Tue, Feb 18, 2020 05:57



होमपेज › Aurangabad › 40 कोटींसाठी पत्नीचा छळ; जामीन फेटाळला

40 कोटींसाठी पत्नीचा छळ; जामीन फेटाळला

Published On: Jan 25 2018 1:03AM | Last Updated: Jan 25 2018 12:39AM



औरंगाबाद : प्रतिनिधी

शहरातील नामांकित उद्योजक महिलेचा 40 कोटी रुपयांसाठी शारीरिक-मानसिक छळ करणारा तसेच दारू, अमली पदार्थांच्या नशेत मारहाण करणारा पती व्यावसायिक अमित रमेश अहिरराव याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी फेटाळला.

या प्रकरणी संबंधित उद्योजक महिलेने फिर्याद दिली होती. फिर्यादीचे अमित रमेश अहिरराव याच्याशी 2008 मध्ये लग्न झाले. त्यांना एक मुलगाही आहे. आरोपी अमित याच्या सोनई कन्स्ट्रक्शन व अमित बिल्डर्स या कंपन्या असून, लग्नानंतर काही दिवसांनी आरोपी फिर्यादीला शारीरिक-मानसिक त्रास देऊ लागला. फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेत, तसेच दारू व अमली पदार्थांच्या नशेत फिर्यादी व फिर्यादीच्या आई-वडिलांना शिवीगाळ करून फिर्यादीला मारहाण करू लागला, तसेच वेगवेगळ्या कारणांनी वारंवार पैसे मागू लागला.

आरोपीच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीच्या वडिलांनी आरोपीला आधी 2 कोटी 90 लाख रुपये व नंतर 1 कोटी रुपये दिले. त्यानंतर आरोपीने इटखेडा येथे ‘व्हर्च्यू इन्फ्रास्ट्रक्चर’ ही कंपनी स्थापन केली. ही कंपनी स्थापन करण्यासाठी पुन्हा फिर्यादीवर दबाव टाकून फिर्यादीकडून 1 कोटी 27 लाख रुपये घेतले.

दरम्यान, फिर्यादी ही 2015 पासून आरोपी पतीपासून वेगळी राहाते. त्यानंतरही आरोपीकडून त्रास होत राहिल्याने फिर्यादीने 2 सप्टेंबर 2017 रोजी महिला तक्रार निवारण मंचकडे तक्रार केली होती. त्याच्या सुनावणीदरम्यानही, आरोपीने फिर्यादीसह फिर्यादीच्या आई-वडिलांना अर्वाच्य शिवीगाळ करून ठार मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. तसेच पुन्हा 40 कोटींची मागणी केल्यामुळे फिर्यादीने 5 जानेवारी 2018 रोजी तक्रार दिल्यावरून कलम 498 (अ), 323, 504, 506, 34 अन्वये सातारा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी आरोपी अमित रमेश अहिरराव, त्याचे वडील  रमेश केशवराव अहिरराव आणि आई  माधुरी रमेश अहिरराव यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात  अर्ज सादर केला होता. सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपी अमित याचा अटकपूर्व जामीन फेटाळला, तर इतर दोघांना अटकपूर्व जामीन
मंजूर केला.