वेध मानवासहित अंतराळयात्रेचे

Published On: Oct 06 2019 1:29AM | Last Updated: Oct 05 2019 8:38PM
Responsive image


दिशा खातू

आणखी दोन वर्षांनी म्हणजेच 2021 च्या डिसेंबर महिन्यापर्यंत मानवाला अंतराळात पाठवण्याचे आपले लक्ष्य पूर्ण करण्याच्या दिशेने भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’चे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ‘चांद्रयान-2’च्या विक्रम लँडरचे चंद्राच्या भूमीवर सॉफ्ट लँडिंग करण्याच्या प्रयत्नांना अपयश आले असले, तरी गगनयान मिशनवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाहीये. अंतरिक्षात मानवयुक्त अंतराळ यान पाठवण्याची योजना ‘इस्रो’ने 2006 मध्येच बनवली होती. आता त्या दिशेने बरेच काम झालेले असून, भारत ही मोहीम नक्कीच यशस्वी करेल, अशी आशा आहे...

‘चांद्रयान-1’, ‘मंगळयान’ आणि ‘चांद्रयान-2’चे अंशतः यश यानंतर भारताचे लक्ष आता आऊटरस्पेसवर आहे. वेगवेगळ्या ग्रहांच्या शोधासाठी काही महत्त्वाकांक्षी मिशन आखण्याच्या योजना ‘इस्रो’कडून बनवण्यात येत आहेत. यामध्ये मानव मिशनचाही सहभाग आहे. मध्यंतरी, ‘इस्रो’चे अध्यक्ष सिवन यांनी डिसेेंबर 2021 पर्यंत मानवाला अंतराळात पाठवण्याचे आपले लक्ष्य पूर्ण झालेले असेल, असा आशावाद जागवला आहे. इतकेच नव्हे, तर त्या दिशेने ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले आहे. ‘चांद्रयान-2’ मोहिमेदरम्यान विक्रम लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यामध्ये आपल्याला यश आलेले नसले, तरी त्याचा ‘गगनयान’ मोहिमेवर यत्किंचितही परिणाम होणार नाहीये. तसेच ‘चांद्रयान-2’ ही मोहीम पूर्णतः फसलेली किंवा अयशस्वी झालेली नाही.

तिला अंशतः का होईना यश मिळालेले आहेच. आगामी साडेसात वर्षे ‘चांद्रयान-2’चा ऑर्बिटर आपल्याला डाटा पाठवत राहणार आहे. त्यामुळे या मोहिमेमुळे ‘इस्रो’चे शास्त्रज्ञ काही क्षण हताश झालेले असले, तरी दुसरीकडे अंतराळमोहिमांबाबत त्यांच्या अपेक्षाही उंचावलेल्या आहेत. मानवयुक्त अंतराळयान अवकाशात पाठवण्याची योजना ‘इस्रो’ने 2006 मध्येच बनवलेली होती; पण जवळपास 11 वर्षांनंतर त्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यासाठी ‘इस्रो’ नव्याने सज्ज झाला आहे. अंतराळात मानव पाठवणे हे चंद्राला गवसणी घालण्याइतकेच; किंबहुना त्याहूनही अधिक मोठे आव्हानात्मक काम आहे. अशाप्रकारची मोहीम आखणारा भारत हा जगातील चौथा देश असणार आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन या तीनच देशांंना मानवयुक्त अंतराळयान अवकाशात पाठवण्यामध्ये यश आले आहे. भारताचा विचार करता आतापर्यंत तीन भारतीय अंतराळात गेलेले आहेत. 1984 मध्ये राकेश शर्मा हा अंतराळयात्री सोव्हिएत रशियाच्या मदतीने अंतराळात गेला होता. कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स या दोन साहसी महिलांनीही अंतराळात भरारी घेऊन या क्षेत्रात भारताचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले होते. 

‘इस्रो’च्या आताच्या योजनेनुसार, सात टन वजन, सात मीटर उंच आणि जवळपास 4 मीटर व्यास असणार्‍या ‘गगनयाना’ला जीएसएलव्ही रॉकेटच्या सहाय्याने अंतराळात प्रक्षेपित करण्यात येणार आहे. प्रक्षेपणानंतर 16 ते 20 मिनिटांतच ते अंतराळात निर्धारित कक्षेमध्ये पोहोचेल. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारणत: 300 ते 400 किलोमीटर अंतरावरील कक्षेत ते स्थापित करण्यात येईल. भारत आपल्या अंतराळयात्रींना ‘व्योमनटस्’ असे नाव देणार आहे. संस्कृतमध्ये ‘व्योम’ या शब्दाचा अर्थ अंतराळ असा आहे. या मोहिमेसाठीचे अंतराळयान तीन प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी तयार करण्यात आले असून, त्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. 

भारताच्या या पहिल्यावहिल्या मानवयुक्त अंतराळ मिशनमधील हे 3.7 टनाचे कॅप्सून तीन व्यक्तींसोबत तब्बल सात दिवस 400 किलोमीटर उंचीवरून पृथ्वीची प्रदक्षिणा करेल. या कॅप्सूलला मार्क 3 वर लाँच करण्याची योजना आहे. ही मोहीम भारतासाठी ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असणार आहे. कारण, मिशन गगनयानच्या माध्यमातून आपण पहिल्यांदा एका व्यक्तीला अंतराळात पाठवणार आहोत आणि अंतराळयानाच्या मदतीनेच त्याला पुन्हा पृथ्वीवर आणणार आहोत. यासाठी एक नवे केंद्रही तयार करण्यात आले आहे. ही मोहीम लवकरात लवकर पूर्ण व्हावी आणि त्यासाठी कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये म्हणून 12.4 अब्ज रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

मानवयुक्त अंतराळमोहिमेमध्ये ‘इस्रो’पुढे तीन प्रमुख तांत्रिक आव्हाने असणार आहेत. पर्यावरण नियंत्रण, लाईफ सपोर्ट सिस्टिम, क्रू एस्केप सिस्टिम आणि फ्लाईट सूट व अन्य उपक्रमांचे अत्यंत अचूक प्रकारे आणि यशस्वीपणाने नियंत्रण करणे हे यातले सर्वात मोठे आव्हान असणार आहे. भारताचे हे मानवयुक्त अवकाशयान रशियाच्या सोयुज या अवकाशयानावर आधारित आहे. 

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने भारताच्या या मानवयुक्त अंतराळ मिशनसाठी 10 क्रू मेंबर्सची निवड करण्याची आणि त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी भारतीय वायुदलावर सोपवण्यात आली आहे. ‘इस्रो’ने क्रू मेंबर्सच्या निवडीसाठी आणि प्रशिक्षणासाठीचे सर्व निकष आणि गरजा ठरवून दिलेल्या आहेत. या प्रशिक्षणाचे पहिले दोन टप्पे बंगळूरमधील इंडियन एअरफोर्सच्या इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसीन येथे पार पडतील आणि अंतिम टप्पा परदेशात पार पडेल. या अंतराळ प्रवाशांना प्रशिक्षणासाठी बंगळूरनजीकच्या एखाद्या ठिकाणी 100 एकरांमध्ये अ‍ॅस्ट्रोनॅट ट्रेनिंग सेंटर उभे करण्याचा विचार सुरू आहे. तेथे अंतराळात जाणार्‍या वैमानिकांना विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी तेथे अंतराळातील वातावरणाशी साधर्म्य असणार्‍या वातावरणाची निर्मिती करून तेथे कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, त्यातून बचावासाठी काय करता येईल आणि शून्य गुरुत्वाकर्षण असणार्‍या वातावरणात स्वतःचे संरक्षण कसे करता येईल. याचे प्रशिक्षण देण्यात येईल आणि त्या सर्वांचा अभ्यासही करण्यात येईल.

या केंद्रामध्ये थर्मल सायकलिंग आणि रेडिएशनचे नियंत्रण करणार्‍या सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहेत. याखेरीज मानवयुक्त अवकाशयानाचे लाँचिंग सुलभ आणि सुविधायुक्त बनवण्यासाठी एक नवे लाँचपॅडही तयार करण्यात येणार आहे. हे लाँचपॅड-2 पासून एक किलोमीटर दक्षिणेला असेल. लाँचपॅड-2 वरून ‘चांद्रयान-1’ मोहिमेसाठीचे अवकाशयान लाँच करण्यात आले होते. आता तिसर्‍या लाँचपॅडची निर्मितीही पूर्ण झाली आहे. याचा वापर ‘इस्रो’ आपल्या भविष्यातील योजनांसाठी करणार आहे. यामध्ये मानवयुक्त स्पेस फ्लाईट मिशनचाही समावेश आहे. 

या मोहिमेतील सर्वात मोठे कार्य अंतराळयान पृथ्वीबाहेरच्या अवकाशात पाठवणे, निर्धारित कक्षेत ते सामावणे आणि पुन्हा पृथ्वीवर परत आणणे हे असणार आहे. यासाठी मिशन कंट्रोल सेंटरसाठी स्वतंत्र एक केंद्र बनवण्यात येणार आहे. मिशन कंट्रोल सेंट्रलला अन्य प्रकारची मदत देण्यासाठी श्रीहरिकोटा येथील स्पेसपोर्ट आणि ‘इस्रो’ टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड सेंटरचेही अपग्रेडेशन करण्यात येणार आहे.  ‘इस्रो’च्या म्हणण्यानुसार, डिसेंबर 2020 पर्यंत आमच्याकडे या मोहिमेसाठीचे पहिले अंतराळयान असेल. जुलै 2021 पर्यंत दुसरे विमान मिळेल, अशी अपेक्षा आहे आणि डिसेंबर 2021 पर्यंत आपण आपल्या रॉकेटद्वारे भारतीयांना अंतराळात घेऊन जाऊ शकू, अशी ‘इस्रो’ची योजना आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास ‘इस्रो’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

संयुक्त अरब आमिरातीची आघाडी

भारताप्रमाणेच अन्यही काही देश ह्युमन स्पेस मिशनची तयारी करत आहेत. यामध्ये संयुक्त अरब आमिरातीचा उल्लेख करावा लागेल. यूएईने अलीकडेच आपला पहिला अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी (आयएसएस) अंतराळात पाठवला. ‘आयएसएस’वर पोहोचणारा इस्लामिक देशांमधील तो पहिला अ‍ॅस्ट्रोनट होता. अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात भारताच्या तुलनेत यूएईचे स्थान खूप खाली आहे; पण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आपला अ‍ॅस्ट्रोनट पाठवून यूएईने भारताला एक पाऊल मागे टाकले आहे. 

आतापर्यंत 239 प्रवासी अंतराळात

‘आयएसएस’वर आतापर्यंत 239 अंतराळयात्री जाऊन आले आहेत. जगभरातील 19 देशांमधून गेलेल्या या अंतराळयात्रींनी पृथ्वीपासून जवळपास 410 किलोमीटर दूर अंतरावर असणार्‍या या अंतराळस्थानकावर काही काळ व्यतित केला आहे; पण यामध्ये अद्यापपर्यंत एकाही भारतीयाचा समावेश नाही. त्यामध्ये सर्वाधिक अंतराळयात्री अमेरिकेचे असून, त्याखालोखाल रशिया, जपान आणि कॅनडाचा क्रमांक लागतो. अमेरिकेचे 151, रशियाचे 47, जपानचे 9, कॅनडाचे 8, इटलीचे 5, फ्रान्सचे 5, जर्मनीचे 3, तर बेल्जियम, नेदरलँड, स्वीडन, ब्राझील, डेन्मार्क, कझाकिस्तान, स्पेहन, ग्रेट ब्रिटेन, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया आणि यूएईच्या प्रत्येकी एका अंतराळयात्रीचा समावेश आहे...धुळ्याच्या सुषमा राजपूत यांचे ग्रीसच्या पंतप्रधानांकडून कौतुक 


हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणा-यास अटक


रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हाची निवृत्ती


पुणे : बँक घोटाळा; आमदार अनिल भोसले पोलिस कोठडीत (Video)


रतन लाल यांना मिळणार 'शहिद दर्जा', राज्य सरकारकडून १ कोटींची मदत


'चंद्रपूर'च्या दारूबंदी विरोधात ९३ टक्के निवेदने 


कोल्हापूर : म्हाकवे फाट्यावरील अपघातात केनवडेचा तरूण ठार 


राज्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी विषय सक्तीचा


परभणी : इटाळी खून प्रकरणाचे गूढ वाढले


कोरोना : राज्यातील सर्व ९१ प्रवाशांची चाचणी निगेटिव्ह, आरोग्यमंत्र्यांची माहिती