एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले, कोणाचे कोणी ठेवले नाही!

Published On: Aug 18 2019 1:25AM | Last Updated: Aug 18 2019 1:25AM
Responsive image


डॉ. नगिना माळी

महापुराने घातलेला धुमाकूळ पाहता मन सुन्न होते. शब्दही फुटत नाहीत. अफाट मानवहानी व वित्तहानी करणार्‍या या पावसाला, निसर्गाच्या महारुद्र अवताराला म्हणावे तरी काय? अफाट स्वरूपात कोसळणार्‍या या पावसाने या दोन्ही जिल्ह्यांना धुऊन काढले अगदी! एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले! कोणाचे कोणी ठेवले नाही! माझे-माझे म्हणण्याइतपत काही राहिले नाही! माझं-माझं सगळं आपलं झालं! नदीकाठची ती लोकं त्यांनी काय काय गमावले याला मोल नाही व जिथेपर्यंत हा महापूर पोहोचला त्यांनीही खूप काही गमावलं! मानवजातीचेच नव्हे, तर सगळ्या प्राणी-जनावरांनीही आज आपला परिवार गमावला. यातून शिल्लक राहिले ते म्हणजे स्वत:चा जीव व परत एकदा उमेदीने उभे राहण्याची हिंमत.

सळो की पळो करून सोडणार्‍या या पावसाने मानवतेलाच हाक दिली होती की काय कोणास ठाऊक! आपल्या पात्राच्या बाहेर वाहणार्‍या, गावात शिरणार्‍या पाण्यापुढे कोणाचे काहीच चालणारे नव्हते. जीव मुठीत घेऊन लोक मदतीची हाक देत होते. जनावरे प्राण डोळ्यात आणून वाट पाहत होती. पशू-पक्षी कुडकुडत होते. पिकं, झाडं, वेली उपटून पडण्याच्या अवस्थेत होती. वरून कोसळणारा पाऊस व गावागावांत शिरणारं पाणी लोकांना सैराट करून सोडणारं होतं. काही लोकं सुरक्षित ठिकाणी पोहोचली; पण काही यातून निघू शकली नाहीत त्यांनी प्राण गमावले. कधी कधी निसर्ग पूर्वकल्पना देतो, तर कधी न देताच येतो! हाती सापडेल तेवढंच सामान घेऊन धावणारी बायका-माणसं, मुलं-बाळं पाहतो ना तेव्हा डोकं भन्न होतं! छोट्या मुला-बाळांनी हे जगही स्पष्ट पाहिलं नाही तोच आईच्या कुशीत प्राण सोडवा काय ही घटना!

पण, निसर्गापुढं कोणाचं काही चालत नाही, हेही खरंच म्हणा! आज आपल्या माणसांच्या मदतीची दाद द्यायला हवी. महापुरात सापडणार्‍या हजारो लोकांना बाहेर काढणारी ही माणसं जीवावर बेतून लोकांना वाचवत होती. मानवतेने मानवतेला दिलेली ही हाक सिद्ध झाली. संरक्षक टीम, विविध मंडळं, गट, आर्मी, पोलिस यांनी या महापुरात जी मदत केली ती अवर्णनीय आहे! सलाम त्या मदतदात्यांना! जसा माणसाचा जीव तसा प्राण्यांचाही जीवच! माणूस-प्राणी असा फरक न मानता सर्वांनाच वाचविण्यात त्यांना यश आले. जिथे नियतीनेच हा फरक केला नाही, तिथे आपण तर का करावा?

तुडुंब वाहणार्‍या विद्रुप प्रवाहातून लोकांना वाचविताना देव ही अमूर्त संकल्पना मागे राहून आपल्याला वाचविणार्‍या, त्या मदतकार्य करणार्‍यांत देव दिसत होता. जे आहे ते समोर आहे. मृत्यूला समोर पाहताना काय हाल झाले असावेत! अहोरात्र सतत 8-10 दिवस कार्य करणार्‍या सर्वच मंडळींनी माणुसकीच्या निशाणीचा झेंडा रोवला.

इथे कोणी कोणत्या जाती-पातीचा नव्हता, उच्च-नीच नव्हता, गरीब-श्रीमंत नव्हता. होती ती केवळ माणुसकी, जीव-प्राण व आम्हीची भावना, समोर येतो त्याला वाचविणे हेच! निसर्गाच्या या अवतारापुढे माणसाने हात जोडले; पण जोडलेल्या हातावर परत उभारण्याची जिद्द सोडली नाही.

केवळ माणसांना वाचविणे एवढेच व्रत घेतलेला समुदाय यशस्वी ठरला; पण या काळात झालेली हानी भरून येण्यास फार वेळ लागेल. पूरग्रस्तांना अन्न, वस्त्र, निवारा व आरोग्यासाठी मदतीचे हात समोर आले. इथे ना कोणी कोणत्या पक्षाचा, ना जातीचा. केवळ जीव वाचविणे हाच पक्ष व माणुसकी हीच जात होती. शाळा, महाविद्यालये, धर्मशाळा, पै-पाहुणे यांचा आसरा घेणारे पूरग्रस्त गावोगावी राहत होते. विंचवाचे बिर्‍हाडपण सोबत असते म्हणतात; पण या लोकांकडे केवळ जीव हेच बिर्‍हाड होते. 8-10 दिवस तर सूर्याने दर्शन देणेही बंद केले होते. प्राणीसुद्धा डोळ्यांतून अश्रू ठिबकत या निसर्गाकडे पाहत होते. काही लोकं, जनावरं मृत्युमुखी पडली; पण कित्येक जणांना वाचविण्यात यश आले. तरुण मुलेही मदत करताना दिसली. दिवसभर टी.व्ही., रेडिओवर बातम्यांवर बातम्या येत होत्या आणि निसर्ग आपला थरार दाखवीत होता. याच निसर्गापुढे मानवी जीवन वाचत होते. हे युद्ध म्हणावे की काय? काहीही असले तरी निसर्ग आपली रूपे दाखवून गेला व मानवतेनेही आपली नवीन रूपे दाखविली.

या महापुरामध्ये खूप काही गमावले; पण मानवता जिवंत राहिली. पुरानंतरच्या परिस्थितीवरही उपाय सुरू आहेत. अनेक योजना जाहीर करण्यात आल्या व येतीलही; पण जीवाला मुकलेले मुकलेच. जीव हा जीवच असतो. मग तो माणसाचा असो वा प्राण्यांचा. वाचविणे आपले कर्तव्य होते. ते कर्तव्य सर्वच सुरक्षा रक्षकांनी यशस्वीरीत्या पार पाडले. अखेर माणूसच माणसांच्या उपयोगी पडला. परत एकदा नव्या उमेदीने उभे राहील हे नक्की. गरज आहे फक्त नव्या जिद्दीची. गेलेल्यावर विचार करण्यात काहीच फायदा नाही. अशी परिस्थिती परतही येऊ शकते; पण त्यातच आपण आपली व्यवस्था करायलाही हवी. याचे नियोजन प्रत्येक व्यक्तीने करणे गरजेचे आहे.

डोळ्यात अश्रूही राहिले नाहीत इतके दु:ख या महापुराने दिले; पण दुसर्‍या बाजूला हा मानवतेचा महापूरही होता.