Tue, May 21, 2019 00:39होमपेज › Aurangabad › चोरट्यांचा फुलंब्री तालुक्यात धुमाकूळ : रात्री तीन गावांत ११ ठिकाणी चोरी

चोरट्यांचा फुलंब्री तालुक्यात धुमाकूळ : रात्री तीन गावांत ११ ठिकाणी चोरी

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 07 2018 12:17AM

बुकमार्क करा
फुलंब्री : प्रतिनिधी

तालुक्यातील जातेगाव, चिंचोली आणि बिल्डा या तीन गावांत शुक्रवारी रात्री चोरट्यांनी प्रचंड धुमाकूळ घालून सात दुकाने व चार घरे फोडून रोख रकमेसह 13 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनांमुळे  परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले असून चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.    

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील शुक्रवारी रात्री जातेगाव येथील स्वराज फोटो स्टुडिओ, दिव्या मेडिकल स्टोअर्स, सदगुरू मशिनरी, रामेश्वर बीज भांडार, अलंकार ज्वेलर्स सह  दोन किराणा दुुकाने आणि दोन घरे फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह जवळपास दहा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सर्व दोन दुकानांचे शटर व घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी ही चोरी केली. एकाच गावात एकाच रात्री नऊ ठिकाणी चोर्‍या करून एक प्रकारे चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.    

जातेगावनंतर चिंचोली येथे चोरट्यांची आपला मोर्चा वळविला. या गावातील नारायण सखाराम मते यांचे दुमजली घर फोडून अंदाजे एक लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या, तसेच बिल्डा येथील श्रीधर रामराव जाधव यांच्याही  घरातील दीड लाखाच्या मौल्यवान वस्तू लंपास करून चोरट्यांनी धूम ठोकली. एकाच रात्री तीन गावांत 11 ठिकाणी चोर्‍या  करून ऐवज लंपास केल्याची बहुदा तालुक्यात ही पहिलीच घटना असावी. या घटनांमुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले असून 

चोर्‍यांच्या घटनांचे पोलिसांना गांभीर्य नाही 

तालुक्यात फुलंब्री व वडोद बाजार असे दोन पोलिस ठाणे आहेत. 26 डिसेंबर रोजी बाबरा येथे एकाच रात्रीत तीन ज्वेलर्स दुकाने व दोन घरांमध्ये धाडसी चोरी झाली होती. तिचा छडा लागत नाही तोच पुन्हा या तीन गावांत 11 ठिकाणी चोर्‍याची घटना घडली. पोलिस घटनास्थळी येतात. पंचनामा करून  जातात. मात्र त्याकडे पुन्हा गांभीर्याने बघितले जात नसल्यामुळे चोर्‍यांच्या घटना उघडकीस येत नाहीत. परिणामी चोरट्यांची ताकद वाढत आहे, असेच म्हणावे लागेल.