Fri, Mar 22, 2019 05:37
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : दोन शाळकरी मुले गोदावरीत बुडाली

औरंगाबाद : दोन शाळकरी मुले गोदावरीत बुडाली

Published On: Aug 27 2018 1:09PM | Last Updated: Aug 27 2018 1:09PMवैजापूर : प्रतिनिधी

श्रावण महिन्यात गोदावरी नदीत स्‍नान करून देवाला पाणी घालण्यासाठी गेलेली दोन शाळकरी मुले बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. वैजापूर तालुक्यातील बाबतारा येथे सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. यातील दोन्‍ही मुलांचा शोध सुरू असून अद्याप ते मिळाले नाहीत. विवेक कालीचरण कुमावत (वय १४) आणि तुषार सतिश गांगड (वय १४) अशी बुडालेल्या दोघा मुलांची नावे आहेत. 

श्रावण महिना असल्याने हे दोघे रोज सकाळी गोदावरीत आंघोळ करून देवाला पाणी घालण्यासाठी मंदिरात जात असत. नित्याप्रमाणे आज, सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारा विवेक व तुषार नदीवर गेले होते. नदीतून आंघोळ करून बाहेर येत असताना पाय घसरून पडून नदीच्या प्रवाहात वाहून गेले. 

यावेळी काही अंतरावर असणार्‍या एका व्यक्‍तीने ते बुडत असल्याचे पाहून आरडाओरडा केला. ग्रामस्‍थ गोळा झाले मात्र नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असून प्रवाहाला वेग असल्याने ते दोघे वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच वैजापूर व वीरगाव पोलिसांचे पथक घटनास्‍थळी दाखल झाले. त्यांचा शोध सुरू आहे, मात्र ६ तास उलटूनही ते अद्याप सापडले नाहीत. नदीपात्रातील खड्डे आणि पाण्याच्या वाहत्या प्रवाहामुळे तपासकार्यात अडचणी येत आहेत.