Tue, Jul 23, 2019 06:43होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : ‘त्या’ बेपत्ता पीडितेचा व्हिडिओ व्हायरल

औरंगाबाद : ‘त्या’ बेपत्ता पीडितेचा व्हिडिओ व्हायरल

Published On: Jun 30 2018 9:10AM | Last Updated: Jun 30 2018 9:10AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

उपायुक्‍त (परिमंडळ-2) राहुल श्रीरामे यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार करणार्‍या पीडितेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात तिने आपबीती सांगितली आहे. हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोचला असून हा व्हिडिओ कोणी रेकॉर्ड केला?, ती तरुणी पीडिताच आहे का? या बाबींची सत्यता तपासण्याचे आदेश सायबर सेल विभागाला दिले आहेत.

नोकरीचे आमिष दाखवून पोलिस महिलेच्या 22 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी उपायुक्‍त (परिमंडळ-2) राहुल श्रीरामे यांच्याविरुद्ध बुधवारी एमआयडीसी सिडको ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा नोंद होऊन दोन दिवस लोटले असून पीडिता अजूनही पोलिसांना सापडलेली नाही. विशेष म्हणजे, तिचा शोध लागल्याशिवाय तपास पुढे जाणार नाही, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

व्हिडिओत काय?
चार महिन्यांपूर्वी राहुल श्रीरामे यांच्याशी ओळख झाली. एमपीएससी परीक्षेसाठी मार्गदर्शन करतो, तसेच पोलिस खात्यात नोकरीस लावून देतो, असे सांगत त्यांनी माझ्याशी ओळख वाढवली. त्यांनी मला
प्रोझोन मॉलजवळील त्यांच्या फ्लॅटमध्ये बोलावले. आधी फ्लॅट क्र. 205 मध्ये येण्यास सांगितले. कोणी विचारले तर माझे नाव सांगू नकोस, पाटील मॅडमने बोलावल्याचे सांग, असे त्यांनी बजावले होते. ते म्हटल्याप्रमाणे मी तसे केले. नंतर फोन करून त्यांनी मला फ्लॅट क्र.702 मध्ये येण्यास सांगितले. लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर समोर श्रीरामे दिसले. मी त्यांच्यासोबत फ्लॅटमध्ये गेले. त्यांनी मला पाणी दिले. मी त्यांना विचारले ‘सर, घरात दुसरे कोणी नाही?’ ते म्हणाले, ‘मी बॅचलर आहे’. नंतर ते माझ्याजवळ बसले. त्यांच्या तोंडातून दारूचा वास येत होता. त्यावर ‘सर, तुम्ही ड्रिंक केलेली आहे का?’ असे मी विचारले. ते म्हणाले, हो. त्यानंतर मी त्यांना म्हटले, सर, मी आता जाते आणि नंतर येते. तेवढ्यात ते किचनमध्ये गेले. त्यांनी हातात सुरी आणली होती. मला प्रचंड धक्‍का बसला. त्यांनी माझ्या हातावर सुरी ठेवत म्हणाले, मी तुला खूप लाईक करतो. तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हापासून मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. तुझा विश्‍वासघात करणार नाही. मी तुझ्यासोबत लग्न करेन, असे सांगितले. नंतर त्यांनी माझ्यावर बलात्कार केला. सकाळी उठल्यानंतर ते मला म्हणाले की, ही बाब आपल्या दोघांमध्येच ठेव. याबाबत कोणाकडेही वाच्यता करू नकोस. मी तुझ्यासोबत लग्‍न करेन. मी तुला आयुष्यभर सांभाळेन. त्यानंतर त्यांनी चार ते पाच वेळा माझ्यावर बलात्कार केला. दरम्यान, आता माझी बदली होणार आहे. माझे आधीच लग्न झालेले आहे. मला एक मुलगा आहे. तू उच्चशिक्षित आहेस. तुला चांगला जॉब मिळून जाईल, असे ते म्हणाले. हे ऐकून मला प्रचंड धक्‍का बसला. मी तेव्हाचे प्रभारी पोलिस आयुक्‍तमिलिंद भारंबे यांच्याकडे तक्रार करण्यासाठी गेले, परंतु त्यांनी मला तब्बल 2 तास बसवून ठेवले. भारंबे यांनी सांगितले की, श्रीरामेंविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. दोघे मिळून प्रकरण मिटवा.