Wed, Jun 26, 2019 11:27होमपेज › Aurangabad › दरोेडेखोरांना ट्रकचालकाने चिरडले!

दरोेडेखोरांना ट्रकचालकाने चिरडले!

Published On: Mar 22 2018 1:38AM | Last Updated: Mar 22 2018 1:13AMपाचोड/ वडीगोद्री : प्रतिनिधी

औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरच पाचोडजवळील डोणगाव-कोळीबोडखा शिवारात बुधवारी पहाटे सशस्त्र दरोडेखोरांच्या एका टोळीची चांगलाच हैदोस घातला. आधी दरोडेखोरांनी एक ट्रक अडवून लूटमार केली. त्यानंतर समोरच छोटा हत्ती वाहन अडवून त्यांनी लूटमार सुरू करताच आधी लुटले गेलेल्या संतप्त ट्रकचालकाने ट्रक सुरू करून थेट दरोडेखोरांच्या अंगावर घातला. या ट्रकखाली चिरडून एका दरोडेखोराचा चेंदामेंदा झाला, तर अन्य एक दरोडेखोर गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे या प्रकारानंतर उरलेले दरोडेखोर आपल्या साथीदाराचा मृतदेह घेऊन तेथून पसार झाले. तसेच ट्रकचालकही तेथून निघून गेला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, इस्माईल रुबाब पिंजारी (32, रा. सुरत, गुजरात) हा आपला छोटा हत्ती (टेम्पो) वाहन घेऊन बीडहून सुरतकडे जात होता. बुधवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास या चालकाने लघुशंकेसाठी पाचोडपासून जवळच असलेल्या टाके डोणगाव-कोळीबोडखा शिवारातील सुंदरम जिनिंगजवळ टेम्पोे थांबविला. आधीच तेथे एक ट्रक उभा होता. त्यामुळे हे सुरक्षित ठिकाण असावे, असे समजून पिंजारीने टेम्पो थांबविला अन् तो लघुशंकेसाठी खाली उतरला. 

‘ते’ निघाले दरोडेखोर!

पिंजारी टेम्पोतून लघुशंकेसाठी खाली उतरताच मागून हातात तलवारी व इतर शस्त्र असलेले पाच- सहा जण धावत आले. तेव्हा तो ट्रक दरोडेखोरांनी अडविलेला असल्याचे अन् त्याला ते लुटत असल्याचे पिंजारीच्या लक्षात आले; परंतु तेथून निघण्याच्या आत दरोडेखोरांनी त्यालाही गाठले आणि मारहाण करीत त्याच्याकडून ऐवज काढून लूटमार सुरू केली. 

चालकाने थेट अंगावरच घातला ट्रक

ट्रकचालकाला सोडून दरोडेखोर समोर असलेल्या पिंजारीकडे लुटीसाठी येताच ट्रकचालकाने आपला ट्रक सुरू केला आणि सरळ सुसाट वेगाने समोर पिंजारीला लुटत असलेल्या दरोडेखोरांच्या अंगावर घातला. तो इतक्या वेगाने ट्रक घेऊन आला की, दरोडेखोर धडकेने दूर फेकले गेले. त्यातील एक दरोडेखोर तर ट्रकखाली चिरडून त्याचा चेंदामेंदा झाला. दुसरा दरोडेखोर गंभीर जखमी झाला. शिवाय ट्रकची पिंजारीलाही धडक बसली. त्यामुळे त्याच्या पायालाही गंभीर इजा झाली. या धडकेनंतर ट्रकचालकाने आपली ट्रक तशीच सुसाट वेगाने पाचोडच्या दिशेने पळविली आणि तो क्षणात गायब झाला. या प्रकाराने बचावलेल्या दरोडेखोरांचेही धाबे दणाणले. क्षणातच त्यांनी चपला, हातातील शस्त्र सोडून आपल्या ‘त्या’ चिरडलेल्या साथीदाराचा मृतदेह उचलला आणि धूम ठोकली. सुदैवाने बचावलेल्या टेम्पोचालक पिंजारीला  काही क्षण काही सुचलेच नाही. स्वत:ला कसेबसे सावरल्यानंतर त्याने जखमी अवस्थेत टेम्पो सुरू केला आणि सरळ पाचोडजवळील एक हॉटेल गाठले. हॉटेलचालकाला त्याने घडलेली हकीकत सांगितली. हॉटेलवाल्याने ही माहिती तत्काळ पाचोड ठाण्याचे सहायक निरीक्षक महेश आंधळे यांना कळविली. माहिती मिळताच महेश आंधळे, पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष खरड, पोलिस जमादार रामदास राख, नरेंद्र अंधारे, भगवान धांडे, नुसरत शेख, प्रमोद फोलाने आदींनी हॉटेलवर भेट दिली. तेथे पिंजारीने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसही हादरून गेले. 

त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक आंधळे यांनी याची माहिती औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह व जालना पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांना कळवली. नंतरचे अंबड पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश सोनुने, गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल परजणेे, पोलिस उपनिरीक्षक विकास कोकाटे हेही घटनास्थळी दाखल झाले. नंतर पाचोड आणि गोंदी पोलिसांनी संयुक्‍त शोध मोहीम राबविली; परंतु दरोडेखोर सापडले नाहीत.