Sun, Jun 16, 2019 12:10
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › मराठा आरक्षणासाठी गोदेत जलसमाधी

मराठा आरक्षण:औरंगाबादेत तरुणाची आत्‍महत्या

Published On: Jul 23 2018 4:29PM | Last Updated: Jul 23 2018 5:26PMगंगापूर ः प्रतिनिधी

औरंगाबाद-पुणे महामार्गावरील कायगाव येथे मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान काकासाहेब दत्तात्रय शिंदे (28, रा. कानडगाव, ता. गंगापूर) या तरुणाने पुलावरून गोदावरी नदीत उडी मारून जलसमाधी घेतली. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवार दि. 24 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

या घटनेनंतर आंदोलन अधिकच चिघळले आहे. आंदोलकांनी औरंगाबाद-पुणे मार्गावर रास्ता रोको सुरू केला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कित्येक तास ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी घटनेतील पीडितेला न्याय मिळावा, यासह अन्य काही मागण्यांसाठी गेल्या 9 ऑगस्ट 2016 पासून मराठा समाजाने ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या बॅनरखाली आंदोलन छेडलेले आहे. गेल्या दोन वर्षांत समाजाने राज्यभरात तब्बल 58 अभूतपूर्व असे मूक मोर्चे काढले. मात्र, मागण्यांबाबत शासनाकडून कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे मूक मोर्चाला ‘ठोक मोर्चा’ असे स्वरूप देत गेल्या पंधरा दिवसांपासून क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलनाच्या दुसर्‍या पर्वाला सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनालाआता हिंसक वळण लागत चालले आहे.

कायगाव येथे सकाळपासून ठिय्या

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद-अहमदनगर रोडवरील कायगाव येथे गोदावरी नदीत जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा क्रांती मोर्चाच्या गंगापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी दिला होता. त्यामुळे सकाळपासून कायगाव येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. दहा वाजण्याच्या सुमारास मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते आंदोलनासाठी कायगाव येथील पुलावर पोहोचले. तेथेच पोलिसांनी त्यांना अडविले. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूने ठाण मांडत ठिय्या आंदोलन सुरू केले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले होते. त्यामुळे तीन वाजेपर्यंत त्यांनी ठिय्या मांडला.

जलसमाधीनंतर आंदोलनअधिकच पेटले

काकासाहेब शिंदे या तरुणाने समाजाच्या आरक्षणासाठी आपला जीव दिल्याच्या घटनेनंतर मराठा आंदोलन अधिकच पेटले आहे. कायगाव येथेच संतप्त मराठा बांधवांनी औरंगाबाद-पुणे महामार्गावर रास्ता रोको सुरू केला. त्यामुळे या मार्गावर दोन्ही बाजूने दहा-दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. तसेच औरंगाबाद शहरातही अनेक ठिकाणी दुकाने बंद करण्यात आली. जिल्ह्यात घटनेच्या निषेधार्थ आंदोलनेही करण्यात आली. तसेच गंगापूर पोलिस ठाण्याला दोन-तीन हजारांच्या जमावाने घेराव घालत ठिय्या आंदोलन सुरू केले.

आज महाराष्ट्र बंद

मराठा आरक्षणासाठी सोमवारी काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत जलसमाधी घेतल्यानंतर या आंदोलनाने पेट घेतला. या प्रश्‍नाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. राज्यभरातील क्रांती मोर्चाच्या सर्व समन्वयकांशी संवाद साधून एकमुखाने हा निर्णय घेण्यात आला.

सोमवारी रात्री उशिरा औरंगाबादच्या समन्वयकांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित तहसील कार्यालय, पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांना निलंबित करावे आणि त्यांच्यावर 302 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी समन्वयकांनी केली आहे. शिवाय मंगळवारी सकाळी समन्वयकांतर्फे क्रांती चौक पोलिस ठाण्यातही गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

वारकर्‍यांची वाहने, एस.टी.ला बंदमधून सूट
पंढरीच्या वारीला गेलेल्या वारकर्‍यांना त्रास होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी महाराष्ट्र बंदच्या काळात वारकर्‍यांची वाहने आणि कोणतीही एस.टी. बस न अडविण्याचे आणि या वाहनांना हानी पोहोचणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाने केलेे आहे.