Tue, Jun 25, 2019 13:25होमपेज › Aurangabad › ट्रॅव्हल्सने दुचाकीवरील चौघांना चिरडले

ट्रॅव्हल्सने दुचाकीवरील चौघांना चिरडले

Published On: Jan 19 2018 1:48AM | Last Updated: Jan 19 2018 12:38AMवैजापूर : प्रतिनिधी

शैक्षणिक सहल घेऊन जाणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका पाच वर्षीय चिमुकल्यासह दोघेजण जागीच ठार झाले आहेत. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तालुक्यातील खंडाळा गावाजवळ हा भीषण अपघात घडला. 

यातील दोघांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. सोमनाथ जालिंदर जाधव (5 वर्षे, रा. सावखेडा, ता. वैजापूर) आणि विजय सखाराम पवार (30, रा.सावखेडा) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुजरात येथील अक्षरधाम कंपनीची खासगी बस ही बलसाड जिल्ह्यातील धरमपूर येथील बारसोल प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल घेऊन दौलतबाद येथे गेली होती. दौलताबाद येथील देवगिरी किल्‍ला बघितल्यानंतर ही बस (जीजे डब्ल्यू 4919) नाशिक जिल्ह्यातील वणीकडे रवाना झाली. 

तालुक्यातील खंडाळ्याजवळील बाबा लॉन्सनजीक आल्यानंतर वैजापूर येथून तालुक्यातील सावखेडा येथे बजाज कंपनीच्या दुचाकीवर (एमएच 20 एडी 5481) जाणार्‍या चौघांना ट्रॅव्हल्सने चिरडले. या अपघातात सोमनाथ जाधव या चिमुकल्यासह अन्य एक 30 वर्षीय तरुण जागीच ठार झाला. तर गीता जालिंदर जाधव (26) व अज्जू सखाराम पवार (20) हे दोघेजण गंभीर जखमी झाले. दोघे मृत व जखमी हे तालुक्यातील सावखेडा येथील रहिवासी आहेत. घटनेनंतर 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात तर सोमनाथचा मृतदेह औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रतापसिंग बहुरे, पोलिस नाईक लक्ष्मण गवळी, गुणवंत थोरात आदींनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केला. तत्पूर्वी जखमींना नागरिकांनी रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले होते. दरम्यान पोलिसांनी खासगी बस ताब्यात घेतली असून ती पोलिस ठाण्यात आणली आहे. बसचा चालक व क्‍लीनर हे दोघेही अपघातानंतर फरार झाले आहेत. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.