Mon, Mar 18, 2019 19:18होमपेज › Bahar › का वाढतेय अतिवृष्टी?

का वाढतेय अतिवृष्टी?

Published On: Sep 09 2018 2:14AM | Last Updated: Sep 08 2018 8:50PMअ‍ॅड. गिरीश वि. राऊत, पर्यावरणतज्ज्ञ

दिल्‍ली, केरळ, मुंबई किंवा जगात सध्या हाहाकार घडवणारा पाऊस हजारो, लाखो वर्षांतील, न पडणारा पाऊस आहे. कारण, सध्या पृथ्वीच्या तापमानात होत असलेल्या महाविस्फोटक वाढीशी त्याचा संबंध आहे. अशा वेगात होणारी वाढ कोट्यवधी वर्षांत झालेली नाही. हजारो वर्षे अंटार्क्टिकाचे, दक्षिण ध्रुवाचे तापमान वर्षातील बहुतांश काळ उणे 40 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जात होते. मात्र, ते आता शून्यावर 25 अंश सेल्सिअस असते. हा तापमानातील अभूतपूर्व फरक आहे. या खंडावरील बर्फाचे प्रचंड साठे झपाट्याने वितळत आहेत. 

केरळमधील अतिवृष्टी व महापुरात शेकडो माणसे बळी गेली. आता पाणी ओसरत आहे. माणसांची सुटका करण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. हानीचे प्रमाण समजत आहे. यात पैशांचा आकडा दिसत राहतो. सुमारे 20 हजार कोटी रुपयांचा आकडा सरकारला वाटतो. केरळात 100 वर्षांतला मोठा पाऊस पडला, असे म्हटले जाते. मुंबईतील 26 जुलैच्या पावसाबाबतही असेच म्हटले गेले. यात चूक होत आहे. यामुळे परिस्थितीचे गांभीर्य नागरिकांच्या लक्षात येत नाही. वस्तुस्थिती ही आहे की, पावसाची नोंद ठेवण्यासच देशातील विविध भागांत 60 ते 100-125 वर्षांपूर्वी सुरुवात झाली. मात्र, पाऊस तर कोट्यवधी वर्षे पडत आहे. 

केरळ, मुंबई किंवा जगात सध्या हाहाकार घडवणारा पाऊस हजारो, लाखो वर्षांतील, न पडणारा पाऊस आहे. कारण, सध्या पृथ्वीच्या तापमानात होत असलेल्या महाविस्फोटक वाढीशी त्याचा संबंध आहे. अशा वेगात होणारी वाढ कोट्यवधी वर्षांत झालेली नाही.

अंटार्क्टिकाचे बर्फसाठे केरळात कोसळले आहेत. हजारो वर्षे अंटार्क्टिकाचे, दक्षिण ध्रुवाचे तापमान वर्षातील बहुतांश काळ शून्याखाली राहत होते. उणे 40 अंश सेल्सिअसपर्यंतही खाली जात होते. सध्याही ते शून्याखाली सुमारे 25 अंश सेल्सिअस हवे होते. मात्र, ते आता शून्यावर 25 अंश सेल्सिअस असते. हा तापमानातील 50 अंश सेल्सिअस किंवा जास्त अंशाचा अभूतपूर्व फरक आहे. 

तीन ते सहा किलोमीटर जाडीच्या (उंचीच्या) बर्फाच्या थरांनी पूर्ण आच्छादलेल्या, भारताच्या काही पटीने क्षेत्रफळ असलेल्या या खंडावरील बर्फाचे प्रचंड साठे झपाट्याने वितळत आहेत. ही, तसेच महासागरांच्या पाण्याची व पर्वतांवरील बर्फाची वेगाने होत असलेली अतिरिक्‍त वाफ थंडावा मिळाल्यावर ठिकठिकाणी अतिवृष्टी, ढगफुटी व बर्फवृष्टीच्या रूपात कोसळत आहे. सुमारे 1000 घन किलोमीटर अधिकचा बर्फ दरवर्षी वितळत आहे. केरळमधील हाहाकाराच्या दरम्यानच महाराष्ट्रातील नंदूरबारच्या काही भागांत महिन्याभराच्या पावसाच्या अभावानंतर एका तासात काही इंच या गतीने अकल्पित वृष्टी होऊन रंगावली व सरपणी या नद्यांना अचानक महापूर आला. मोठी आपत्ती कोसळली. असे जगभर घडत आहे.

संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या, जर्मनीतील ‘बॉन’ येथे झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या परिषदेत दि. 6 नोव्हेंबर 2017 रोजी जागतिक हवामान संघटनेकडून जाहीर झाले की, वातावरणातील कार्बनने मर्यादा ओलांडली आहे. आता तापमान वाढतच राहणार आहे. तापमानवाढ अपरिवर्तनीय झाली आहे. फक्‍त काही दशकांत मानवजात व जीवसृष्टीचे कायमचे उच्चाटन होणार आहे. पॅरिस करारात नमूद केलेली, स्वयंचलित यंत्राच्या आगमनाच्या म्हणजे सुमारे सन 1750 च्या तुलनेत सरासरी तापमानात 2 अंश सेल्सिअस वाढीची मर्यादा सध्याच्या गतीने 3 वर्षात पार केली जाणार आहे. यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही; पण याबाबत मौन पाळून केरळच्या आणि इतर प्रत्येक दुर्घटनेचा अर्थ लावला जात आहे. विज्ञानाचा जयजयकार चालू असताना होणारे हे वर्तन अवैज्ञानिक आहे. सत्य लपवले जात आहे.

केरळच्या महापुराचा थेट संबंध कार्बनच्या उत्सर्जनाशी आहे. रोज पृथ्वीवर धावणार्‍या सुमारे 200 कोटी मोटारींशी आहे. परंतु, दुर्घटनांच्या मुळाशी जाणारी खरी कारणे जनतेपर्यंत पोहोचत नाहीत. ही अतिवृष्टी होत असताना मुंबईत माहुलच्या तेल शुद्धीकरण कारखान्यात (रिफायनरी) भयंकर स्फोट झाला. आग लागली. या भागातील, तसेच शिवडी, वडाळ्याच्या तेल टाक्यांनी पेट घेतल्यास काय घडेल त्याची कल्पना करावी. मुंबई जळेल. रिफायनरींमधून खनिज तेलावर प्रक्रिया करताना मोठे कार्बन उत्सर्जन होत असते. या प्रक्रिया केलेल्या तेलावर वाहने चालतात. जगात दरवर्षी उत्सर्जित होणार्‍या 1000 कोटी टन कार्बन डायऑक्साईड वायूपैकी 450 कोटी टन वायू वाहनांमुळे उत्सर्जित होतो. यापैकी जवळजवळ 90 टक्के उत्सर्जन मोटारी (कार) करतात. जगात कोठेही धावणार्‍या वाहनांमुळे केरळ, मुंबई, चेन्‍नई किंवा उत्तराखंडासारख्या दुर्घटना घडतात.

केरळमधील माणसे लाखोंच्या संख्येने अरब अमिरात व इतर आखाती देशांत नोकर्‍या करतात. संयुक्‍त अरब अमिरातने 700 कोटी रुपये मदत दिली याचे कौतुक झाले. पैसे न स्वीकारण्यावरून वादही चालू आहे; पण हे लक्षात घ्यावे की, अतिवृष्टी व महापूरही त्याच देशांतील तेलाच्या ज्वलनामुळे आहेत. रिफायनरीदेखील या तेलावर प्रक्रिया करण्यासाठी आहेत. म्हणजे त्यांनी तेल व नोकर्‍यांबरोबर जगाला दुर्घटनांची निर्यातही केली. त्यांची कमाई हीच एक दुर्घटना ठरते. आता हे देश व अमेरिका कोकणात रिफायनरी करू पाहत आहे; पण ते घातक आहे.   

केरळातील या दुर्घटनेत 20,000 किलोमीटर लांबीचे रस्ते उखडले गेले, निकामी झाले. हे रस्तेदेखील या दुर्घटनेची बीजे पेरत होते. या रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. या रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेबाबत खंत करणे व त्यावरून वाहून जाणार्‍या आलिशान वाहनांना वाचवण्याचा प्रयत्न करणे, हे हास्यास्पद आहे. कारण, तुम्हाला नष्ट करणार्‍या गोष्टीला तुम्हीच वाचवत आहात. माणसे, जीवसृष्टी व पृथ्वीची जडण-घडण यांना वाचवणे आवश्यक आहे. उद्योग, वीजनिर्मिती, खत-कीटकनाशक कारखाने, वाहने, सिमेंट काँक्रीटची बांधकामे, धरणे आदींना वाचवणे नाही. नुकसानभरपाई व पुनर्निर्माणाची रूढ औद्योगिक शहरी कल्पना चालू राहिली, तर यापेक्षा मोठ्या दुर्घटनांची खात्री बाळगावी. दुर्दैवाने ते घडत आहे.

धरणांमुळे यापेक्षा मोठी हानी टळली, हा समज चूक आहे. उलट धरणांमुळे व त्यांना जोडलेल्या शेती व शहरी पद्धतीमुळे पिण्याचे असो की महापुराचे, पाण्याची समस्या बिकट झाली. ही गोष्ट कोट्यवधी वर्षांच्या पृथ्वीच्या किंवा दहा हजार वर्षांच्या कृषियुगाच्या पार्श्‍वभूमीवर तपासून पाहिल्यासच कळेल. 

कायदेशीर-बेकायदेशीर खाणकाम, वैज्ञानिक-अवैज्ञानिक डोंगरतोड, वैध-अवैध वाळू उपसा, या संकल्पना पृथ्वीच्या व जीवनाच्या द‍ृष्टिकोनातून चूक आहेत. पृथ्वीचा द‍ृष्टिकोनच आपणास वाचवू शकतो. आधुनिक मानवकेंद्री नाही. नुकसान आर्थिक व जीवितहानी फक्‍त माणसाची, फारतर त्याने पाळलेल्या कोंबड्या, बकर्‍या, गायी, म्हशींची. पृथ्वीवर मानवाची आधुनिक जीवनशैली, औद्योगिकीकरण ज्या विविध स्वरूपाच्या दुर्घटना घडवत आहे, त्यात जीवसृष्टी नष्ट होत आहे. वणव्यांत, बर्फवृष्टीत, उष्णतेच्या लाटांत, महापुरात, वितळणार्‍या बर्फात, जीवसृष्टी नामशेष होत आहे. या पार्श्‍वभूमीवर माणसाने पृथ्वीशी सुसंगत राहणारी जीवन पद्धती स्वीकारली, तरच जंगल, नदी व सागरातील हरितद्रव्य वाढीला लागून मानवजात व जीवसृष्टीचा काही भाग वाचू शकेल.