याला जीवन ऐसे नाव

Last Updated: Apr 05 2020 1:01AM
Responsive image


डॉ. रमा मराठे, मनोविकास व मानसोपचार तज्ज्ञ

तणावग्रस्तता ही अत्यंत त्रासदायक आणि क्लेशकारक अशी अवस्था आहे. त्यामुळं माणसं कळत-नकळत सुचेल आणि जमेल त्या तंत्राचा अवलंब तणावमुक्‍तीसाठी करीत असतातच, काहीजण मूलभूत असे राजमार्ग प्रयत्नांनी शोधतात, तर काहीजण सोपे तात्कालिक मार्ग, कधी चोरवाटा, कधी पळवाटा धुंडाळतात. ते करीत असलेली मात कधी वास्तव, तर कधी भ्रामक असते. वेळोवेळीच्या या परीक्षेत काहीजण नापास होतात, काहीजण पास होतात. काहीजण फर्स्टक्लास, तर काहीजण डिस्टिंक्शन मिळवितात. शतप्रतिशत गुण योगी, संत-महंतच मिळवू जाणे. तणावमुक्‍तीसाठी वापरले जाणारे विविध मार्ग पाहा - 

* सर्जन अशोक सांगतात, दिवसभर थकून घरी आलो की, हार्मोनियम घेऊन बसतो थोडावेळ!

* राजन म्हणतो, मी वैतागलो की सरळ माझ्या गावी जातो, दोन-तीन दिवस; मग इकडचं सगळं विसरतो. नदीत डुंबतो... मासे पकडतो... उरलेला वेळ मी आणि रंग, ब्रश... मस्त पेंटिंग्ज करतो.

* नवर्‍याची नोकरी फिरतीची, घरासाठी कर्ज काढलंय. त्यामुळं जयालाही नोकरी करावी लागते... मुलांचं सगळं करायचं, घरात आजारी सासू! ती थकून जाते अगदी. कधी कधी हा सगळा ताण अगदी असह्य होतो; बॉसनं काही सुनावलं की, वाटतं नोकरी सोडून द्यावी; पण मग कर्जाचे हप्‍ते कसे फेडणार? डोकं दुखायला लागतं. कधी झोप येत नाही. हल्ली रात्री झोपायला किती जरी उशीर झाला, तरी अर्धा तास काही तरी छान वाचते... शांत होते आणि मग झोपते. त्यामुळं दमले तरी दिवसभर आनंदात राहते. याला ‘जीवन ऐसे नाव’ असं म्हणून तिनं या सगळ्याचा न कुरकुरता स्वीकार केलाय. आपल्याला नोकरी आहे, याबद्दल ती देवाकडे कृतज्ञता व्यक्‍त करते. घरची कामं हलकी करण्यासाठी अनेक युक्त्या-प्रयुक्त्यांचा तिनं वापर केला आहे. मुलांना शिस्त लावली आहे. अनेक बाबतीत त्यांना स्वावलंबी केलं आहे. मैत्रिणींनी काही काम वाटून घेतली आहेत.

* वसुधाताई कलावती आईंच्या मंदिरात. मुलगा-सून विचारीत नाहीत या दु:खातून आता त्या खूप सावरल्या आहेत.

* ब्रह्माकुमारीचं राजयोग शिबिर आणि माऊंट अबूची यात्रा यामुळं मुकुंदराव पत्नी निधनाच्या धक्क्यातून बाहेर पडले.

* प्रसाद सांगतो, विपश्यना शिबिराचा मला खूप फायदा झाला. त्यामुळं माझं वाढलेलं ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये आलं. शांत वाटतं.

* ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चा कोर्स केल्यापासून माझ्या मनाला शांती मिळू लागलीय... आशा म्हणत होती.
खडउजछ, कृष्णमूर्तींचं तत्त्वज्ञान, साईबाबांची भक्‍ती, रजनीश आश्रम, पंढरपूरची वारी... अशी अनेक उदाहरणं देता येतील. श्रद्धा, भक्‍ती, तत्त्वज्ञान आणि योगसाधना यावर आधारित असे हे मार्ग तणावमुक्‍तीसाठीच!

* ब्लडप्रेशर वाढलंय... डॉक्टरांनी ताण कमी करा म्हणून सांगितलंय. मि. पाटील ब्लडप्रेशर, डायबेटिस या आजारांच्या गोळ्यांसोबत रोज रात्री झोपेची गोळी घेऊन झोपतात. ताण कमी करण्यासाठी इतर काहीही न करता फक्‍त वेगवेगळी औषधं घेत राहतात. त्यानं दिवसाही झोप येते म्हणून वर चहा-कॉफीचा मारा आणि त्यामुळं होणार्‍या अ‍ॅसिडिटीसाठी पुन्हा औषधं...

* त्यांचे मित्र इनामदार सांगतात, टेन्शन आलं की, आपण बुवा बाहेर जातो. झकास कोंबडीचं जेवण आणि वर... ‘नाकावर तर्जनी’...

* मिस्टर देसाई सांगतात, ‘मी तुझ्याइतका बोल्ड नाही; पण रोज दोन पेग मारतो, एवढं मात्र खरं... त्याशिवाय झोपच येत नाही.

* मोठमोठ्या कंपन्या आपल्या नोकरवर्गासाठी आत्मविश्‍वास साधणारी शिबिरं, कार्यशाळा भरवितात. या ऑफिसर्सच्या मनावरील व्यवस्थापनाचा महत्त्वाचे निर्णय घेण्याचा ताण हलका कसा करावा, याचं तंत्र त्यांनी आत्मसात करावं म्हणून हा सगळा खटाटोप असतो. या शिबिरांची-कार्यशाळांची नावं साधारणपणे अशी असतात... ताणतणावांशी झुंज, लेट अस टॉल्क अबाऊट स्ट्रेस, आर्ट ऑफ लिव्हिंग, टाईम मॅनेजमेंट व्यवस्थापन कौशल्य इत्यादी.

* डॉक्टर, एवढं टेन्शन आलेलं की सरळ ज्योतिष्याकडे गेलो. तो म्हणाला, शनीची साडेसाती आहे. सध्या दोन वर्षे अशीच त्रासात जाणार. त्यानं शनी माहात्म्य वाचायला सांगितलंय. प्रदीप सांगत होता.
तणावमुक्‍तीसाठी अशी अनेक तंत्र माणसं कळत-नकळत वापरतात हे आपल्याभोवती आपण पाहतोच; पण अनेकांना तणावमुक्‍तीच्या योग्य तंत्र-मंत्रांची माहिती नसते. त्यामुळं ही तंत्रं कशी वापरावीत, हे त्यांना कळत नाही. काहीजण एक-दोन तंत्रच सर्व समस्यांसाठी वापरतात व अपयशी ठरतात. आपण उन्हाळ्यात सुती कपडे, पावसाळ्यात रेनकोट आणि हिवाळ्यात स्वेटर वापरतो की नाही? कारण प्रत्येक वेळची समस्या (ताणतणावांचा प्रकार) वेगळी असते. तेव्हा तणावमुक्‍तीची तंत्रं अनेक आहेत व ती अनुभवाधिष्ठित आहेत. मानसशास्त्रीय निकषांनुसार पद्धतशीर विकसित केलेली आहेत. प्रत्येक तंत्राची वैशिष्ट्ये, फायदे, उपयोग, निर्देश वेगवेगळे आहेत आणि प्रत्येक तंत्राला त्याच्या अशा मर्यादाही आहेत. म्हणूनच तणावमुक्‍तीचे राजमार्ग माहीत करून घ्यायचे आणि ते आपल्या समस्यांसाठी चपखलपणे वापरायचे. मग प्रत्येक दिवस राजेपणाचा! ताणतणावांवर स्वार होण्याचा!