होमपेज › Aurangabad › 36 तोळे सोन्यासह दोन लाखांवर डल्ला

36 तोळे सोन्यासह दोन लाखांवर डल्ला

Published On: Jul 02 2018 1:42AM | Last Updated: Jul 02 2018 12:55AMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

पोलिसांच्या नाकावर टिच्चून सलग तिसर्‍या दिवशी भरदिवसा घर फोडून चोरट्यांनी 36 तोळे दागिने आणि लाखो रुपयांच्या रोकडवर डल्ला मारला. एकीकडे पोलिस भुरट्या चोरांना पकडण्यात व्यस्त असताना अट्टल घरफोडे पोलिसांपुढे आव्हान उभे करू लागले आहेत. रेल्वे पटरीचा परिसर चोरट्यांनी टार्गेट केला असून सातारा, वेदांतनगर, पुंडलिकनगर, जवाहरनगर, मुकुंदवाडी ठाण्याच्या भागात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे.

पद्मपुर्‍यातील नवयुग कॉलनीत 30 जून रोजी भरदिवसा घरफोडून चोरट्यांनी 14 तोळे सोने आणि 92 हजार रोकड लंपास केली. 1 जुलै रोजी सिल्कमिल कॉलनीतील शासकीय ठेकेदाराचे घर फोडून 22 तोळे सोने आणि सव्वा लाखाच्या वर रोख लांबविल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, 29 जून रोजीही चोरट्यांनी भरदिवसा घर फोडी केली होती. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत बाबासाहेब कोळसे (32, रा. सी-3, अमृत साई प्लाझा, सिल्कमिल कॉलनी) हे शासकीय ठेकेदार आहेत. त्यांचा अपार्टमेंटच्या दुसर्‍या मजल्यावर फ्लॅट आहे. 29 जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ते पत्नीसह फ्लॅटच्या लोखंडी आणि लाकडी दरवाजाला कुलूप लावून भेंडाळा (जि. अहमदनगर) येथे आई-वडिलांना भेटण्यासाठी गेले. तेथून रविवारी दुपारी ते घरी परतले. तेव्हा त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केला असता बेडरूममधील कपाटातील कपडे व इतर साहित्य बेडवर अस्ताव्यस्त पडलेले त्यांना दिसले. तसेच कपाटातील चार तोळ्यांचा राणीहार, प्रत्येकी तीन तोळ्यांचे दोन साखळी गंठण, प्रत्येकी पाच ग्रॅमचे झुंबर, पाच अंगठ्या, तीन तोळ्यांचे लॉकेट, दोन ग्रॅमची नथ, एक तोळ्याचे नेकलेस, एक तोळ्याची अंगठी, पाच ग्रॅमची मुलाची चेन, वाळ्या, झुंबराचे जोड, वेल, चार ग्रॅमची पोत, बाळाला आलेल्या रोखसह पाच हजारांची इतर रोकड याशिवाय एक लाख 15 हजार रुपये रोकड, असा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे कोळसे यांच्या कपाटाच्या ड्रॉवरमधून सोन्याचे दागिने आणि रोकड लांबविताना चोराने त्यातील चांदीचे दागिने आणि कॅमेर्‍याला हातही लावला नाही. 

पद्मपुर्‍यात 4 लाखांचा ऐवज लंपास

रमण रामानुज रांदड (39, रा. वेणुगोपाल हाईट्स, नवयुग कॉलनी, पद्मपुरा) यांचा दुसर्‍या मजल्यावर फ्लॅट आहे. ते कापड दुकानात काम करतात. त्यांची पत्नी लातूर को-ऑप. बँकेत नोकरीला आहे. 14 वर्षांचा मुलगा शाळेत गेल्यावर रांदड दाम्पत्य घराला कुलूप लावून आपापल्या कामावर गेले. दुपारी दीड वाजता रांदड यांची पत्नी घरी आल्यावर कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी आत जाऊन पाहणी केली तेव्हा चोरट्यांनी कपाटातील 92 हजार रुपये रोकड आणि 14 तोळे सोन्याचे दागिने असा 4 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार त्यांनी पतीला सांगितल्यावर ते घरी पोचले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर वेदांतनगर, गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळाची पाहणी केली. श्‍वान पथकालाही पाचारण केले, मात्र श्‍वान घरातच घुटमळला. 

चाव्या कपाटालाच, पैसे काकाचे

रमण रांदड यांच्या घरातून चोरीला गेलेले 92 हजार रुपये हे काकाच्या कापड दुकानातील पैसे होते. ते त्यांना 30 जून रोजी दुकानात घेऊन जायचे होते; परंतु काका आजारी असल्याने ते आधी दवाखान्यात भेटायला गेले आणि तिकडूनच कामावर गेले. त्यामुळे पैसे घरीच राहिले. दरम्यान, कपाटाच्या लॉकला चाव्या लावलेल्या होत्या. त्यामुळे चोरट्यांना कपाट उघडण्यासाठी फारशी मेहनत घ्यावी लागली नाही. पद्मपुर्‍यातील नवयुग कॉलनीत वेणुगोपाल हाईट्स नावाचे अपार्टमेंट आहे. उच्चभ्रू लोकांच्या या अपार्टमेंटला खासगी सुरक्षारक्षक नेमलेला आहे, मात्र येथे सीसीटीव्ही लावलेले नाहीत.