Fri, Dec 13, 2019 19:25होमपेज › Bahar › ललित: वाघोबा वस्तीला... 

ललित: वाघोबा वस्तीला... 

Published On: Aug 04 2019 1:46AM | Last Updated: Aug 03 2019 9:51PM
वैजनाथ महाजन

भविष्यात भारत देश लोकसंख्येच्या विस्फोटाकरिता  जसा ओळखला जाणार आहे, तसाच तो वाघाचा देश म्हणूनही ओळखला जाईल, असे प्रसाद चिन्ह दिसते आहे. म्हणजे, हे जरी लोकसंख्येच्या प्रमाणातील वाघ संख्येचे प्रमाण नसले, तरी देशात वाघाची संख्या वाढते आहे. याचा सर्वच प्राणिमित्रांना मनोमन आनंद आहे. या निमित्ताने देशाचे पंतप्रधान जंगल सफ ारी करून आले. हीपण तशी आनंदाचीच बाब म्हटली पाहिजे. हे सारे जरी आपणास प्रसंगी प्रशसनीय वाटत असले, तरी वाढती वाघांची संख्या आणि घटती जंगलांची संख्या या व्यस्त प्रमाणातून जे प्रश्‍न समोर येत आहेत, ते मात्र नजरेआड करून चालणार नाही. वाघ हा तसा अत्यंत प्राचीन म्हणून ओळखला जाणारा असा प्राणी आहे. ज्ञानेश्‍वर भिंतीवरून जेव्हा चांगदेवाला सामोरे गेले, तेव्हा चांगदेव वाघावर बसून आले होते. ही कथा आपण सर्वांनीच अबोध वयात ऐकलेली असते. याचा अर्थ, वाघाचा आणि माणसाचा सलोखा तसा शतकानुशतकाचा आहे, असे म्हणण्यास वाव आहे. असे असले तरी माणूस वाघाला घाबरून असतो आणि त्यावेळी वाघसुद्धा माणसाला घाबरून असतो, हेही आपण अनुभवत आलो आहोत. कदाचित, आपल्याकडे पूर्वीच्या सर्कशीतून  रिंगमास्टर ही जी बिरूदावली समोर आली. तीसुद्धा वाघाकडून हवे ते खेळ करून घेणारा माणूस म्हणजे रिंग मास्टर असे म्हणण्यास निश्‍चितच वाव आहे. अशा पशूंना वेठीस धरू नये; म्हणून सर्कशीवर बंदी आली. हे योग्यच आहे; तरीपण माणसाच्या मनात वाघाबद्दल जे सुप्‍त आकर्षण आहे, ते कधीच लपून राहिलेले नाही. त्यामुळे जरी सर्कशी काळाच्या उदरात गडप झाल्या असल्या, तरी  वाघ मात्र आजही आपली सोबत करू पाहत आहे. त्याकरिता तो थेट मानवी वसाहतीत येऊन एखाद्या लेकराला उचलून नेतो. अथवा एखाद्या गरीब गाईला आपले भक्ष्य बनवीत असतो. यामुळे आजूबाजूची माणसे घाबरून जातात आणि वनाधिकार्‍यांकडे धाव घेत असतात. मग वाघाला दटावणे सुरू होते. जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न होतो. आणि वाटेल ते करून वाघाला शरण आणले जाते. प्रसंगी यात वाघ दगावतो, हेपण आपण पाहत आलो आहोत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि कदापि टाळता येणार नाही, अशी बाब म्हणजे माणूस आज वाघांपेक्षा क्रूर होऊन त्याचे वस्तिस्थान हिसकावून घेऊ लागला आहे. त्यातूनच जंगले, सफाछाट केली जात आहेत. जेव्हा मुंबईत जुन्या इमारती कोसळतात, तेव्हा तिथे राहणार्‍या माणसांची जी अवस्था होती, तीच अवस्था नेमकी आता आपल्या वाघांची होऊ लागली आहे. त्यांना मनुष्य वस्तीत घुसण्याशिवाय आपण जर पर्यायच ठेवणार नसू, तर वाघ जरी शक्‍तिशाली असला, तरी बिचारा होऊन जातो आणि मग  दिसेल त्या जागी आश्रय करू लागतो. माणसाला राहायला घर नसेल, तर शासन त्याला घर बांधून देते. त्याचे सगेसोयरे त्याला मदत करतात; पण अगतिक झालेल्या वाघोबांनी कुठे जायचे? निसर्ग साखळीतील वाघ हा महत्त्वाचा प्राणी आहे. तो जंगलात राहतो आणि जंगलावर आपली दादागिरीपण सहज प्रस्थापित करत असतो. त्यामुळे जंगलातील अनेक लहान-मोठे प्राणी वाघाला वचकून असतात; तरीपण जर कुणी त्यांच्या वाटेला गेले नाही, तर तो कारणाशिवाय कुणावरही हल्ला करत नाही, असे जाणकार सांगतात. शिकारींकरिता तो प्राणी मारतो, ही गोष्ट खरी आहे; पण ते ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या अर्थाने जंगलाचा नियम म्हणून आपण स्वीकारतच असतो. त्यामुळे आपण त्यात हस्तक्षेप करणे, तसे बाधकच म्हटले पाहिजे. वाघ हा प्राणी त्याला  कडाडून भूक लागल्याशिवाय भक्ष्य शोधण्याच्या मागे लागत नाही. समजा  दिवसभर त्याला काहीही खायला मिळाले नाही, तर संध्याकाळच्या वेळी म्हणजे सांजावताना एका मोठ्या झाडाखाली जाऊन उभा राहतो आणि मोठ्याने डरकाळी फोडतो. त्याच्या डरकाळीने  झाडावर बसलेल्या अनेक माकडांपैकी वय झालेली एक-दोन माकडे का होईना खाली पडतात आणि वाघाची भूक भागली जाते. इतका तो विचारपूर्वक वागणारा असा हिंस्र प्राणी असला, तरी  उगाचाच भय दाखविणारा असा प्राणी काही म्हणता यायचा नाही. अशा वाघाला आज आपण बेघर करत आहोत. त्याचा निवारा अत्यंत थंड डोक्याने काढून घेत आहोत. अशा वेळी जर असंख्य वाघ एकावेळी सैरभैर झाले, तर आपली काय अवस्था होईल, याचाही आपण विचार करत नसू, तर हे वाघाचे दुर्दैव असणार नाही, तर सर्वस्वी आपले दुर्दैव असेल. त्यामुळे वाघांची संख्या वाढविणे ही जशी आपणास आपली महत्त्वपूर्ण भूमिका वाटते आहे, तसेच त्यांची वस्ती, त्यांचे निवारे सुरक्षित ठेवणे हीपण आपली तितकीच मोठी जबाबदारी मानून, भविष्यात याकरिता ठोस पावले उचलली पाहिजेत. जंगलातील प्राणी जंगलातच शोभून दिसतात आणि अशा प्राण्यांच्या समृद्धीशिवाय जंगलालासुद्धा खरे वैभव प्राप्‍त होत नसते; पण आज मात्र आपण अशी जंगले गिळंकृत करण्याचा जणू सपाटाच सुरू केला आहे. आपल्या वस्त्या या वाढतच जाणार आहेत. कारण, एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या निवार्‍याकरिता लागणारी जागा ही तशी वाढतच राहणार. याचा दुसरा परिणाम आपली जंगल संपदा आपोआपच कमी होत जाणार. ज्या पद्धतीने आपण आज  शेतजमिनीची जेवढी काळजी काटेकोरपणे घेतली पाहिजे, तेवढी घेताना दिसून येत नाही. त्यामुळे रीतसर मार्गांनी अथवा वाममार्गांनी जमिनी भराभर बिगरशेती होताना दिसून येतात. हे काही शहाणपणाचे नक्‍कीच लक्ष मानता येणार नाही. कारण, आपण आता फक्‍त पृथ्वीचे एकमेव मालक असल्याच्या तोर्‍यात वावरू लागलो आहे; पण हे खरे नाही. फार पूर्वी ‘द बर्डस्’ नावाचा एक सुरेख सिनेमा निघाला होता. त्यातील पक्षी माणसांवर कसे हल्ले चढवितात, त्याचे अत्यंत अस्वस्थ करणारे चित्रण या सिनेमात होते. आता  त्या पक्ष्यांची जागा जर उद्या वाढत्या वाघांनी घेतली, तर मुळीच आर्श्‍चय वाटण्याचे कारण नाही. ‘जगा आणि जगू द्या’ हा एकूणच जीवांचा मूलमंत्र असला पाहिजे. अशा वेळी वाघांना सामावून घेण्यासाठी जंगले वाढविण्याकरिता आपण कटिबद्ध असले पाहिजे. असे झाले नाही, तर वाघ वाढतील आणि ते आपल्या विरोधात डरकाळी फोडू लागतील. इतकेच नाही, तर अगदी दारातून घरात येऊन बसतील  आणि आपण पळण्यासाठी वाट शोधण्याचा प्रयत्न करू लागू. असेच जर होऊ नये असे वाटत असेल, तर वाघांशी मैत्री ही त्यांचे निवारे सुरक्षित करण्यातूनच आपणास सिद्ध करता येईल, असे वाटते.