Wed, Feb 20, 2019 08:59होमपेज › Aurangabad › ‘उन्नत’साठी निवडलेली तीन गावे अखेर बदलली 

‘उन्नत’साठी निवडलेली तीन गावे अखेर बदलली 

Published On: Feb 14 2018 2:50AM | Last Updated: Feb 14 2018 2:12AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने उन्नत भारत अभियान अंतर्गत विकासासाठी निवडलेली तीन गावे दैनिक पुढारीच्या दणक्यानंतर बदलली आहेत. जिल्हा परिषदेने ही तीन गावे मुख्यमंत्री ग्रामविकास योजनेत आधीच दत्तक घेतली होती. विद्यापीठाने त्यांचीच ‘उन्नत’साठी निवड करून आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रयत्न चालविला होता. दैनिक पुढारीने ही बाब प्रकाशात आणल्यानंतर विद्यापीठ प्रशासन वरमले आणि दुसर्‍या तीन गावांना विकासाची संधी मिळाली. 

केंद्र सरकार आयआयटीसारख्या संस्थांना सहभागी करून देशातील अनेक गावे मॉडेल व्हिलेज म्हणून विकसित करणार आहे. उन्नत भारत अभियान असे या योजनेचे नाव आहे. याअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील पाच गावे विकसित करण्यात येणार आहेत. गावांच्या निवडीची जबाबदारी विद्यापीठावर सोपविण्यात आली होती. तथापि, विद्यापीठ प्रशासनाने निवडीचा ताण न घेता जि.प.ने मुख्यमंत्री ग्रामविकास योजनेत दत्तक घेतलेल्या जांबडी, पैठणखेडा (दोन्ही ता. पैठण) आणि दहेगाव बंगला (ता. गंगापूर) या तीन गावांसह पाच गावांची निवड केली. जिल्हा परिषद मुख्यमंत्री ग्रामविकास योजनेद्वारे या गावांचा विकास करणार आहे. मग विद्यापीठाने उन्नतसाठी त्यांची निवड करून काय साध्य केले.  जि. प. या तीन गावांचा विकास करणार आहे, तर मग उन्नत काय फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणार आहे काय, ठरावीक गावांत दोन-दोन योजना राबविल्या जाणे हा इतर गावांवर अन्याय नाही का, असा सवाल दैनिक पुढारीने उपस्थित केला होता. याची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने जांबडी, पैठणखेडा आणि दहेगाव बंगला ही गावे रद्द करून त्याऐवजी आता मावसाळा (ता. खुलताबाद), चिंचोली बुद्रुक (ता. फलंब्री) आणि चांदापूर (ता. सिल्लोड) या गावांची निवड केली आहे. आधीच्या यादीतील गेवराई कुबेर, करोडी (साजापूर) ही गावे नव्या यादीत कायम आहेत. आयआयटी पवर्ईच्या मदतीने या पाच गावांत विकास कामे केली जाणार आहेत.