जैवविविधतेची जाणीव अपरिहार्य

Last Updated: May 23 2020 8:14PM
Responsive image


वैद्य मनोज पाटील

I am because we are. म्हणजे माझे अस्तित्व, आपण सर्वजण आहात म्हणून आहे. सहजीवन हे आपल्या जीवनाचे सूत्र आहे. सहजीवन आहे तर जीवन आहे. सहजीवन बाधित झाले जीवन बाधित होणार. या गोष्टीचा अनुभव आता जगाने खूप पद्धतीने घेतला आहे. पृथ्वीवर अनेक प्रकारच्या प्रजाती, अनेक प्रकारच्या परिसंस्था आणि अनेक प्रकारची जनुके सहअस्तित्व या तत्त्वावर जगली आहेत आणि वाढली आहेत. यालाच जैवविविधता (बायोडायव्हर्सिटी) म्हणतात.

जगामध्ये किती प्रकारचे जीव आहेत? याचे उत्तर अनेक जणांनी दिले आहे. ती संख्या चाळीस लाखांपासून दहा कोटींपर्यंत सांगितली जाते. आतापर्यंत 14 लाख 35 हजार 262 जातींची ओळख झालेली आहे. अजून अनेक जातींची ओळखसुद्धा झाली नाही. गेल्या काही वर्षांमध्ये विकासाच्या नावावर, हव्यासापोटी मानवाने जी आक्रमणे केली आहेत, त्यामुळे एक लाख प्रजाती नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे एकूणच पृथ्वीच्या अस्तित्वाला आणि पर्यायाने मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.  

वर्ष 2011 ते 2020 या दहा वर्षांसाठी संयुक्त राष्ट्र संघाने पृथ्वी मातेची टार्गेटस् या नावाने वीस उद्दिष्टे ठरवली होती. त्यासाठी जी रणनीती ठरवली होती, त्याची पाच ध्येये आहेत. त्या पाच ध्येयांपैकी पहिले ध्येय हे आहे की, जैवविविधता नष्ट होण्याची काय कारणे आहेत त्यांचा शोध लावून ती कारणे दूर करण्याचा प्रयत्न करणे. याव्यतिरिक्त त्यांच्यावर दबाव न येऊ देणे, त्यांना संरक्षण देणे आणि या कामासाठी सर्वांचा सहभाग राहील या पद्धतीने नियोजन करणे, सर्वांच्या क्षमतांचे योग्य नियोजन करणे आणि त्यांच्या क्षमता वाढविणे- यांचा उल्लेख आहे. जे टार्गेटस् ठरवले आहेत त्यामध्ये पहिले टार्गेट आहे, प्रत्येकाला या समस्येची जाणीव करून देणे.

भारत हा जगातील मोजक्या सतरा अतिवैविध्य असलेल्या देशांपैकी एक आहे. भारताने ‘दि बायोलॉजिकल डायव्हर्सिटी अ‍ॅक्ट 2002’ या नावाने कायदा संमत केला आहे. त्यानुसार ‘नॅशनल बायोडायव्हर्सिटी अ‍ॅथोरिटी’ ही शिखर संस्था या संबंधातील सर्व विषयांकडे पाहते. यामध्ये अकरा सदस्य असतात. प्रत्येक राज्यासाठी ‘स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड’ निर्माण करण्यात आले आहेत. याशिवाय बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी (बी.एम.सी.) स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या सर्वांचे उद्दिष्ट तीन भागांमध्ये सामावलेले आहे.

1) आपल्या येथील जैवविविधतेचे संगोपन करणे.
2) आपल्या येथील जैवविविधतेचा विकासासाठी उपयोग व्हावा; परंतु विकासाच्या या क्रमामध्ये कोणत्याही एका घटकाचे नष्ट होणे कदापिही मान्य नाही.
3) या संबंधातील सर्व कृती आणि कार्यक्रमांचा परस्परांना (म्हणजे सर्व प्रजातींमधील जीवांना) लाभ व्हावा.

यामध्ये अत्यंत सुंदर गोष्ट आहे ती म्हणजे- ‘पी.बी.आर.’ पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर. प्रत्येक ग्रामपंचायतीकडे, प्रत्येक तालुक्याकडे, प्रत्येक नगरपालिकेकडे अशाप्रकारचे रजिस्टर निर्माण करण्याचे एक साधन आहे. सर्वेक्षण करणे, संकलन करणे आणि अद्ययावत करणे ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि ती अत्यंत विकेंद्रित स्वरूपात उपलब्ध आहे. याचा उपयोग केवळ माहिती गोळा करून ठेवणे एवढाच नाही, तर त्या माहितीचा शेती आणि उद्योगधंद्यांसाठी उपयोग करणेसुद्धा आहे. आपल्या गावाच्या विकास योजनेमध्ये याचा विचार व्हावा, अशी अपेक्षा आहे. 1) माहिती, 2) उपयोग आणि 3) संरक्षण या तिन्ही बाबींचा यामध्ये समावेश आहे.

भारतामध्ये ‘पी.बी.आर.’ अत्यंत नावीन्यपूर्ण, अद्वितीय आणि विकेंद्रित रचना आहे. यामध्ये पारंपरिक ज्ञानाचा सन्मान आहे. आपल्याकडे असलेल्या प्रथा आणि परंपरा यावर आधारित असा आपला पर्यावरणाचा इतिहास यालाही स्थान आहे आणि विशेष म्हणजे, या पारंपरिक ज्ञानाचा अधिकारसुद्धा अबाधित राखण्यात आला आहे. ज्यामुळे परदेशातील कोणी व्यक्ती येथील ज्ञानाच्या आधारावर स्वतःचे संशोधन मांडून पैसे कमवू शकणार नाही आणि आपल्याच लोकांचे शोषण करू शकणार नाही. कोणतेही संशोधन ‘बी.एम.सी.’च्या माध्यमातून राष्ट्रीय जैवविविधता संचालनालयाच्या संमतीशिवाय मांडता येणार नाही. पेटंट घेता येणार नाही. आवश्यकता आहे केवळ यासंबंधी आपण सर्वजण जागरूक असण्याची.

केवळ समुद्र आणि जंगलच नाही, तर छोटे छोटे तलाव, ओढे-नाले, नद्या, गवताळ प्रदेश, वाळवंट, डोंगर, दर्‍या असे जे छोटे छोटे अधिवास (इकोसिस्टीम) आहेत त्यांनासुद्धा जैवविविधतेच्या अभ्यासाचे विषय बनवता येतात.

जागतिक पातळीवर बायोडायव्हर्सिटीच्या माहितीचा उपयोग चार गोष्टींसाठी केला जातो. 1) औषध उपचार, 2) उद्योगधंदा, 
3) संशोधन आणि 4) संरक्षण.

याचा अर्थ,

1) जैवविविधता आपल्या जीवनासाठी म्हणजे जगण्यासाठी आवश्यक आहे.
2) जैवविविधता आपल्या जीवनशैलीच्या विकासासाठीसुद्धा आवश्यक आहे.
3) जैवविविधतेचा अभ्यास संकटे आणि समस्यांना रोखण्यासाठी आवश्यक आहे.

सद्यस्थिती पाहता, आपल्यापैकी बहुसंख्य लोक या विषयापासून अनभिज्ञ आहेत. या विषयाची इतकी आवश्यकता आहे आणि त्याचवेळी विकेंद्रीकरणामुळे या विषयांमध्ये योगदान देण्याची सर्वांना संधी आहे, तेव्हा या विषयापासून अनभिज्ञ राहून कसे चालेल?

जैवविविधता आणि त्याचे महत्त्व सर्व लोकांना असणे आवश्यक आहे. तसे त्याबाबतची आपली भूमिका, जबाबदारी आणि कर्तव्य यांचीही जाणीव असणे आवश्यक आहे. ही जाणीव पसरविण्यासाठी... 1) याचा प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या पाठ्यक्रमामध्ये समावेश व्हावा. झाला असेल तर सर्वच्या सर्व शैक्षणिक वर्षांमध्ये, त्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा विचार करून, त्यासंबंधीचे उपक्रम अधिक गांभीर्याने करून घेतले जावेत. 2) वर्षातून दोनवेळा होणार्‍या ग्रामसभांमध्ये हा विषय अनिवार्य विषय म्हणून मांडला गेला पाहिजे. याची काळजी तहसीलदारांनी घेणे आवश्यक आहे. 

3) सामाजिक संस्था विशेषतः पर्यावरण क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्ती आणि संस्था यांना ‘पी.बी.आर.’संबंधी पूर्ण माहिती असावी. ‘पी.बी.आर.’ अद्ययावत करणे आणि त्यासंबंधी जनतेत या सर्व गटांमध्ये जागृती निर्माण करणे हे कामसुद्धा त्यांच्याकडून होऊ शकते. 4) ज्याप्रमाणे ‘एन.सी.सी.’ आणि ‘एन.एस.एस.’ उच्च माध्यमिक आणि पदवी शिक्षणामध्ये अंतर्भूत केले आहेत, त्याचप्रमाणे जैवविविधतेबाबतचा एक प्रमाणपत्र कोर्ससुद्धा समाविष्ट केला पाहिजे आणि त्याला तितकेच महत्त्व असायला हवे.

2011 ते 2020 या कालावधीमध्ये जी उद्दिष्टे साध्य करावयाची होती ती अद्याप पूर्ण झालेली नाहीत. काही ठिकाणी तर सुरुवातसुद्धा झाली नाही. यावर्षीच्या जागतिक जैवविविधता दिनानिमित्त तसा संकल्प, त्यासाठी मानसिकता, योजना आणि कृती 22 मे या दिवसाला साजरे करण्याचा हेतू साध्य करू शकेल.

सोनिया गांधींकडून मोठा निर्णय! गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी हार्दिक पटेल यांची वर्णी!


राज्यात कोरोनाबाधितांचा आजवरचा विक्रम मोडीत


सांगली झेडपीचे जितेंद्र डुडी नवे 'सीईओ'


मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचे कोरोनाने निधन


कोरोना : राज्यात १ लाख ६४ हजार गुन्हे दाखल


कोल्हापूर : परितेत कोरोनाबाधित सापडल्याने भोगावती परिसर हादरला


पुण्यात निर्णयांचा धडाका सुरुच; मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली!


शाळेतून पुस्तके गणवेश खरेदी करण्याची सक्ती केल्यास गुन्हे दाखल करा : मंत्री बच्चू कडू


औरंगाबाद : रस्त्यालगतच्या ५१ निराश्रीतांना आसरा


ठाणे जिल्हा १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन