Tue, May 21, 2019 04:16होमपेज › Aurangabad › ‘जीवनाचा कचरा झालाय, मला जीव द्यायचाय’

‘जीवनाचा कचरा झालाय, मला जीव द्यायचाय’

Published On: Jan 19 2018 1:02PM | Last Updated: Jan 19 2018 1:31PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

हैद्राबाद-अजिंठा एक्स्प्रेस धावणाऱ्या रेल्वे रुळावर झोपून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी वाचवले. संग्रामनगर रेल्वे गेटजवळ( जुने ) रेल्वे पटरीवर भाऊसाहेब तुकाराम भालेराव (वय २२) आत्महत्या करण्यासाठी झोपला होता. तेव्हा श्रीमंत गोर्डे-पाटील यांनी त्याला पाहिले. रुळावर रेल्वे आलेली दिसत असतानाही तरुण बाजूला होत नव्हता. इतर लोकांच्या मदतीने गोर्डे पाटील यांनी तरुणाला रेल्वे रुळावरुन बाजूला केले. 

याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, भाऊसाहेब तुकाराम भालेराव याला काहीतरी काम करण्यासाठी घरातून सतत टोमणे मारले जात होते. तो एखाद्या ठिकाणी जास्त काळ काम करत नसल्याने त्याचे आणि घरच्यांचे वाद व्हायचे. त्या वादामुळेच त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो म्हणाला की,‘आज कोणत्याही परिस्थितीत मला जीव  द्यायचा आहे. माझ्या जीवनाचा कचरा झालाय. मी काहीही करु शकत नाही. मला सोडा, आज नाही तर पुन्हा कधीतरी जीव देईन.’ तो काहीही ऐकण्याच्या मानस्थितीत नसल्याने जमलेल्या लोकांनी त्याला उचलून बाजूला नेले. त्यानंतर भाऊसाहेबला पोलीस उपनिरिक्षक चेतन ओगले, ठाणे अंमलदार केशव काकडे ( ५६० ), एस.ए. नलावडे (१८८६ ) यांनी  त्याला व वडिलांना समजावून सांगितले. रात्री १०.३० वाजता भाऊसाहेब याला वडिल तुकाराम भालेराव यांच्या ताब्यात दिले.

रेल्वे २०० फुटांवर आली होती…

भाऊसाहेब रेल्वे रुळावर झोपला असताना रेल्वेगाडी २०० फुटांवर आली होती. रेल्वे रुळावर गर्दी दिसाल्याने रेल्वे इंजिन ड्रायव्हरने हॉर्न दिला. हॉर्नच्या आणि इंजिनच्या धडधड आवाजाने  मदत करणाऱ्यांच्या काळजात धडकी भरली. शेवटी क्षणाचा  विलंब न करता  भाऊसाहेबला हातपाय धरून पटरीवरून दूर केले.

यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न

भाऊसाहेबने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. काम करत नसल्याच्या कारणावरुन त्याचे घरच्यांशी वारंवार वाद व्हायचे. कामाची धरसोड केल्यामुळे आई व वडिल त्याच्यावर रागवत असत. भाऊसाहेब एकुलता मुलगा असालयाने त्याला एक प्लॉटही विकत घेऊन दिला. मात्र, तो काहीही काम न करता फिरत रहायचा. भाऊसाहेबने आई-वडिलांना भिती वाटवी म्हणून यापुर्वी २-३ वेळेस आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. रेल्वे रुळावर झोपण्यापूर्वी त्याने जाळून घेण्याचाही प्रयत्न केला. पण सुदैवाने दोन युवकानी लागलेली आग त्वरीत विझवली.