळंना. प्रतिकारकशक्ती आणायची कुठली? पोटाला खाल्ल्याशिवाय जीव जगत नाही, तसं सुधारणासुद्धा काही भक्षण केल्याशिवाय बळकट होत नाहीत. प्रसिद्धी आणि स्वार्थानं माणसाचं भान भक्षण केलं.

दुसर्‍याच्या मरणाची चेष्टामस्करी करून आपलं मनोरंजन करून घ्यायचं, यात कसली फुशारकी वाटती हे त्यांचं त्यास्नी माहिती. कोरोना आजाराची दक्षता म्हणून मटण, चिकन खाऊ नका, असं सांगितलं. त्यामुळं पोल्ट्रीच्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट आलं. दर कमी करून बी कोंबड्यांची विक्री होईना; पण फुकट वाटाय लागल्यावर एकेकानं चार चार कोंबड्या नेल्या. मास्कच्या किमतीत दुप्पट वाढ झाली. साबणाला बी अत्तराची किंमत आली... काळजी म्हणून हात धुवायला सांगितलं, तर काय काय स्वार्थी माणसं असं हात धुवून घ्याय लागल्यात. भीतीनं माणसं मोठ्या शहरातनं आपापल्या गावी परत यायला लागली, तर वडापच्या गाड्यास्नी विमानाचं भाडं मागाय लागली. माणसावर अशी आपत्ती येती तवा संयमानं, एकजुटीनं, माणुसकीनं त्यावर मात करता येती; पण स्वार्थानं डोकं वर काढलं की, भट्टीच लागती. साथीच्या आजारापेक्षा स्वार्थाचा रोग भयानक आहे... आपल्या देशानं आपल्या परदेशातल्या माणसास्नी मायदेशी आणलं, धीर दिला, याचं जगानं कौतुक केलं. आपल्याला अभिमान हाय. हे विचार ऐकून बाजूला कोण तरी शिंकलं; पण रिवाजाप्रमाणं सत्य हाय म्हणायचं कुणाचं धाडस होईना.