धाेका जंतूयुद्धाचा!

Last Updated: Mar 21 2020 11:06PM
Responsive image


डॉ. दीपक शिकारपूर

सध्या पूर्ण जग ‘कोरोना’मुळे भयग्रस्त आहे. काही विश्लेेषकांचे म्हणणे आहे की, हा विषाणू युद्धातील एक हत्यार आहे व ते काही कारणामुळे उलटले आहे. सध्या कोरोना विषाणूने उडवलेल्या हाहाकाराने सर्वत्र जैविक युद्धाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सर्व गोष्टी स्मार्ट व हायटेक होत आहेत. बदलत्या काळानुसार तंत्रेही बदलली असल्याने ‘शस्त्र हे शस्त्रासारखेच दिसले पाहिजे,’ असा पारंपरिक आग्रह धरण्याचे दिवसही संपले आहेत..!

सुमारे शंभर वर्षांपूर्वी जगाने पहिले महायुद्ध पाहिले. नंतर दुसर्‍या महायुद्धात एक नाझी हुकूमशहा पाहिला. साम्राज्याचा विस्तारवाद व आपले वर्चस्व वाढवणे, ही मानसिकता हजारो वर्षांपासून अनेक हुकूमशहा मनी बाळगतात. त्यासाठी विसाव्या शतकापर्यंत युद्ध पारंपरिक शस्त्रांद्वारे लढले जायचे. युद्ध म्हटले की, शत्रूशी प्रत्यक्ष दोन हात करणारे भूदल-नौदल-हवाईदल यामधील वीरजवान आणि त्यांना आदेश देणारी लष्करी कार्यालये ऊर्फ ‘हायकमांड’ अशी दोनच टोके सर्वसामान्य व्यक्तींच्या डोळ्यांसमोर तरळतात. हे स्वरूप आता वेगाने बदलत आहे. दुसर्‍या महायुद्धाचा शेवट अणू स्फोटाने झाला. शस्त्रशास्त्रातील तो एक हिंसक प्रयोग होता, ज्यामुळे अनेक निष्पाप बळी गेले. पूर्वी अमेरिका व एकसंध रशिया असा थेट संघर्ष होता व दोघांची मित्रराष्ट्रे होती. आता त्यात चीनची भर पडली आहे. चीनविरुद्ध अमेरिका व ‘इसिस’सारखे दहशतवादी असे विचित्र चित्र सध्या दिसत आहे. त्याला व्यापारी संघर्षाची जोड आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा अतिमहत्त्वाकांक्षी नेता सत्ताप्राप्तीसाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकतो, हे आपण 2016 मध्ये केम्ब्रिज अ‍ॅनालिटिक्स व रशियाचा छुपा पाठिंबा हे सर्व पाहिले.

सध्या पूर्ण जग कोरोनामुळे भयग्रस्त आहे. काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की, हा विषाणू युद्धातील एक हत्यार आहे व ते काही कारणामुळे उलटले आहे. सध्या कोरोना विषाणूने उडवलेल्या हाहाकाराने सर्वत्र जैविक युद्धाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सर्व गोष्टी स्मार्ट व हायटेक होत आहेत. बदलत्या काळानुसार तंत्रेही बदलली असल्याने ‘शस्त्र हे शस्त्रासारखेच दिसले पाहिजे,’ असा पारंपरिक आग्रह धरण्याचे दिवसही संपले आहेत! सध्या अत्यंत अचूक व कार्यक्षम इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा आणि त्याहीपेक्षा सूक्ष्म तंत्रज्ञानाचा जमाना आहे. विविध शास्त्रीय शोधांनी मानवी आयुष्य नक्कीच सुखाचे केले असले, तरी निसर्गात आढळणार्‍या विविध रोगजंतूंना आधुनिक वैद्यकशास्त्राची जोड देऊन आपण त्यांना अधिकच संहारक बनवले आहे. जंतुसंसर्ग, विषारी बुरशी, जीवाणू-विषाणू यांच्या आधारे लढल्या जाणार्‍या अशा युद्धाला जंतुयुद्ध (जर्मवॉर), जैविक शस्त्रे (बायोवेपन्स) इ. नावांनी ओळखले जाते.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून, विशेषतः दुसर्‍या महायुद्धात, जपान आणि जर्मनी जैविक युद्धनीतीमध्ये आघाडीवर होते आणि नंतरच्या दशकांत अमेरिका, यूके आणि रशिया. 1972 च्या इथउ करारानुसार बहुतेक राष्ट्रांनी स्वतःकडील अशी अस्त्रे नष्ट केली असली, तरी कोणाचे काही सांगता येत नाही, हेच खरे. जैविक अस्त्रांचा प्रयोगही मध्ययुगापासून केला जातो आहे. विशेषतः, संसर्गजन्य रोग किती ताकदीचे असतात, याची माहिती पूर्वीपासूनच असल्याने रोगग्रस्त व्यक्तींना शत्रू प्रदेशात वा सैन्यात घुसवणे किंवा अशांचे मृतदेह विहिरींत, शेतात नेऊन टाकणे, असे प्रकार सर्रास केले जात! रुग्णांच्या जखमांवर बसलेल्या माश्या मोठ्या संख्येने पकडून त्या शत्रू प्रदेशातील दाट वस्तीत सोडल्या जात!! वेळप्रसंगी रोग्याने वापरलेले दोन-चार कपडे वा पांघरूणदेखील पुरेसे ठरत असे (कॅनडामधील आदिवासींवर ब्रिटिश वसाहतवाल्यांनी हा प्रयोग केला होता. ते रोगजंतू कॅनडात मुळात अस्तित्वातच नसल्याने आदिवासींची प्रतिकारक शक्तीच कमी पडून संपूर्ण जमाती नष्ट झाल्या). दरम्यान, औषधोपचार आणि वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे विविध रोगांवरील लसी उपलब्ध झाल्याने संसर्गजन्य आजारांना आळा बसला खरा; पण हेच वैद्यकीय ज्ञान वापरून नवनवीन अतिभयानक जंतू आणि विषाणूंना शस्त्ररूपात वापरले जात आहे.

सन 2001. अमेरिकेच्या उच्च प्रशासकीय अधिकार्‍यांना पोस्टातून पाकिटे आली. त्यातून पांढरी पावडर निघाली. तिची तपासणी झाल्यावर असे दिसले की, तिच्यामध्ये ‘बॅसिलस अँथ्रॅसिस’ हा भयानक जीवाणू ठासून भरला होता- मग एकच हलकल्लोळ झाला! याचा तपास 7 वर्षे चालला. सूत्रधार असलेल्या ब्रूस इव्हान्स या सरकारी प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञाने ‘एफबीआय’ने पकडण्यापूर्वीच आत्महत्या केली.

अँथ्रॅक्सला पूर्वीपासून ‘गुरांचा रोग’ म्हणून ओळखले जाते. कारण, याचे जीवाणू (बॅक्टेरिया) जमिनीत राहतात आणि चरणार्‍या गुरांमार्फत झपाट्याने पसरतात. हा रोग हवेतूनही पसरू शकतो. रोगग्रस्ताला ताप, थकवा, स्नायुदुखी, उलट्या, रक्तरस-ग्रंथींची (लिम्फ नोडस्) आग होणे, श्वासात अडथळा, पोट बिघडणे, काळे व्रण उठणे, अशी लक्षणे जाणवतात. अँथ्रॅक्सबाबतची मुख्य समस्या अशी की, यापैकी बरीच लक्षणे इतरही रोगांत दिसतात. त्यामुळे विशिष्ट उपचार करणे अवघड जाते, तोवर रोगाने शरीराचा ताबा घेतलेला असतो. दुसरे असे की, बरेचसे जीवाणू अल्पकाळापुरते प्रभावी असतात- अँथ्रॅक्सचे तसे नाही. याचे ‘शेल्फ लाईफ’ किती असेल असे आपणास वाटते? - तब्बल 40 वर्षे! ब्रिटिशांनी ग्रीनार्ड बेटावर 1942 साली केलेल्या अँथ्रॅक्सबॉम्बच्या चाचणीचे परिणाम शून्यावर येण्यासाठी 1986 साल उजाडावे लागले, म्हणजे पाहा. बहुधा यामुळेच अँथ्रॅक्स ऊर्फ बी अँथ्रॅसिस आजही सर्वात ‘लोकप्रिय’ जैविक अस्त्र आहे आणि त्याची दहशत टिकून आहे!!

इबोला (EBOLA) : इबोलाबद्दल जास्ती सांगण्याची जरुरी नाही, असे वाटते. कारण, याच्यामुळे गेल्या दोन-चार वर्षांत आफ्रिकेतील बरेच देशही चर्चेत आले आहेत. गेल्या तीन दशकांत आफ्रिका, अमेरिका आणि युरोपमध्ये एकूण 7 वेळा इबोलाचा उद्रेक झाला आहे आणि हजारो व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत. 1970 च्या दशकाच्या अखेरीस कांगोच्या इबोला खोर्‍यात हा विषाणू प्रथम आढळला. त्यानंतर झैरे आणि सुदानमधून हा विषाणू वेगाने पसरू लागला. काही वर्षांतच त्याने आपला प्रताप दाखवला आणि हजारो लोक मरण पावले. यामध्ये ताप, उलट्या वगैरे लक्षणे दिसतातच; महत्त्वाचे म्हणजे शरीरांतर्गत किंवा बाह्य रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होतो. इबोलाचे विषाणू मानवात तसेच प्राण्यांमध्ये राहतात.

फळे खाणार्‍या छोट्या वटवाघळांमार्फत याचा व्यापक प्रसार झाल्याचे आढळले असले, तरी त्याच्या निवासाबाबत आणि एकंदर सवयींविषयी आपल्याला फारशी माहिती नाही. इबोलावर थेट लस वा औषध आज तरी उपलब्ध नाही! रुग्णांवर उपचार करणार्‍या नर्सेस आणि डॉक्टरांनाच याची लागण चटकन होत असल्याने तसेच रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण थेट 80 टक्क्यांपर्यंत जात असल्यानेही चिंता वाढली आहे. बरे त्यातलेही काही रुग्ण तुलनेने लवकर बरे होतात, तर काही दोन-चार दिवसांतच शरण जातात. यामुळे डॉक्टरांनाही उपचारांची सर्वंकष दिशा निश्चित करणे कठीण झाले आहे. यामुळेच इबोलाचे विषाणू ‘एअरोसोल’च्या रूपात फवारले गेले तर काय होईल, याची कल्पनाच करावी... हादेखील- प्रवर्गातील अतिधोकादायक   विषाणू मानला जातो. फक्त दहा वर्षांत इबोलाने स्वतःच्या खात्यावर प्रचंड दहशत जमा केली आहे खरी; पण अगदी पूर्वीपासून अस्तित्वात असलेले जीवाणूरूपी एक हत्यार अद्यापही तितक्याच ताकदीने आपले स्थान टिकवून आहे! ते म्हणजे...

निपाह (NIPAH) : निपाह व्हायरस हे असेच एक उदाहरण आहे. मलेशियातील निपा प्रांतात सन 2000 मध्ये याचा उद्रेक झाला आणि 265 रोगग्रस्तांपैकी 105 लोक अल्पावधीतच मरण पावले. हा रोग पाळीव डुकरांमधून पसरल्याचा आणि निपाह विषाणू नैसर्गिकरीत्या वटवाघळांमध्ये राहत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याला तूर्त ‘सी’ वर्ग दिला गेला असला, तरी 50 टक्क्यांपेक्षा अधिक मृत्युदर, सहज प्रसार आणि प्रतिबंधात्मक लस नसणे, यामुळे अतिरेकी याकडे आकर्षिले गेले नाहीत, तरच नवल!

याखेरीज ‘मॅड काऊ’सारख्या रोगांची नावेही आपल्याला माहीत असतात. गाई-गुरे आणि कोंबड्या यांचा वापर जगभर खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यांच्यामार्फत विविध रोग पसरवणे सहजशक्य आहे. आणखीही एका नव्या संशोधनाचा उल्लेख करायला हवा- आजचे युग जनुकीय परिवर्तनाचे (जेनेटिक मॉडिफिकेशन) आहे. निसर्गात मूलतः असलेल्या प्राण्यांची जनुकीय वैशिष्ट्ये एकत्र करून ‘नवनिर्मिती’ करण्यासंबंधीच्या अभ्यासाला गेल्या दहा-वीस वर्षांत महत्त्व आले आहे. ‘ज्युरासिक पार्क’ हे याचे एक सर्वज्ञात उदाहरण म्हणता येईल! शरीरविज्ञान आणि वैद्यकशास्त्राला याचे मोठे सहाय्य होत असले आणि मानवी आयुष्य सुखाचे बनणार असले, तरी हे संशोधन चुकीच्या प्रवृत्तीमधून केले गेल्यास किंवा त्याचा गैरवापर झाल्यास भयंकर परिणाम होऊ शकतात. अणूचा भेद करण्यापासून मंगळावर माणूस पाठवण्यापर्यंतचे अनेक बेत माणसाने आखले आणि गेल्या पन्नासएक वर्षांत त्यापैकी बरीचशी उद्दिष्टे प्रत्यक्षात आणलीही. स्वतःसाठी जग अधिकाधिक अनुकूल आणि सुखाचे बनवण्यासाठी ही सगळी धडपड चालू आहे, हे खरे. परंतु, मानव या दिशेने वाहवत गेल्याने आता त्याच्या हाती असलेले हे एकमेव जगच नष्ट होण्याची वेळ आली आहे! प्रत्येकाने ही बाब गंभीरपणे ध्यानात घेणे आज अपरिहार्य बनले आहे.