होमपेज › Aurangabad › जलशुद्धीकरण पावडरचा तुटवडा; पाणीपुरवठा धोक्यात 

जलशुद्धीकरण पावडरचा तुटवडा; पाणीपुरवठा धोक्यात 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : राहुल जांगडे

जायकवाडी धरणातून येणार्‍या पाण्यावर फारोळ्यातील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. त्यानंतर त्या शुद्ध पाण्याचा शहरवासीयांना पुरवठा केला जातो. मात्र, जलशुद्धीकरणासाठी लागणार्‍या रासायनिक पावडरचा केवळ सात दिवसांचा साठा शिल्लक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शुद्ध पाणीपुरवठा धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

वाढत्या उन्हासोबत पाण्याची मागणी वाढली आहे. दररोज जवळपास दीडशे एमएलडीपेक्षा जास्त पाण्याची जायकवाडी धरणातून उचल सुरू आहे. 

या पाण्यावर फारोळा जलशुद्धीकरण केंद्रावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. अ‍ॅलम, क्लोरीन टोनर आणि ब्लिचिंग पावडरचा शुद्धीकरणासाठी वापर केला जातो. त्यानंतर हे पाणी पिण्यास योग्य होते व शहरवासीयांना पुरवले जाते. मात्र, आता फारोळ्यातील जल शुद्धीकरणा केंद्रामध्ये जलशुद्धीकरणासाठी लागणार्‍या या रसायनांचा केवळ आठ दिवस पुरेल एवढाच साठा पाणीपुरवठा विभागाकडे शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या रासायनिक पावरडचा तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा विभागाकडून जलशुद्धीकरण रसायन खरेदीची वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. 

मनपा प्रशासनाने या रसायनाचा साठा त्वरित उपलब्ध करून न दिल्यास शहराचा शुद्ध पाणीपुरवठा धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी फारोळा शुद्धीकरण केंद्रातील काही अधिकार्‍यांनी स्वखर्चातून रसायनाची खरेदी करून शहराला शुद्ध पाणी पुरवठा केला होता अशी माहिती सूत्रांनी दिली.


  •