Fri, Nov 16, 2018 06:52होमपेज › Aurangabad › टँकरच्या निविदेकडे कंत्राटदारांची पाठ

टँकरच्या निविदेकडे कंत्राटदारांची पाठ

Published On: Feb 05 2018 2:02AM | Last Updated: Feb 05 2018 1:39AMबीड : प्रतिनिधी

उन्हाळ्यात काही ठिकाणी पाणीटंचाई जाणवू शकते. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून पाणीपुरवठा करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. या निविदांकडे ठेकेदारांनी पाठ फिरविली आहे. काटेकोर अटी यासह यंदा नसलेली पाणी टंचाई यामुळे या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, दोन वर्षांपूर्वीच्या दुष्काळात मात्र कंत्राट आपल्यालाच मिळावे व आपणच पात्र आहोत असा कांगावा करीत हे प्रकरण न्यायालयात गेले होते. 

बीड जिल्ह्याच्या उत्तर हद्दीलगत गोदावरी नदी, मध्यस्थानी सिंदफणा तर दक्षिणेला मांजरा नदी असली तरी जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. जिल्ह्यात आष्टी, पाटोदा, शिरूर, केज, बीडचा काही भाग, अंबाजोगाई या पट्ट्यामध्ये बालाघाटच्या रांगा आहेत. त्यामुळे या भागात पाऊस समाधानकारक झाला तरी एप्रील, मे मध्ये पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागतो. 

 पाणीटंचाई लक्षात घेता दरवर्षी जिल्हा प्रशासनाकडून डिसेंबर, जानेवारीमध्ये पाणीपुरवठ्यासाठी टेंडर काढण्यात येते. या टेंडरमध्ये पाणीपुरवठा करणार्‍यांना बर्‍यापैकी अर्थपुरवठा होत असल्याने हे टेंडर घेण्यासाठी अनेकांचा आटापिटा असतो. या टेंडरसाठी अशा खस्ता खाल्या जात असल्या तरी यंदा मात्र याकडे कंत्राटदारांनी पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या निवेदेत अनामत रक्कम, शुल्क यासह अनेक नियमांची यादी आहे. या कंत्राटासाठी अनेक नियम असून यंदा त्या तुलनेत कंत्राट भरण्यास अनेकजण अनुत्सुक असल्याचे दिसून येत आहे.