होमपेज › Aurangabad › आई आजारी असल्याचा बहाना करून तिने केली गुजरातमधून स्वत:ची सुटका

आईच्या उपचाराचा बहाणा करून तिने केली सुटका

Published On: Dec 23 2017 11:55AM | Last Updated: Dec 23 2017 11:55AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

केटरिंगच्या व्यवसायात गुजरातमध्ये खूप पैसे मिळतात, असे आमिष दाखवून 25 वर्षीय  विवाहितेला मुकुंदवाडीतील दलालाने गुजरातमध्ये नेले. तेथे पालनपूर शहरात 40 वर्षीय  व्यक्‍तीसोबत  तिचे बळजबरीने लग्न लावून दिले अन् दलालाने पोबारा केला. अखेर, वृद्ध आई आजारी असल्याचा  बहाणा करून पीडितेने गुजरातमधून आपली सुटका करून घेत औरंगाबाद गाठले. त्यानंतर गुजरातमध्ये महिलांना विक्री करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश झाला. आता जिन्सी पोलिस अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणात  जिन्सी पोलिसांनी मुकुंदवाडीतील पवन नावाच्या दलालाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. याशिवाय फरजाना नामक महिलेचा शोध पोलिस घेत आहेत.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिन्सी परिसरातील नयना (नाव बदललेले आहे) ही 25 वर्षीय विवाहिता तीन मुलांसह राहते. ती याच भागातील एका घरी भांडी धुण्याचे काम करते. तिला आणखी काही ठिकाणी कामाची आवश्यकता असतानाच नारेगावातील   फरजाना नावाच्या महिलेशी तिची ओळख झाली. महिनाभरापूर्वी फरजानाने तिला पैसे कमावण्यासाठी गुजरातेत जाण्याचा सल्ला दिला. केटरिंगच्या व्यवसायात तिकडे खूप पैसे मिळतात, असे आमिष दाखविले. तसेच, तिची तिन्ही मुले येथे  सांभाळते, असेही सांगितले. 

मुकुंदवाडीतील पवन बनला दलाल

फरजाना नामक महिलेने नयनाला गुजरातमध्ये गेल्यानंतर एक लाख रुपये  मिळतील, असे आमिष दाखविले होते.त्यानुसार, तिला गुजरातला नेण्यासाठी मुकुंदवाडीतील पवन नावाच्या दलालाला बोलावून घेण्यात आले. त्याने नयनाला गुजरातला नेले. तेथे एका 40 वर्षीय चहा विक्रेत्याशी तिचे लग्न लावून दिले. त्याच्याकडून काही पैसे घेऊन तो माघारी  आला. चहा विक्रेत्याने नयनाला काही दिवस घरातच कोंडून ठेवले.   

पतीच्या सुटकेसाठी हवे होते पैसे :

नयनाचा पती जबरी चोरीच्या गुन्ह्यात आरोपी आहे. त्याला  पोलिसांनी अटक केली असून तो हर्सूल कारागृहात  आहे. त्याच्या जामिनासाठी काम करून  नयना रुपये जमवत आहे. परंतु, यातच तिला अनेकांनी गंडवले. तसेच, चक्क  गुजरातला नेऊन विकले. आता हे प्रकरण जिन्सी ठाण्यात आले आहे.तक्रारीची शहानिशा करूनच पुढील कारवाई केली  जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

आईच्या उपचाराचा बहाणा करून सुटका 

पालनपूरमधे पंडितसोबत दहा दिवस राहिल्यानंतर  विवाहितेने आई कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे औरंगाबादला जाणे आवश्यक असल्याचे सांगत पंडितसह आठ  दिवसांपूर्वी ती मध्यवर्ती  बसस्थानकावर आली. तेथे उतरताच तिने त्याला लघुशंकेचे कारण सांगून तेथून पोबारा केला. लगेचच फरजानाच्या घरी जाऊन मुलांना ताब्यात घेतले. त्यानंतर धुणे-भांड्याचे काम करत असलेल्या महिलेचे घर गाठले. तेथून ती पवनच्या घरी गेली. त्याला याचा जाब विचारल्यावर काही दिवस विचार करून तिने शुक्रवारी पोलिस ठाणे गाठले.