Wed, Apr 24, 2019 02:12होमपेज › Aurangabad › लोकसभा 2019: भाजप करणार खैरेंची दमछाक

लोकसभा 2019: भाजप करणार खैरेंची दमछाक

Published On: Feb 18 2018 10:15AM | Last Updated: Feb 18 2018 11:19AMऔरंगाबाद : संजय देशपांडे

गेल्या निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होऊन विजयी झालेले शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे यांची आगामी निवडणुकीत भाजप दमछाक करणार आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना तब्बल अडीच लाखांवर मते मिळाली होती. ही मते आता भाजपला खुणावत आहेत. लोकसभेसाठी तगडा उमेदवार रिंगणात उतरवून शिवसनेच्या ताब्यातून औरंगाबाद मतदारसंघ हिसकावण्याची जय्यत तयारी भाजपने केली आहे. दुसरीकडे युतीतील मत विभाजनाचा काँग्रेसलाही फायदा होऊ शकतो.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत खा. खैरे यांच्यावर  मतदारांची नाराजी होती, मात्र नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा त्यांना फायदा झाला. या निवडणुकीत 5,20,549 मते मिळवून खा. खैरे विजयी झाले होते, तर काँग्रेसचे उमेदवार नितीन पाटील यांना 3,58,812 मते मिळाली होती. 1,61,737 मतांनी खा. खैरे विजयी झाले होते. लोकसभेनंतर शिवसेना, भाजपची युती फुटली. विधानसभेच्या निवडणुका दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढविल्या. युतीतील मतविभाजनाचा फायदा घेत ‘एमआयएम’ने औरंगाबाद मध्य मतदारसंघावर नाव कोरले. या निवडणुकीत गंगापूरचे आ. प्रशांत बंब यांचा अपवाद वगळता भाजपचे सर्व उमेदवार नवखे होते, मात्र त्यांनी 24 ते 64 हजारांपर्यंत लक्षणीय मते घेतली. भाजप उमेदवारांना सहा विधानसभा मतदारसंघांत तब्बल अडीच लाखांवर मते मिळाली होती. आ. बंब आणि औरंगाबादमधून (पूर्व) अतुल सावे हे दोन आमदार पक्षाला मिळाले. या मतांच्या जोरावर पक्षाने लोकसभेची जय्यत तयारी केली आहे.

उत्तर प्रदेशचे मंत्री महेंद्र सिंह यांची औरंगाबाद मतदारसंघासाठी प्रभारी म्हणून नियुक्‍ती केल्यानंतर भाजपने बूथनिहाय संघटन मजबूत केले आहे. वेरूळ येथील जनार्दन स्वामी संस्थानचे महामंडलेश्‍वर शांतिगिरी महाराज, माजी खा. जयसिंगराव गायकवाड, डॉ. भागवत कराड यांची नावे भाजपकडून आघाडीवर आहेत, मात्र ऐनवेळी आयात केलेला तगडा उमेदवार रिंगणात उतरू शकतो.