डॉलर भाव का खातो?

Published On: Sep 08 2019 1:36AM | Last Updated: Sep 07 2019 8:35PM
Responsive image


अमोल पवार, कॅलिफोर्निया

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण हा विषय सध्या चर्चेचा आहे. डॉलर हे जगभरात सर्वाधिक स्वीकारार्ह चलन असल्यामुळे सर्वच देशांच्या चलनांचे विनिमय दर डॉलरच्या तुलनेत निश्चित होतात. आंतरराष्ट्रीय व्यापारात बहुतांश पेमेंट डॉलरच्या स्वरूपातच स्वीकारले जाते. डॉलरमध्ये असे काय आहे आणि तसेच का आहे, हे या निमित्ताने जाणून घेणे आवश्यक आहे.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या मूल्यात सातत्याने घसरण होत आहे. सध्या अमेरिकी डॉलरचे मूल्य 72 रुपयांच्या आसपास पोहोचले आहे. बँका आणि आयातदारांकडून डॉलरला असलेल्या मोठ्या मागणीचा हा परिणाम आहे. आयातदार असहाय आहेत; कारण कोणत्याही देशातील पुरवठादारांना डॉलरच्या स्वरूपात पेमेंट हवे असते. परदेशी चलनातील ट्रेडर्सचे म्हणणे असे आहे की, अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापारी युद्धामुळे रुपया दबावाखाली आहे. युआन या चीनच्या चलनातही मोठी घसरण झाली आहे; परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा असा आरोप आहे की, चीन जाणीवपूर्वक आपले चलन कमकुवत करीत आहे. चीनने असे केल्याने अमेरिकेतून चीनमध्ये आयात झालेल्या वस्तू आपोआप महाग होतील, म्हणून हा खटाटोप केला जात असल्याचा हा आरोप आहे. ट्रम्प यांची शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नाही. कारण, निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आयात कमी करण्यासाठी चीनने वारंवार युआनचे अवमूल्यन केले आहे; परंतु चीनने यावेळी अधिकृत स्वरूपात अवमूल्यनाची घोषणा केलेली नाही.

स्थानिक चलनाचे मूल्य घसरल्यानंतर निर्यातदारांना फायदा होतो; कारण त्यांना डॉलरमध्ये मिळणार्‍या उत्पन्नाची स्थानिक चलनात किंमत वाढते. याउलट, आयातदारांना सौदे महागात पडतात; कारण पुरवठादारांना देण्यासाठी त्यांना डॉलरची व्यवस्था करावी लागते आणि त्यासाठी अधिक प्रमाणात स्थानिक चलन खर्ची पडते. डॉलरला जागतिक चलनाच्या रूपात असलेली व्यापक स्वीकारार्हता ही अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची ताकद आहे. अर्थात, डॉलरलाही युरोचे मोठे आव्हान आहे; परंतु युरोपीय संघाच्या या चलनाला डॉलरची जागा घेण्यासाठी अजून मोठी वाटचाल करावी लागणार आहे. युआन हे चलन मजबूत करण्याचा चीनचाही नेहमी प्रयत्न असतो. इंटरनॅशनल स्टँडर्डस् ऑर्गनायझेशनच्या यादीनुसार, जगभरात आजमितीस 185 चलने अस्तित्वात आहेत. यातील बहुतांश चलनांचा वापर देशांतर्गत व्यवहारांसाठीच केला जातो; परंतु अमेरिकी डॉलरचा वापर देशांतर्गत व्यवहारांपेक्षा अधिक जगात इतरत्र केला जातो. वस्तुतः, एखाद्या देशाचे चलन देशाबाहेर अन्य बाजारपेठांमध्ये किती प्रमाणात प्रचलित आहे, हे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या ताकदीवर अवलंबून असते. अर्थातच, अमेरिकी डॉलरची जगभरातील सर्वाधिक स्वीकारार्हता अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची ताकद दर्शविते. 

कोणत्याही देशाचे चलन त्या देशातील व्यवहारांमध्ये अधिक प्रमाणावर वापरले जाते; परंतु अमेरिकी डॉलरच्या बाबतीत तसे घडत नाही. आश्चर्यकारक वाटेल; परंतु अमेरिकी डॉलरचा 65 टक्के वापर अमेरिकेच्या बाहेर होतो. आजमितीस 85 टक्के आंतरराष्ट्रीय व्यापारात डॉलरच्या रूपाने पेमेंट केले जाते. तसेच संपूर्ण जगभरात 39 टक्के कर्जेही अमेरिकी डॉलरच्या स्वरूपात दिली जातात. मार्च 2009 मध्ये चीन आणि रशिया यांनी संयुक्तरीत्या एका नव्या आंतरराष्ट्रीय चलनाची मागणी केली होती. संपूर्ण जगासाठी एक राखीव चलन (रिझर्व्ह करन्सी) तयार केली जावी, जी कोणत्याही देशाच्या चलनापेक्षा वेगळी असेल आणि दीर्घकाळ स्थिर राहू शकेल, अशी या दोन शक्तिशाली देशांची अपेक्षा आहे. असे आंतरराष्ट्रीय चलन अस्तित्वात आल्यास क्रेडिटवर आधारित राष्ट्रीय चलनांच्या वापरातून होणारे नुकसान टळू शकेल, असे या देशांचे म्हणणे आहे. डॉलरची चलनवाढ निश्चित झाली, तर आपल्याकडील अब्जावधी डॉलर कामाचे राहणार नाहीत, ही चिंता चीनला आहे. अमेरिकी कर्ज चुकते करण्यासाठी यूएस ट्रेझरीने नव्या नोटा छापल्या, तरच अशी स्थिती येणे शक्य आहे. त्यामुळेच चीनने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (आयएमएफ) डॉलरला पर्यायी चलन तयार करण्याची मागणी केली आहे. 

डॉलरची जगातील स्वीकारार्हता कशी वाढली, याचा इतिहास जाणून घेणेही आवश्यक आहे. 1944 मध्ये ब्रेटन वुड्स करारानंतर डॉलर मजबूत होण्याची प्रक्रिया सुरू झाली. तत्पूर्वी बहुतांश देश सोने हाच सर्वोत्तम निकष मानत होते. बहुतांश देशांची सरकारे असे आश्वासन देत होती की, आपल्या चलनाचे मूल्य सोन्याच्या भावाच्या आधारावर निश्चित केले जाईल. न्यू हँपशायरमधील ब्रेटन वुड्स येथे जगभरातील विकसित देशांची बैठक झाली होती आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत अन्य देशांनी आपापल्या चलनाचे दर निश्चित केले होते. त्यावेळी अमेरिकेकडे जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा होता. या करारान्वये अन्य देशांनाही आपापल्या चलनाचे विनिमय दर डॉलरच्या तुलनेत निश्चित करण्याची अनुमती देण्यात आली. 1970 मध्ये अनेक देशांनी डॉलरच्या मोबदल्यात सोन्याची मागणी सुरू केली. कारण, त्यावेळी चलनवाढीच्या म्हणजे ओघानेच चलनाचे मूल्य घटून महागाई वाढण्याच्या परिस्थितीशी लढणे ही अनेक देशांची गरज होती. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष निक्सन यांनी फोर्ट नॉक्सला आपले सर्व सोन्याचे साठे रिते करण्याची परवानगी देण्याऐवजी डॉलरला सोन्यापासून अलग काढले. तोपर्यंत डॉलर हे जगातील सर्वाधिक सुरक्षित चलन मानले जाऊ लागले होते. 

डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घटणारे मूल्य समजून घेण्यासाठी आपल्याला तीन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. अमेरिकी डॉलरची स्थिती जगभरात नेहमी मजबूत का असते? सर्वच देशांमधून होणार्‍या आयातीच्या मोबदल्यात डॉलरच का द्यावे लागतात? सर्वच देश आपापली परकीय चलनाची गंगाजळी डॉलरच्या रूपातच का ठेवतात? हे ते तीन प्रश्न होत. त्यांचा वेध घेताना आपल्याला डॉलरच्या मजबुतीची कारणे सापडतात. अमेरिकी डॉलरची ओळख एक जागतिक विनिमय चलन म्हणून आहे. याचा अर्थ असा की, डॉलरची स्वीकारार्हता जगभर आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात डॉलर आणि युरो खूपच लोकप्रिय चलने आहेत आणि मोठ्या प्रमाणावर ती स्वीकारली जातात.

हीच या चलनांची मोठी ताकद आहे. जगभरातील केंद्रीय बँकांच्या परदेशी चलनाच्या गंगाजळीत सरासरी 64 टक्के अमेरिकी डॉलरच असतात. युरो हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे शक्तिशाली चलन आहे. जगभरातील केंद्रीय बँकांच्या परदेशी चलनाच्या गंगाजळीत सरासरी 19.9 टक्के युरोचा समावेश असतो. 2007 मध्ये अमेरिकेतील केंद्रीय बँकेचे म्हणजे फेडरल रिझर्व्हचे तत्कालीन अध्यक्ष एलेन ग्रीनस्पॅन यांनी म्हटले होते की, युरो डॉलरची जागा घेऊ शकतो. 2006 च्या अखेरीपर्यंत जगभरातील केंद्रीय बँकांच्या परदेशी चलनाच्या गंगाजळीत युरोचे प्रमाण 25 टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. डॉलरचे प्रमाण त्यावेळी 66 टक्के होते. जगातील अनेक देशांमध्ये युरोचे प्रभुत्व आहे. युरोपीय महासंघ ही जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील एक असल्यानेच युरो मजबूत आहे. 

2016 च्या चौथ्या तिमाहीत चीनचे युआन हे चलन जगातील अन्य एक मोठे राखीव चलन (रिझर्व्ह करन्सी) बनले होते. मात्र, 2017 च्या तिसर्‍या तिमाहीपर्यंत जगभरातील केंद्रीय बँकांमध्ये 108 अब्ज डॉलर होते. यापुढील काळात विविध देशांच्या परदेशी चलनाच्या गंगाजळीत डॉलरचे प्रमाण वाढतच जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच वैश्विक चलन बाजारात आणि व्यापारात आपले चलन अधिकाधिक प्रमाणात वापरले जावे, असे चीनला वाटते. डॉलरच्या ऐवजी युआन हे चलन जागतिक चलन बनावे, असेच चीनचे स्वप्न आहे. त्यामुळेच चीन आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. चीनचे हे धोरण किती यशस्वी ठरते, हे येणारा काळच सांगू शकेल.