Thu, Jul 18, 2019 10:08होमपेज › Aurangabad › औरंगाबाद जिल्ह्यातील रस्ते होणार तीनपदरी

औरंगाबाद जिल्ह्यातील रस्ते होणार तीनपदरी

Published On: Jan 20 2018 2:04AM | Last Updated: Jan 20 2018 1:48AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगाबाद शहर ते प्रत्येक तालुक्यातील मुख्यालय तीनपदरी दर्जेदार रस्त्यांनी जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतला आहे. रस्ते विकास योजनेंतर्गत हायब्रीड अ‍ॅन्युईटी प्रकल्पाअंतर्गत होणार्‍या या कामांच्या निविदाही फायनल करण्यात आल्या आहेत. पुढील दोन वर्षांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल 245 किलोमीटर रस्ते या प्रकल्पाअंतर्गत तीन पदरी व गुळगुळीत करण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली.

 आज घडीला जिल्ह्यातील तालुक्यांना जोडणार्‍या अनेक रस्त्यांची अवस्था प्रचंड बिकट आहे. पैठण, वैजापूर, कन्नडसह अनेक रस्ते अरुंद आणि खड्डेमय झालेले आहेत. रस्ते सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्याचे मुख्यालय ते तालुक्यांचे मुख्यालय जोडणारे रस्ते तीन पदरी आणि गुळगुळीत करण्यासाठी ‘हायब्रीड अ‍ॅन्युईटी’ हा प्रकल्प हाती घेतलेला आहे. या प्रकल्पाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील शिऊर बंगला ते कन्नड, पिशोर, भराडी, सिल्लोड व वैजापूर- गंगापूर, भेंडाळा फटा, शेंदूरवादा, बिडकीन, कचनेर, करमाड व पैठण ते पाचोड या 245 किलोमीटर रस्त्याचे काम हाती घेण्यात येत आहे. तसेच जालना जिल्ह्यातही 131 कि.मी. रस्त्याची या प्रकल्पाअंतर्गत सुधारणा करण्यात येणार आहे. 

निविदा फायनल
या कामांसाठी मागविण्यात आलेल्या निविदा फायनल करण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत एकूण 7 कामांसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यापैकी पाच कामांच्या निविदेला प्रतिसाद मिळाला. जालना जिल्ह्यातील बदनापूर, नाणेगाव, किनगाव, जामखेड, आकोला ते माहोरा व पाचोड ते अंबड, घनसावंगी, आष्टी या दोन कामांच्या निविदांना मात्र अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या दोन्ही कामांच्या फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी सांगितले. 

दोन वर्षांत काम पूर्ण
मंजूर करण्यात आलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत सर्व तालुका मुख्यालये औरंगाबाद जिल्ह्या मुख्यालयांशी तीन पदरी व गुळगुळीत रस्त्याने जोडल्या जातील, असा विश्‍वास सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एम. एम. सुरकुटवार व अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी व्यक्‍त केला. संबंधित ठेकेदाराने या रस्त्याची पुढील दहा वर्षे देखभाल आणि दुरुस्तीही करायची आहे.