भावनिक बुद्धिमत्ता अधिक, तितकी तणावग्रस्तता कमी

Last Updated: Mar 21 2020 10:23PM
Responsive image


डॉ. रमा मराठे,
मनोविकास व मानसोपचार तज्ज्ञ

भावनिक हुशारी म्हणजे तुमच्या भावना अक्कलहुशारीनं उपयोगात आणता येणं. भावनांची (स्वतःच्या आणि इतरांच्या) समज आणि उमज, उपयोजन आणि व्यवस्थापन करण्याची क्षमता म्हणजे भावप्रज्ञा किंवा भावनिक बुद्धिमत्ता-इमोशनल इंटेलिजन्स आणि त्याचं मापन म्हणजे ‘इमोशनल कोशंट’ (ई.क्यू.) माणसाचं एकमेकांशी वागण्याचं कौशल्य किंवा माणसा-माणसामधलं मानसशास्त्र म्हणजे ‘सोशल कोशंट’ (एस.क्यू.). माणसाचं यश आणि सुख दोन्हीही बुद्ध्यांकावर (आय.क्यू.) फक्त 20 टक्के आणि इतर गोष्टींवर विशेषतः भावनिक आणि सामाजिक बुद्ध्यांकावर 80 टक्के अवलंबून असतं. जगात तीनच गोष्टी आहेत - आपण स्वतः, इतर व्यक्ती आणि परिस्थिती.

यात काही तरी न्यून, धोका, असुरक्षितता यांची जाणीव होते, तेव्हा ताण येतो. ज्यांचा ई.क्यू./एस.क्यू. चांगला असतो, ती माणसं अर्थातच कौशल्यानं स्वतःला-इतरांना-परिस्थितीला ‘मॅनेज’ करणं, त्यातील समस्या ओळखणं आणि त्यावर चपखल उपाय शोधून मात करणं हे सहज करू शकतात. अर्थात, तणावग्रस्तता टाळू शकतात. बुद्ध्यांक (आय.क्यू.) जन्मदत्त असतो. तो फारसा बदलता येत नाही. भावनिक (ई.क्यू.) आणि सामाजिक बुद्ध्यांक (एस.क्यू.) मात्र जीवनभर सातत्यपूर्ण प्रयत्नांनी वाढविता येतो. ई.क्यू. आणि एस.क्यू. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. म्हणूनच ई.क्यू. आणि एस.क्यू. हे परस्परावलंबी आहेत. जी माणसं अतिबुद्धिमान असूनही आयुष्याच्या परीक्षेत अयशस्वी ठरतात त्यांचा ई.क्यू. आणि एस.क्यू. कमी असतो. फक्त ‘आय.क्यू.’-बुद्ध्यांक खूप असणं प्रत्यक्ष आयुष्यात सुखी आणि यशस्वी होण्यासाठी पुरेसं आणि उपयोगी ठरत नाही.

‘इमोशनल इंटेलिजन्स’साठी पाच मूलभूत क्षमता मानल्या गेल्या आहेत.

1) स्वतःला ओखळणं
2) स्वतःला मॅनेज करणं
3) समाजातील लोकांना ओळखता येणं
4) समाजातील लोकांना अथवा नात्यांना ‘मॅनेज’ करता येणं
5) समानुभूती

आपण स्वतः एखादी भावना अनुभवली नसली, तरी तीच भावना दुसर्‍याला वाटते आहे हे कसं समजून घेता येणार? त्यामुळेच ‘इमोशनली इंटेलिजंट’ असण्यासाठी आधी स्वतःच्या भावनांचं विश्लेषण करता येणं अतिशय गरजेचं आहे. उदाहरणार्थ - आगीत हात होरपळतो, भाजतो आणि आग आग होते. हा अनुभव घेतल्याशिवाय, तो त्रास, दुःख निवारण्यासाठी काय करायचं हे कसं कळणार? भाजल्यामुळं नेमकं काय आणि कसं वाटतं ते पुस्तकात वाचून, ऐकून किंवा बद्धिविचार वापरून कल्पना करणं यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव फार वेगळा असतो.

भावनांचा अनुभव घेणं आणि त्या ओळखणं यात खूप मोठा फरक आहे. आपण सर्वजण भावनांचा अनुभव घेतो; पण फार थोडेजण त्या भावना प्रत्यक्ष ओळखतात. जी माणसं स्वतःच्या भावनांचा अनुभव घेतात, त्या ओळखतात आणि त्यांच्या मनात स्वतःच्या भावनांबद्दल स्पष्टता असते, त्यांची भावनिक बुद्धिमत्तेची पातळी उच्च असते. (ई.क्यू.)

तुम्ही तुमच्या भावना ओळखू शकत असाल, तर तुम्ही तुमच्या भावनांचं नियंत्रणही करू शकता आणि इतरांच्या भावनाही ओळखू शकता किंवा सहअनुभूती, समानुभूती घेऊ शकता. जेणेकरून तुमची सामाजिक बुद्धिमत्ताही (एस.क्यू.) वाढते.

इतरांना काय वाटतं हे जाणण्याची क्षमता म्हणजे सहअनुभव. बोलल्या जाणार्‍या शब्दांच्या विरुद्ध असणार्‍याही निःशब्द सूचना वाचता येण्याची क्षमता ही माणसाच्या मनात आणि परिस्थितीत खरोखर काय घडतं आहे हे समजण्यासाठी मदत करते. त्यामुळं ताण येत नाही. लक्षात घ्या, ही क्षमता म्हणजे तुमची करिअर, मैत्री, विवाह, प्रेम, नातेसंबंध, मुलांचं संगोपन, नेतृत्व, व्यवस्थापन, व्यावसायिक क्षेत्र यातील यशाची गुरुकिल्ली आहे.

सोशल कोशंट - एस.क्यू. - हे सोशल इंटेलिजन्स म्हणजेच सामाजिक बुद्धिमत्ता मोजण्याचं साधन आहे. यात 100 हे सरासरी गुण मानले जातात. सर्वसाधारण लोकांचा एस.क्यू. 85 ते 115 असतो. 140 पेक्षा ‘एस.क्यू.’ जास्त असलेली माणसं ‘सोशली इंटेलिजंट’ समजली जातात. ‘एस.क्यू.’ 85 पेक्षा कमी असला, तर माणसाला मित्र जमवायला, संवाद साधायला तितकंसं जमत नाही. सहज नोकरी मिळत नाही, मिळाली तर टिकत नाही किंवा त्यात प्रमोशन-बढती मिळत नाही. त्यांचे नातेसंबंधही फारसे उपयुक्त नसतात. टेबलावर बसून करायची किंवा एका ठराविक पद्धतीनं, विशिष्ट क्रमानं करायची कामं - ज्यात फारसे निर्णय घ्यावे लागत नाहीत, इतरांशी संबंध येत नाही, तेवढीच त्यांना जमतात. हाताखालच्या लोकांकडून कामं करून घेणं किंवा बॉसची मर्जी सांभाळणं त्यांना अवघड वाटतं. 128 पेक्षा जास्त एस.क्यू. असलेली माणसं विक्री कौशल्य किंवा संवाद कौशल्य सहज आत्मसात करतात व मार्केटिंगची कामं किंवा नेतृत्व व्यवस्थापनाचं काम उत्तम प्रकारे करू शकतात.

जगभरातील वेगवेगळ्या संस्था, संघटनांनी त्यांचे सर्वोच्च उच्चपदस्थ अधिकारी कोण असावेत, हे ठरविताना स्वतंत्रपणे ज्या क्षमतांना प्राधान्य दिले त्याच्यावर बारकाईने नजर टाकल्यास असं लक्षात येतं की, वरच्या पातळीवरील नेतृत्वासाठी इमोशनल सोशल इंटेलिजन्स म्हणजे भावनिक-सामाजिक बुद्धिमत्ता महत्त्वाची मानली गेली. येथे बुद्ध्यांक व तांत्रिक कुशलता हा निकष कमी महत्त्वाचा मानला गेला, जो खालच्या पातळीवरील कामांसाठी मात्र यशाची हमी देणारा असतो. एकंदरीत तुम्हाला नोकरी मिळते ती ‘आय.क्यू.’ आणि तुमच्या डिग्रीमुळं. मात्र, बढती मिळते ती ई.क्यू., एस.क्यू.मुळं!
ई.क्यू.-एस.क्यू. मानसशास्त्रीय चाचण्यांच्या सहाय्यानं मोजता येतात आणि योग्य प्रयत्नांनी वाढविता येतात.