कोरोना आणि कासव

Last Updated: May 09 2020 8:16PM
Responsive image


राजीव मुळ्ये, 
पर्यावरण अभ्यासक

अनेक प्राणिप्रजातींना आपल्या नैसर्गिक अधिवासात मुक्त संचार करण्याची संधी कोरोनामुळे मिळाली आहे. ऑलिव्ह रिडले या दुर्मीळ प्रजातींच्या कासवांचे वर्णन ‘चमत्कार’ असेच करावे लागेल. यावर्षी लॉकडाऊनमुळे, मासेमारी आणि पर्यटन बंद असल्यामुळे ओडिशाच्या किनारपट्टीवर लाखोंच्या संख्येने कासवे आली आहेत आणि सुमारे एक कोटी अंडी त्यांनी घातली आहेत. 

निसर्गात नेहमीच छोटे-मोठे चमत्कार घडत असतात. आपल्याला कल्पनाही करता येणार नाही, अशा गोष्टी प्राणिविश्वात घडत असतात. हजारो किलोमीटरचा प्रवास करून स्थलांतरित पक्षी दरवर्षी नेमक्या वेळी इथे कसे येतात आणि पुन्हा योग्य वेळ येताच योग्य ठिकाणी कसे परततात, हे कोडे कोणालाच सुटलेले नाही. पक्ष्यांना जिथे स्थलांतर करायचे असेल तो प्रदेश, तिथे जाण्याचा मार्ग लक्षात कसा राहतो आणि पुन्हा त्याच मार्गाने आपल्या घरी ते कसे परततात, यावर अद्याप संशोधन सुरू आहे. ओडिशाच्या किनारपट्टीवर असाच एक चमत्कार दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरपासून एप्रिल-मेपर्यंतच्या काळात घडतो. ऑलिव्ह रिडले प्रजातीची लाखो कासवे हजारो किलोमीटरचा प्रवास करून या समुद्रकिनारी अंडी देण्यासाठी दरवर्षी येतात. विशेष म्हणजे, या अंड्यांमधून बाहेर येणारी इवली पिल्लेही तेवढाच प्रवास करून मूळ अधिवासात परत जातात. एवढेच नव्हे, तर सुमारे तीस वर्षांनंतर हीच पिल्ले प्रजननयोग्य होतात तेव्हा त्याच मार्गाने जिथे त्यांचा जन्म झाला त्या किनार्‍यावर अंडी देण्यासाठी न चुकता येतात. ऑलिव्ह रिडले ही कासवांची जगातील दुर्मीळ प्रजाती आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये तितली नामक चक्रीवादळामुळे या कासवांच्या हक्काची प्रजननभूमी असलेल्या समुद्रकिनार्‍यांवर प्रचंड कचरा विखुरला होता. त्यामुळे त्यावर्षी प्रजननासाठी ओडिशाच्या किनारपट्टीवर येणार्‍या कासवांची संख्या खूपच कमी असल्याचे दिसून आले होते. 

यावर्षी मात्र कोरोना विषाणूचा जगभरात प्रकोप झालेला असल्यामुळे मुख्यत्वे पर्यटन बंद आहे. मासे पकडण्याचे ट्रॉलर्स आणि नौकाही समुद्रात उतरेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे गरियामाथा म्हणजेच ओडिशाच्या हुकीटोला आणि इकाकूल यादरम्यानच्या संरक्षित समुद्रकिनार्‍यावर जिकडे पाहावे तिकडे कासवे, त्यांची रेतीतील घरे आणि अंडीच अंडी विखुरलेली दिसत आहेत. खरे तर दरवर्षी या क्षेत्राच्या वीस किलोमीटर परिसरात मासेमारीवर पूर्णपणे बंदी घालण्यात येते; परंतु तरीही पुढे खोल समुद्रात गेल्यावर अनेक कासवे आपल्या मूळ अधिवासात जाण्यापूर्वीच मृत्युमुखी पडतात. यावर्षी ओडिशाच्या समुद्रकिनारी दिसत असलेल्या कासवांच्या घरांची संख्या कदाचित आतापर्यंतची सर्वाधिक आहे. एका अंदाजानुसार, तब्बल सात लाख नव्वद हजार घरे कासवांनी बांधली आहेत. प्रत्येक घरट्यात सुमारे शंभर अंडी आहेत. इथे येणारी सर्वच कासवे अंडी देतात असे नाही. सुमारे तीस टक्के कासवे अंडी देत नाहीत. म्हणजेच एकूण किती प्रचंड संख्येने कासवे यावर्षी आली असतील, याचा अंदाज घेता येतो. यावर्षी कासवांनी घातलेल्या अंड्यांची संख्या सुमारे एक कोटीपेक्षा अधिक असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अशीच आश्चर्याची गोष्ट म्हणजे, 1999 मध्ये ओडिशा राज्यात प्रचंड चक्रीवादळ झाले आणि 2006 मध्ये त्सुनामीचा फटकाही या किनारपट्टीला बसला. तरीही कासवे दोन्ही वेळी याच किनारपट्टीवर दरवर्षीप्रमाणे आली होती. 

तसे पाहायला गेल्यास 1996, 1997, 2000, 2008, 2015 आणि 2018 मध्ये या किनार्‍यावर आलेल्या कासवांची संख्या खूपच कमी होती. असे का घडले, हे रहस्य अद्याप उकललेले नाही. ‘ऑपरेशन कच्छप’ नावाची योजना चालवून या कासवांचा बचाव करण्यासाठी जागरूकता निर्माण करीत असलेल्या वाईल्डलाईफ सोसायटी ऑफ ओडिशा या संघटनेच्या मते, येथे येणार्‍या कासवांमधील 57 टक्के कासवेच वाळूत घरे बनवितात. बाकीची कासवे तशीच समुद्रात पुन्हा निघून जातात. यावर्षी गरियामाथा समुद्रकिनार्‍यावर नसी-1 आणि नसी-2 त्याचप्रमाणे बाबुबली या बेटांवरील वाळूतसुद्धा कासवांनी घरे बनविली आहेत. बाबुबली परिसरात घरे बनवायला कासवांनी सहा वर्षांपूर्वीच सुरुवात केली होती. परंतु, आजकाल हे कासवांचे सर्वात प्रिय ठिकाण बनले आहे. रशिकुल्ला आणि देवी या नद्यांचे किनारेही अंडी देण्यासाठी कासवांना पोषक वाटत आहेत. काही बेटांवर गेल्या काही वर्षांत माणसांची ये-जा वाढल्यामुळे तसेच जंगल वाढल्यामुळे कासवांनी तेथे जाणे बंद केले होते. अशा बेटांवरही यावर्षी कासवांच्या माद्या अंडी घालत आहेत.

आतापर्यंत या कासवांचे सर्वाधिक नुकसान मासेमारीसाठी वापरल्या जाणार्‍या मोठ्या ट्रॉलर्समुळे होत असे. वास्तविक, ही कासवे समुद्रात खूप खोलवर पोहत असतात. परंतु, दर चाळीस मिनिटांनी त्यांना श्वास घेण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागावर यावे लागते. सुमारे दहा वर्षांपूर्वी ओडिशाच्या उच्च न्यायालयाने असे आदेश दिले होते की, कासवांच्या आगमनाच्या वाटेत मासेमारी करणार्‍या ट्रॉलर्समध्ये ‘टेड’ म्हणजेच ‘टर्टल एक्सक्लूजन डिव्हाईस’ बसवून घेतले जावेत. ओडिशामध्ये या आदेशाचे पालन काही प्रमाणात का होईना करण्यात आले. परंतु, राज्याबाहेरील ट्रॉलर्समध्ये असे डिव्हाईस बसवून घेण्यात आले नाही. राज्याबाहेरील मच्छीमारांनी कासवांची फारशी पर्वा केली नाही. अवैधरीत्या मासेमारी करणारे श्रीलंका, थायलंड या देशांतील ट्रॉलर्स तर या कासवांचे पक्के वैरी ठरले आहेत. या ट्रॉलर्सवरील लोक या कासवांची खुलेआम शिकारसुद्धा करतात. निर्मनुष्य बेटांवरून कासवांच्या अंड्यांची चोरी करणार्‍यांवर स्वयंसेवी संस्थांनी बर्‍याच अंशी नियंत्रण मिळविले आहे. परंतु, कासवांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर त्यांची अवैध शिकार रोखण्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आलेली नाही. दुर्मीळ प्रजातींचे रक्षण करण्याची मोठी संधी यानिमित्ताने माणसाला मिळाली आहे. मानवी हस्तक्षेप काही दिवसांसाठी बंद झाल्यामुळेसुद्धा अनेक प्राणिप्रजातींना आपल्या नैसर्गिक अधिवासात मोकळेपणे वावरण्याची संधी मिळाली आहे. परंतु, ऑलिव्ह रिडले कासवांसमोर एक मोठे संकट आजही उभे आहे. 

15 मेनंतर जेव्हा कासवांची पिल्ले रेतीच्या घरांमधून बाहेर पडून समुद्रमार्गे परत जाऊ लागतील, तेव्हा कोरोनावर नियंत्रण आणण्यात यश आलेले असेल आणि अशावेळी किती कासवांना वाचविण्यात यश मिळेल, हे सांगणे कठीण आहे. वास्तविक, ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे ही निसर्गाची अनमोल देणगी आहे. एक चमत्कार आहे. कारण, विणीच्या हंगामात त्यांच्या येण्या-जाण्याचे, अनेक वर्षांनी प्रजननासाठी पुन्हा जन्मस्थळी येण्याचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही. मानवी निष्काळजीपणामुळे जर या प्रजातीवर संकट आले, तर निसर्गावर केवढे मोठे संकट येईल, याचा अंदाजसुद्धा करवत नाही.