होमपेज › Aurangabad › टाऊन हॉल, मनपा मुख्यालयाची इमारत ठेवणार गहाण

टाऊन हॉल, मनपा मुख्यालयाची इमारत ठेवणार गहाण

Published On: Dec 12 2017 2:10AM | Last Updated: Dec 12 2017 2:09AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

भूमिगत गटार योजनेच्या ठेकेदारास निविदा दरातील फरकाची रक्‍कम देण्यासाठी महानगरपालिका 98 कोटी 31 लाख रुपयांचे कर्ज काढणार आहे. हुडकोकडून हे कर्ज काढण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेकडे सादर केला आहे. या कर्जाला हमी म्हणून मनपा मुख्यालयाची इमारत, ऐतिहासिक टाऊन हॉल आणि बन्सीलालनगरातील अग्‍निशमन केंद्राची इमारत गहाण ठेवली जाणार आहे. 

यूआयडीएसएसएम योजनेंतर्गत केंद्र सरकारने 24 डिसेंबर 2013 रोजी औरंगाबाद शहराच्या भूमिगत गटार योजनेच्या प्रस्तावास मंजुरी दिली. ही मूळ योजना 365 कोटी 69 लाख रुपयांची होती. प्रत्यक्षात या योजनेच्या कामाची निविदा 31 टक्के जादा दराने मंजूर करण्यात आली. त्यामुळे योजनेचा खर्च 465 कोटी रुपयांवर गेला आहे. आता मूळ किंमत आणि मंजूर निविदा यातील फरकाची 98 कोटी 31 लाख रुपयांची रक्‍कमही मनपालाच टाकायची आहे. त्यासाठी प्रशासनाने 98 कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचा प्रस्ताव तयार करून तो सर्वसाधारण सभेकडे सादर केला आहे. 

हे कर्ज मिळविण्यासाठी पालिकेला कर्ज रकमेच्या सव्वाशे टक्के किमतीच्या मालमत्ता हुडकोकडे तारण ठेवाव्या लागणार आहेत. त्यानुसार पालिकेने स्वतःच्या मालकीच्या तीन मालमत्तांची यादी तयार केली आहे. यामध्ये मनपा मुख्यालयाची इमारत, ऐतिहासिक टाऊन हॉल आणि अग्‍निशमन केंद्राची इमारत यांचा समावेश आहे.