होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : शिवना ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांचा हल्लाबोल (video)

औरंगाबाद : शिवना ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांचा हल्लाबोल (video)

Published On: Jun 15 2018 7:18PM | Last Updated: Jun 15 2018 7:18PMशिवना : प्रतिनिधी

सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील शिवाजीनगर वसाहतीला होणारा पाणीपुरवठा गेल्या दोन महिन्यापासून बंद असल्याने संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी( दि.१५) ग्रामपंचायतीवर पाण्यासाठी हल्लाबोल मोर्चा काढला. येथील ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे दोन महिन्यांपासून ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सरपंच संतोष जगताप यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. दोन महिन्यांपासून पाणी मिळत नाही, पिण्यासाठी पाणी आणायचे कुठून? शिवाजीनगर भागाकडे सरपंच, ग्रामसेवक लक्ष देत नाहीत, नळपट्टी ,घरपट्टी देतो़ मग वसाहतीत पाणी का मिळत नाही? आम्हाला पाणी मिळाले पाहिजे, मूलभूत सुविधा आम्हाला मिळत नसतील तर ग्रामपंचायत कोणत्या कामाची अशा अनेक प्रश्नांचा भडीमार करीत ग्रामस्थांनी जगताप यांना चांगलेच धारेवर धरले. या भागास शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी गाववेशीतच तासभर ठिय्या मांडला होता. 

येथील गावतलावाच्या काठावर वसलेल्या शिवाजीनगर वसाहतीला राखीव जंगलातील शासकीय विहिरीवरून पाणीपुरवठा केला जातो. मात्र दोन महिन्यापूर्वीच या विहिरीने तळ गाठल्याने ग्रामस्थांची गेली दोन महिने पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. वासाहतीला लागून असलेल्या गणेश काळे यांच्या मालकीच्या विहिरीवरून महिलांना पाणी शेंदून आणावे लागले, पण तीही विहीर तीन दिवसापूर्वी आटल्याने ग्रामस्थांपुढे पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. सरपंच मनावर घेत नसल्याने ग्रामस्थांनी अखेर शुक्रवारी ग्रामपंचायत प्रशासनावर हल्लाबोल मोर्चा काढला. मोर्चात भास्कर राऊत, तुकाराम काळे, शेख अमीन, शेख शरीफ, शेख नजीर, शेख शकिर, बाळू सोनवणे, खंडू इंगळे, कल्लू शेठ, ज्ञानेश्वर मोहिते, शंकर बावणे, संतोष राऊत, श्रीरंग सपकाळ, संतोष वाघ, अंकुश राऊत, कडूबा गोराडे, सतीश राऊत, रेणुका इंगळे, भगीरथी जाधव, उषा जंजाळ, सरला सपकाळ, मीना सपकाळ, पार्वती काळे, सरस्वती मोहिते, जनाबाई जंजाळ, लक्ष्मीबाई काळे, शेख महिमा, शेख रहिमाबी यांच्यासह ग्रामस्थ सहभागी होते.

सरपंच उशिराने...

पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर दाखल झालेल्या मोर्चेकऱ्यांची कैफियत ऐकण्यासाठी सरपंच हजर नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तास भर गाववेशीतच ठिय्या मांडला होता. उशिराने आलेल्या सरपंचांच्या आश्वासनानंतर मोर्चेकरी ग्रामस्थ शांत झाले.

प्रशासकीय अधिकारीच गैरहजर...

सध्या पाणीसमस्यासह, शेतकरी व विद्यार्थ्यांची कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. व्ही. डी. बिडकर यांनी पदभार सोडल्यांनातर दहा दिवस उलटूनही नवीन ग्रामविकास अधिकारी यांनी पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे मोठी अडचण निर्माण होत आहे. नवीन ग्रामसेवकांनी आपला पदभार स्वीकारावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

धरणात मृत साठा असल्याने नियोजन करून गावास वॉर्डवाइज दर पाच दिवसाला पाणीपुरवठा केला जात आहे. शिवण्यासह अजिंठा, मादणी, आमसरी, वाघेरा पाच गावाची मदार अंधारी धरणावर आहे. येत्या दोनच दिवसात शिवाजीनगर वसाहतीचा पाणीपुरवठा सुरळीत चालू होईल. पाण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन अहोरात्र झटत असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच संतोष जगताप यांनी केले आहे.