Fri, Sep 20, 2019 05:15होमपेज › Aurangabad › आजपासून शहरात ‘पाणी कपात’

आजपासून शहरात ‘पाणी कपात’

Published On: May 04 2018 1:54AM | Last Updated: May 04 2018 1:14AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

एकीकडे उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढलेली असतानाच औरंगाबाद मनपाने शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. शहराचा पाणीपुरवठा मोठ्या चलाखीने एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. आता आज पाणी आले तर दोन दिवसांनंतर म्हणजेच चौथ्या दिवशी पाणी येईल. त्यानंतर परत दोन दिवसांचा गॅप असेल. मात्र तिसर्‍या रोटेशनच्या वेळी दोन दिवसांऐवजी तीन दिवसांचा गॅप असेल म्हणजे पाचव्या दिवशी पाणी येईल. त्यानंतर सतत असेच रोटेशन सुरू राहील. ऐन उन्हाळ्यात मनपाने घेतलेल्या या अघोरी निर्णयामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळणार, यात शंकाच नाही. 

या नव्या नियोजनातून जुन्या शहराला यातून वगळण्यात आले असून, सध्या आहे त्याच वेळापत्रकानुसार त्यांना पाणीपुरवठा होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांनी दिली. जुनाट जलवाहिनीमुळे आधीच शहर पाणीटंचाईने अनेक महिन्यांपासून त्रस्त आहे.  ही पाईपलाईन सतत फुटते. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे नियोजन बिघडत असते. जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही केवळ नियोजनाअभावी शहराला टंचाईच्या झळा अनेक वर्षांपासून भोगाव्या लागत आहेत. या टंचाईवर तोडगा काढण्यासाठी मनपा प्रशासनाने ‘रोगा पेक्षा इलाज भयंकर’ या उक्तीप्रमाणे रोटेशनच्या नावाखाली पाणी कपातीचे अघोरी नियोजन केले आहे. 

या निर्णयानुसार 1 मे पासून शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला. म्हणजेच 1 मे रोजी होणारा पाणीपुरवठा 2 तारखेला झाला. 2 चा 3 मे रोजी आणि 3 मे चे पाणी वितरण आज 4 मे रोजी होणार आहे. त्यासोबतच पाणीपुरवठा विभागाने शहरात रोटेशन पद्धतीने पाणी वितरण सुरू केले आहे. यात पहिल्या टप्प्यात दर चौथ्या दिवशी शहरवासीयांना पिण्यासाठी पाणी मिळेल, तर तिसर्‍या टप्प्यात पाचव्या दिवशी पाणी मिळेल. त्यानंतर पुन्हा पहिला टप्पा सुरू होईल.


 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex