Thu, Aug 22, 2019 12:29होमपेज › Aurangabad › रस्त्यावर कचरा टाकला; तब्बल तेरा हजारांचा दंड

रस्त्यावर कचरा टाकला; तब्बल तेरा हजारांचा दंड

Published On: Aug 09 2018 1:35AM | Last Updated: Aug 09 2018 1:35AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

वारंवार आवाहन करूनही रस्त्यावर कचरा टाकणार्‍यांविरुद्ध अखेर मनपा प्रशासनाने बुधवारपासून (दि. 8) दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. पहिल्या दिवशी शहरातील विविध भागांतील दुकानदार, व्यावसायिक, रस्त्यावर कचरा फेकणार्‍या, थुंकणार्‍या नागरिकांनाही दंड आकारण्यात आला. एकूण 46 जणांवर कारवाई करीत साडेतेरा हजारांचा दंड वसूल केला. यामुळे शहरातील नागरिक आणि व्यावसायिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.

शहराची कचराकोंडी सोडविण्यासाठी मनपा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. कचरा संकलनासाठी प्रत्येक वॉर्डात-गल्लीत घंटागाड्या पाठविल्या जात आहेत. त्यासोबतच वॉर्डा-वॉर्डात जनजागृती करून रस्त्यावर कचरा टाकू नये, असे आवाहन केले जात आहे. तरीही रस्त्यांवर कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाने या प्रवृत्तींना अटकाव करण्यासाठी बुधवारपासून दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू केली. त्यासाठी प्रभागनिहाय स्वच्छता निरीक्षक, जवानांच्या पथकांकडून सकाळपासूनच ही मोहीम हाती घेण्यात आली. घनकचरा प्रकल्प प्रमुख सखाराम पानझडे, व्यवस्थापन प्रमुख नंदकुमार भोंबे यांनी कॅनॉट प्लेस परिसरात एका पानटपरी चालकांवर रस्त्यावर कचरा टाकल्याप्रकरणी पहिली 500 रुपये दंडाची पावती फाडली. या भागातील येथे 11 व्यावसायिकांना प्रत्येकी 500 रुपये दंड आकारत अवध्या 15 मिनिटांतच 5 हजार 100 रुपयांची वसुली केली. दिवसभरात पालिकेच्या पथकांनी चार प्रभागांतील बाजारपेठा, प्रमुख नागरी वसाहतींत 46 जणांवर कारवाई करीत 13 हजार 450 रुपयांचा दंड वसूल केला. कारवाई दरम्यान काही ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रकारही घडले.

रस्त्यावर थुंकणे पडले महाग

कॅनॉट प्लेस येथील पानटपरी चालकाला रस्त्यावर टाकल्याप्रकरणी मनपा अधिकारी दंड आकारत असतानाच एक नागरिक पान खाऊन बाजूला थुंकला. ते पाहताच भोंबे यांनी त्या नागरिकास 100 रुपये दंडाची पावती दिली. त्यावर त्या नागरिकाने वाद घातला. मात्र, पावती घेऊन दंड भरता की गुन्हा दाखल करायचा, अशी तंबी देताच त्याने जागेवरच दंड भरला.

या चार प्रभागांत कारवाई

 पहिल्या दिवशी पथकांनी चार प्रभागात कारवाई केली. यात प्रभाग क्रमांक-7 मध्ये 11 व्यावसायिक व नागरिकांवर कारवाई करत 5,100 रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रभाग दोन-मध्ये 15 जणांकडून 2,250 रुपये, प्रभाग आठ-मध्ये दोघांकडून 300 रुपये, तर प्रभाग नऊ-मध्ये 18 जणांवर कारवाई करत 5,800 रुपये दंड भरून घेण्यात आला.