होमपेज › Aurangabad › 'त्या' गावातील  पाचशे लिटर दारू केली नष्ट

'त्या' गावातील  पाचशे लिटर दारू केली नष्ट

Published On: Dec 10 2017 1:18AM | Last Updated: Dec 10 2017 1:18AM

बुकमार्क करा

सोयगाव : प्रतिनिधी

पाचोरा पोलिसांच्या हद्दीतील धाकलेगाव धरणात हातभट्टीच्या दारूच्या अड्ड्यांवर सोयगाव, पिंपळगाव (हरे) पोलिसांनी छापा टाकून सुमारे पाचशे लिटर दारूसह गाळपचे रसायन शनिवारी (दि.9) नष्ट केले. याबाबत दै.पुढारीमध्ये 7 डिसेंबर रोजी वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.

या वृत्ताची दखल घेत पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे आता निमखेडी गावाचा पाणी पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास पोलिस निरीक्षक सुजित बडे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना व्यक्त केला. सोयगाव तालुक्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या पिंपळगाव(हरे) येथील धाकलेगाव धरणातून निमखेडी गावाला हातभट्टीची दारूमिश्रीत पाणी पुरवठा झाला होता. पाणी पुरवठ्याच्या विहिरीतच वापरात नसलेली गावरान दारू हातभट्टीधारकांनी विहिरीत फेकून दिली होती. त्यामुळे निमखेडी गावातील ग्रामस्थांना दारूमिश्रित पाणी पिण्यात आल्याने अख्खे गाव नशेत तर्रर्र झाल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे गृहविभागाने सोयगाव आणि पाचोरा पोलिसांना हातभट्टीविरुद्ध संयुक्‍त कारवाई करण्याचे आदेश दिल्यावरून शनिवारी बडे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक गणेश जागडे, पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील, शेळके आदींच्या पथकाने धाकालेगाव धरण पात्रात पाच तास मोहीम राबवून हातभट्टी दारूचे धरणातील मुख्य केंद्रच उद्ध्वस्त करून पाचशे लिटर रसायन व गावरान दारू नष्ट केली.

धाकलेगाव धरण पात्रात गावठी दारूची मोठ्या प्रमाणावर गाळप करून सीमावर्ती भागातील सोयगाव तसेच पाचोरा तालुक्यातील गावांना हातभट्टीच्या (गावरान) दारूचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करण्यात येत होता, परंतु या दारू गाळप केंद्रावर अर्थपूर्ण संबंधामुळे पाचोरा पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप निमखेडीच्या सरपंच सीमा पाटील यांनी केला आहे. त्यामुळे पाचोरा पोलिसांच्या दुर्लक्षामुळे निमखेडी गावाला दारू मिश्रीतपाणीपुरवठा झाल्याचे त्यांनी सांगितले.
 

हे गाव पण झाले असते तर्राट...

विहिरीत मिसळली दारू अन्‌ गाव झालं तर्राट!