Responsive image


शौर्यगाथा भीमा कोरेगावची!

Published On: Dec 31 2017 1:27AM | Last Updated: Dec 30 2017 8:36PM


अनंत मांडुकलीकर

भीमा-कोरेगावच्या ऐतिहासिक लढाईला 1 जानेवारी 2018 या दिवशी 200 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त.....

भारताच्या लष्करी इतिहासातील एक मानबिंदू म्हणजे भीमा-कोरेगाव विजयस्तंभ होय. तो एक युद्धस्तंभ आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात तत्कालीन  ब्रिटिश लष्करातील महार रजिमेंटच्या गौरवार्थ ब्रिटिश सरकारकडून 26 मार्च 1821 रोजी तो उभारण्यात आला. पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर किरकी (आताचे कोरेगाव) येथे अहमदनगर महामार्गाला लागून असलेला हा स्तंभ 32 x 32 चौ. फू. दगडी चबुतर्‍यावर 65 फूट उंचीचा आहे. 1 जानेवारी 1818 रोजी याच कोरेगावच्या मैदानावर दुसरा बाजीराव पेशवे आणि इंग्रज यांच्यात झालेल्या लढाईची तो खासियत सांगतो. अर्थात, ही लढाई पेशवे विरुद्ध थेट इंग्रज अशी झाली नव्हती. तर ती पेशवे आणि ब्रिटिशप्रणीत महार रेजिमेंट यांच्यात झाली होती. त्यामुळे या लढाईला सामाजिक महत्त्व होते. या लढाईला एक जानेवारी 2018 रोजी दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून या लढाईच्या द्विशताब्दीनिमित्त केलेले यथार्थ विवेचन.

पेशव्यांचे सरसेनापती बापू गोखले यांच्या नेतृत्वाखाली वीस हजार घोडदळ, आठ हजार पायदळ, त्र्यंबकजी डोंगळेसारखे निवडक सरदार आणि प्रचंड तोफखाना अशा बलाढ्य सैन्याविरुद्ध दि. 31 डिसेंबर 1817 रोजी रात्री 10 वाजता शिरूर छावणीतील मुंबई देशी पायदळाच्या पहिल्या रेजिमेंटच्या दुसर्‍या महार बटालियनला छावणीचे प्रमुख कर्नल फिल्समन यांनी लढाईचा आदेश जारी केला. कॅप्टन फ्रान्सिस स्टांटन यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळच्या अवघ्या पाचशे महार सैनिकांच्या तुकडीने दिलेली कडवी झुंज म्हणजे ज्यांचे पारंपरिक शत्रू असलेले पेशवे आणि ज्यांचे सामाजिक गुलाम असलेले महार, या दोघांची काळानेच सूड घ्यावा अशी कैक वर्षांनी समोरासमोर घडवून येणारी भेट ही जणू एक अघटित वेळ असावी, पेशव्यांच्या अठ्ठावीस हजार सैन्यांचा हिशेब करण्यापेक्षा शतकांच्या गुलामीचा हिशेब चुकता करावा आणि जे काही घडेल ते भीमा नदीच्या काठावरच घडेल, एक तर पेशवे संपतील, नाही तर महार, जणू याच जिद्दीने लढाईला सुरुवात झाली होती.

या लढाईचे वैशिष्ट्य म्हणजे रात्री 8.30 वाजता महार बटालियनची तुकडी, इंग्रजांच्या पुना छावणीचे 250 घोडेस्वार आणि मद्रास तोफखान्याचे 24 इंग्रजी सैनिक, ज्यांच्याकडे 6 पौंडी दोनच तोफा होत्या, अवघी कुमक एकत्र करण्यात येऊन शिरूरहून कडाक्याच्या थंडीचा सामना करत पुण्याच्या दिशेने 26 मैल अंतर पायी चालत 1 जानेवारी 1818 रोजी सकाळी कोरेगाव येथे पोचली. क्षणाचीही उसंत न घेता सकाळी 9 वाजता लढाईला सुरुवात झाली.उपाशीपोटी, पाण्याच्या थेंबाविना हे सैनिक 12 तास सतत लढत राहून त्यांनी विजय खेचून आणला. ‘हा विजय ब्रिटिश सरकारचे सुभाग्य आहे.’ असे फ्रान्सिस स्टांटन यांनी भावोद्गार काढले होते. 

भीमा नदीच्या पाण्यावर जेथे दोन उतार होते, त्या दिशेने इंग्रजांनी दोन तोफा रोखून ठेवल्या होत्या;  पण त्यांचा मारा अचूक होत नसल्यामुळे त्या तोफा पुन्हा कोरेगावच्या तटबंदीच्या आत मोक्याच्या ठिकाणी नेऊन मारा सुरू केला. अशा परिस्थितीतच पेशव्यांचे सैन्य नदी पार करून कोरेगावच्या मैदानावर येण्यास यशस्वी ठरले. पेशव्यांची प्रचंड सेना असल्यामुळे महार सैनिकांनी गनिमी काव्याने कोरेगावात शिरकाव केला व गल्लोगल्लींतून पेशव्यांच्या घोडेस्वारांशी मुकाबला केला. इंग्रजी सैन्याने गावातील गल्लींचा आणि घरांचा आधार घेतल्यामुळे पेशव्यांच्या प्रचंड सेनेला आत घुसता येत नव्हते; मात्र पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी आपले सैन्य भीमा नदीच्या काठावर तैनात करून नदीकाठाकडे जाणारे मार्ग बंद केले आणि इंग्रजी सैन्याचे पाणी तोडण्याची रणनीती केली. इंग्रजी सैनिक तहानेने व्याकुळ झाल्यानंतर ते कोसळून पडतील व माघार घेतील; पण पेशव्यांचा हा डाव फोल ठरला. 

ही तुंबळ लढाई रणरणत्या उन्हात चालूच राहिली. इंग्रजांचे लेफ्टनंट चिशोम तोफा डागत असताना पेशव्यांच्या सरदारांनी त्याचा शिरच्छेद केला व मद्रास तोफखान्याचे इंग्रजी सैनिक मारले गेले. लेफ्टनंट कोनलेन, असिस्टंट सार्जंट वुईगेट हे जखमी झाले. स्वतः फ्रान्सिस स्टांटन किरकोळ जखमी झाले. जखमींना ठेवण्यात आलेल्या गावातील धर्मशाळांवर शत्रूपक्षाने कब्जा करून त्यांना ठार केले. याचवेळी फ्रान्सिस स्टांटनने ‘अंतिम सैनिक आणि अंतिम गोली’ असा इशारा दिल्यानंतर महार रेजिमेंटचे सैनिक लढाईवर तुटून पडले. सूर्यास्तानंतर पेशव्यांच्या सैन्यांनी पळून जायला सुरुवात केली. पराभव अटळ असल्याची वार्ता बाजीराव पेशव्यांच्या कानी पडताच त्यांनी फुलगावला पलायन केले. बापू गोखलेने लढाईतून सासवडला पळ काढला. रात्री 9.30 वाजता अखेर पेशवे सैन्याने माघार घेतली आणि ब्रिटिशांनी लढाईला पूर्णविराम दिला. 

विशेष बाब म्हणजे, या लढाईत स्वतः बाजीराव पेशवे एका उंचवट्यावर पन्नास तोफांच्या शेजारी उभे राहून आपण फौजेत असल्याचे भासवत सैन्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत होते. या लढाईनंतर बाजीराव पेशवे इंग्रजी फौजांना तोंड देऊ शकले नव्हते. त्यांच्या वाट्याला भटकंती आली. लवकच ते इंग्रजांना शरण गेले आणि पुण्यावर इंग्रजांचा युनियन जॅक फडकला होता. ही लढाई बाजीराव पेशव्यांच्या एकंदर कारकिर्दीचा अंत करणारी ठरली. 

हजारो वर्षे मनुस्मृतीने ज्यांना शस्त्र धारण करण्यास मनाई करून सामाजिक दास्यशृंखलांत जखडून ठेवले होते. सामाजिक गुलामगिरी लादून ज्या पूर्वाश्रमीच्या महार जमातीचा र्‍हास घडवून त्यांचे अस्तित्व आणि ओळखच पुसून टाकली होती, तर पेशवाईत त्यांच्या गळ्यात थुंकण्यासाठी गाडगं आणि पावलाच्या खुणा पुसण्यासाठी ढुंगणाला फेसाठी बांधली होती, ज्यांना क्षुद्र मानून शस्त्र वापरण्यास मनाई करण्यासाठी ज्याअर्थी मनुस्मृतीसारखी संहिता करणे भाग पडले होते, त्याअर्थी महार ही शूर व लढवय्ये जमात असल्याचे इंग्रजांना मनुस्मृतीचे कसब आकलन झाले आणि याचा फायदा घेऊन त्यांनी शुद्रांच्या हातांत शस्त्रे दिली आणि ते मूळचे लढवय्ये आहेत, हे ऐतिहासिक कटू सत्य सिद्ध केले. ही लढाई मानवमुक्तीच्या उदयाची नांदी आणि मनुस्मृतीचा पराभव, सामाजिक गुलामगिरीचा अस्त असे त्याचे यथार्थ विश्‍लेषण केले जाते. पेशव्यांचे बलाढ्य सैन्य असूनदेखील महार रेजिमेंटच्या अवघ्या 500 सैनिकांनी हा विजय नोंदवण्यामागे त्यांच्यात निर्माण झालेली उर्मी म्हणजे त्यांनी हजारो वर्षे भोगत असलेल्या वर्णभेदावर घेतलेला तो अघोरी सूड होता. ही लढाई त्यांना चालून आलेली संधी होती आणि ती त्यांनी पुरेपूर गाजवली. त्यांच्यामध्ये प्रचंड इच्छाशक्ती निर्माण झाली. पेशव्यांनी केलेला अपरिमित सामाजिक छळ लढताना क्षणाक्षणाला त्यांच्यामध्ये चीड निर्माण करीत होता. याच लांच्छनातून मुक्त होण्याची त्यांनी ऐतिहासिक संधी सोडली नाही. ते अस्मितेसाठी लढले.

शौर्याला जात आणि धर्म नसतो हे त्यांनी दाखवून दिले. खरे तर, हा शुद्रोदय होता. महार सैनिक इंग्रजांचे चाकर होते; परंतु परकीय इंग्रजांना त्या सैनिकांच्या शौर्याचा स्तंभ उभारण्याची गरज का भासली? यातच या लढाईचा इतिहास सामावलेला आहे. आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेले महार रेजिमेंटचे संचलन गीत ‘वीर शिवाजी के बालक हम, है महार सैनिक हम, हम, हम’ या गीताने संचलन करूनच महार रेजिमेंटची तुकडी लढाईवर गेली होती.

या लढाईत पेशव्यांचे 300 पेक्षा अधिक सैन्य मारण्यात आले, तर ब्रिटिशांच्या मद्रास तोफखान्याचे 12 सैनिक, महार रेजिमेंटचे 22 सैनिक धारातीर्थी पडले. याच लढाईत शौर्य गाजविलेल्या महार सैनिकांच्या गौरवार्थ ब्रिटिश सरकारने उभारलेल्या स्तंभावर सोमनाक कमळनाक नाईक, रायनाक येसनाक नाईक, गोंदनाक कोढेनाक, रामनाक येसनाक, भागनाक हरनाक, अंबनाक काननाक, रूपनाक लखनाक इत्यादी सर्व शाहिदांची नावे कोरण्यात आली.

या स्तंभाची प्रतिकृती ब्रिटिश लष्करातील महार बटालियनचा लोगो म्हणून करण्यात आली. सन 1851 ला एक खास पदक सुरू करण्यात आले. ज्याच्यावर एका बाजूला 'To The Army of India' व दुसर्‍या बाजूला ‘किरकी तथा कोरेगाव’ असे मुद्रित करण्यात आले. आजच्या महार रेजिमेंटचे हेच मानचिन्ह आहे. प्रतिवर्षी 1 जानेवारी या दिवशी या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमा-कोरेगाव येथे तत्कालीन ब्रिटिश लष्कराची तुकडी दाखल होऊन विजयस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देत असे. आज भारतीय लष्कराची तुकडीदेखील विजयस्तंभाला मानवंदना देते. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभ आपला प्रेरणास्रोत मानला होता. 1 जानेवारी 1927 रोजी त्यांनी आपल्या सहकार्‍यांसोबत विजयस्तंभाला भेट दिली. या समरभूमीतूनच त्यांनी मानवमुक्तीचे रणशिंग फुंकले होते. त्यांनी 19 व 20 मार्च 1927 रोजी महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह करून आपल्या जीवित कार्याला सुरुवात केली. प्रतिवर्षी 1 जानेवारी रोजी ते भीमा-कोरेगाव येथे महार परिषद भरवत असत. तेव्हापासून ते आजपर्यंत आंबेडकरी बांधव विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमा-कोरगाव येथे दाखल होतात. हा दिवस ‘शौर्यदिन’ म्हणून साजरा केला जातो. या लढाईच्या द्विशताब्दीनिमित्त केलेला हा छोटासा प्रयास.
 • मोरपीस

  Dec 31 2017 1:27AM


 • मोरपीस

  Dec 31 2017 1:27AM


 • मोरपीस

  Dec 31 2017 1:27AM


 • मोरपीस

  Dec 31 2017 1:27AM