Thu, Mar 21, 2019 15:51होमपेज › Aurangabad › विद्यार्थिनीची छेड; प्राध्यापकाला फासले काळे 

विद्यार्थिनीची छेड; प्राध्यापकाला फासले काळे 

Published On: Mar 13 2018 2:19AM | Last Updated: Mar 13 2018 2:19AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

प्रॅक्टिकल परीक्षेत नापास करण्याची धमकी देऊन सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या एका प्राध्यापकाने बारावीच्या विद्यार्थिनीशी व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉलिंग, अश्‍लील चॅटिंग करून तिची छेड काढली. हा प्रकार विद्यार्थिनीच्या भावाला समजल्यावर त्याने मित्रांसह सोमवारी (दि. 12 ) सकाळी साडेदहा वाजता कॉलेजमध्ये प्राध्यापकाला काळे फासले. मनोज बद्रीनारायण जैस्वाल (40, रा. काचीवाडा) असे प्राध्यापकाचे नाव असून त्याच्याविरुद्ध क्रांती चौक ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्याला क्रांती चौक पोलिसांनी अटक केली. तो विवाहित असून एक मुलगा आणि एका मुलीचा पिता आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव अधिक तपास करीत आहेत. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूजा (नाव बदललेले आहे) ही सरस्वती भुवन महाविद्यालयात वाणिज्य शाखेत बारावीचे शिक्षण घेते. तिची नुकतीच परीक्षाही झाली. दरम्यान, अकाउंट विषय शिकविणारा प्राध्यापक मनोज जैस्वाल याने दोन महिन्यांपूर्वी पूजाला व्हॉट्सअ‍ॅपवर ‘हाय’ असा मेसेज पाठविला. त्याच्याकडे दुर्लक्ष करून तिने काहीही उत्तर दिले नाही. परंतु, त्यानंतर आरोपी जैस्वाल याने ‘पूजा, मला तुला भेटून महत्त्वाचे बोलायचे आहे. तू मला भेटायला ये’ असा मेसेज व्हाट्सअ‍ॅपवरच पाठविला. काहीतरी काम असेल, असे समजून पूजाने नंतर जैस्वाल याला फोन करून काय काम आहे? अशी विचारणा केली. ‘मला तुला भेटायचे आहे. मी तुला खूप लाईक करतो’ असे तो म्हणाला असता पूजाने फोन कट केला.

हा प्रकार नंतर इतका वाढला की प्राध्यापक असलेल्या जैस्वालने शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याची सर्व बंधने तोडली. पूजाला अश्‍लील मेसेज पाठविणे, तिला व्हिडिओ कॉलिंग करून अश्‍लील बोलणे, असा प्रकार सुरूच ठेवला. दरम्यान, रविवारी पूजाने मोठ्या भावाला सर्व प्रकार सांगितल्यानंतर सोमवारी सकाळी त्याने मित्रांना घेऊन कॉलेज गाठले. तेथे आरोपी प्राध्यापक मनोज जैस्वाल याच्यावर शाईफेक करून त्याला काळे फासले. त्यानंतर त्याला क्रांती चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.