Sun, Aug 25, 2019 03:37होमपेज › Aurangabad › वैद्यकीय अधिकारी नसल्याने महिलेची रस्त्यातच प्रसूती

वैद्यकीय अधिकारी नसल्याने महिलेची रस्त्यातच प्रसूती

Published On: Dec 28 2017 1:34AM | Last Updated: Dec 28 2017 12:40AM

बुकमार्क करा
सोयगाव : प्रतिनिधी

येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारीच नसल्याने महिलांच्या प्रसूतीच्या वेदना वाढतच असल्याने दि.27 बुधवारी सकाळी सहा-साडेसहाच्या सुमारास  वैद्यकीय अधिकार्‍याअभावी तातडीने जळगावला प्रसूतीसाठी हलविण्यात आलेल्या एका महिलेची सोयगाव-शेंदुर्णी रस्त्यावरच प्रसूती झाल्याची घटना बुधवारी घडली. दरम्यान प्रसूत झालेल्या महिलेच्या वेदना वाढल्याने, तिला तातडीने शेंदुर्णी ता.जामनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते.

सोयगाव ग्रामीण रुग्णालयात तालुक्यातील वेताळवाडी येथील दोन महिला रुग्ण प्रसूतीसाठी आल्या असता, वैद्यकीय अधिकारीच नसल्याने या गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी जळगावला हलविण्यात आले, परंतु त्यापैकी शाहीनबी सद्दामखा हिच्या रुग्णवाहिकेतच प्रसूतीपूर्व वेदना सुरू झाल्याने सोयगाव-शेंदुर्णी रस्त्यावरच तिची प्रसूती झाली. दरम्यान तिला सुरक्षेच्या कारणाने महिला प्रसूती गृह नसलेल्या नजिकच्या शेंदुर्णी ता.जामनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात येऊन हसिनाबी हनीफखा या महिलेला जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान सोयगाव येथे वैद्यकीय अधिकार्‍याचे पदे रिक्‍त असल्याने प्रसुतीसाठी येणार्‍या रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. त्यामुळे सोयगाव शहर व परिसरातील गर्भवती महिलांची मोठी कुचंबना झाली आहे. दरम्यान गर्भवती महिला रुग्णांची सोयगाव येथे प्रसूती होत नसल्याने, शहरात माता जननी सुरक्षा योजनेचा बोजवारा उडाला आहे. ग्रामीण रुग्णालयातील प्रसूती गृह सुद्धा धोकादायक झाले आहे. शस्रक्रियागार गृहाची मोठी दुरवस्था झाली असल्याने या ठिकाणी प्रसूती करण्यात येत नसल्याने सोयगावच्या गर्भवती महिलांना प्रसूतीसेवा मिळत नसल्याचा आरोप काँग्रेसचे कदीर शहा यांनी केला आहे.