Tue, May 21, 2019 04:04होमपेज › Aurangabad › विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह

विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह

Published On: Feb 08 2018 1:53AM | Last Updated: Feb 08 2018 1:39AMवाळूज महानगर : प्रतिनिधी

सिडको वाळूज महानगरातील एका सार्वजनिक विहिरीत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना बुधवारी (दि. 7) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. माहिती मिळताच घटनास्थळावर बघ्यांची गर्दी उसळली होती. दरम्यान, साहित्य नसल्याचे कारण सांगत पोलिस आणि अग्‍निशामक दलाने सुरुवातीला मृतदेह बाहेर काढण्यास हतबलता दाखवली. अखेर एका तरुणाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.

एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर साबळे, फौजदार आरती जाधव, सहायक फौजदार सुरडकर, जमादार मोहन पाटील, बाळासाहेब आंधळे, रामदास गाडेकर, संतोष जाधव, खंडू गोरे यांनी बुधवारी घटनास्थळी पाहणी केली.

 यावेळी त्यांना सिडकोच्या ऑफिससमोर असलेल्या सार्वजनिक विहिरीत पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगताना दिसून आला. पोलिसांनी तत्काळ ही माहिती वाळूज एमआयडीसीच्या अग्‍निशामक कार्यालयात कळविली. मात्र आमच्याकडे साधने नसल्याचे सांगून महापालिकेच्या अग्‍निशामक कार्यालयात संपर्क करा, असे पोलिसांना सांगण्यात आले. यावरून पोलिसांनी मनपा अग्‍निशामक दलास ही माहिती कळविली मात्र हे कार्यक्षेत्र आमच्याकडे नसल्याचे सांगण्यात आले, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

दरम्यान अर्धा-पाऊण तासानतंर वाळूज एमआयडीसी अग्‍निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र विहिरीत जास्त पाणी असल्यामुळे अग्‍निशामक दलाच्या जवानांनीही बघ्याची भूमिका घेतली. शेवटी सिडको वाळूज महानगरात राहणार्‍या सुशील ढाकणे हा तरुण विहिरीत उतरला व त्याने पाण्यावर तरगंत असलेल्या मृतदेहाला दोरी बांधल्यानतंर अग्‍निशामक दलाचे जवान तसेच पोलिसांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.