होमपेज › Aurangabad › मराठा आंदोलन : औरंगाबादमधील तीन युवकांचा जलसमाधी घेण्याचा प्रयत्न

मराठा आंदोलन: युवकांचा जलसमाधी घेण्याचा प्रयत्न

Published On: Jul 31 2018 2:32PM | Last Updated: Jul 31 2018 2:46PMलोणी खुर्द : प्रतिनिधी

पाराळा (ता.वैजापूर) येथील मन्याड साठवण तलावात मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न तीन युवकांनी केला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करत   देविदास निकम, संतोष निकम, शिवनाथ निकम या युवकांनी  मन्याड धरणात उडी मारली, मात्र पोलिसांनी त्याला बाहेर काढले. या प्रकारामुळे धरणावर तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. 

मराठा समाजाच्या युवकांनी सोमवारी (ता. ३०) तहसील कार्यालय वैजापूर येथे जलसमाधी घेणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. त्या अनुषंगाने आज मंगळवार (ता.३१) पहाटेपासूनच आसपासच्या परिसरातील मराठा समाजातील  युवक मन्याड धरणावर जमा होण्यास सुरुवात झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौज फाटा, तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण टीमच्या बोट धरणात तैनात करण्यात आल्या. 

उपजिल्हाधिकारी डॉ.संदीपान सानप, तहसीलदार सुमन मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार हे आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु आंदोलक जिल्हाधिकाऱ्यांना मन्याड धरण येथे बोलावण्यावर ठाम असून, जो पर्यंत ते येत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यावर आंदोलक ठाम आहे.

जिल्हाधिकारी आंदोलन स्थळी न आल्यास आंदोलन चिघळण्याची शक्यता असून अजूनही मराठा समाजातील युवक  मोठ्या संख्येने आंदोलन स्थळी येत आहेत.