होमपेज › Aurangabad › गुप्तधनाचे आमिष; टोळी गजाआड

गुप्तधनाचे आमिष; टोळी गजाआड

Published On: Feb 19 2018 1:24AM | Last Updated: Feb 19 2018 1:24AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून शेतकर्‍याला एक लाख रुपयांना गंडा घालणार्‍या टोळीचा अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला. तीन भोंदूबाबांना यवतमाळ येथून अटक करण्यात आली आहे. बळीराम भीमराव जाधव (50), दिलावर खान नामदार खान पठाण (59, रा. बोरी) व गणेश धर्माजी गायकवाड ऊर्फ कांबळे (41, रा. पुसद, जि. यवतमाळ) अशी अटक केलेल्या भोंदूबाबांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतात मिळालेले गुप्तधन काही जण विक्री करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना 31 जानेवारी रोजी मिळाली होती. त्यावरून पोलिस उपनिरीक्षक भंडारे व त्यांच्या सहकार्‍यांनी सापळा रचून दिगंबर वाघमारे व बाबासाहेब शिंदे या दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली. यावेळी दोघांकडे काही नाणी सापडली होती. पोलिसांनी ती तपासली असता बनावट निघाली. पोलिसांनी दोघांकडे चौकशी केली असता ज्ञानेश्‍वर त्र्यंबक सोनवणे (रा. उंदीरवाडी, ता. वैजापूर, ह.मु. इटावा) यांच्याशी 26 जानेवारी रोजी हरिदास गवळी याने संपर्क साधून लासूरगाव खडक-नारळा येथे आत्माराम थोरात यांच्या शेतात गुप्तधन असल्याचे सांगितले होते.

तसेच तुम्ही एक लाख रुपये दिल्यास पैसे परत करून गुप्तधनातील काही हिस्सा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानुसार सोनवणे यांना 27 जानेवारी रोजी पैसे घेऊन बोलाविले होते. सोनवणे यांनी घरात ठेवलेले 83 हजार रुपये व एटीएम मधून 17 हजार रुपये काढून गवळी यांना दिले. यावेळी गवळी सोबत काकासाहेब जाधव व गुप्तधन काढून देणारे तीन बाबा होते. मात्र त्याच दिवशी सोनवणे यांनी सायंकाळी गवळीला सोने नको, मला माझे पैसे परत कर म्हणाले. त्यावर गवळी व त्याच्यासोबत असलेल्यांनी सोनवणेला पैसे परत करेपर्यंत 12 नाणी ठेवण्यासाठी दिली होती. मात्र गुप्तधन सापडले असून व ते विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना 31 जानेवारी रोजी रात्री मिळाली. पोलिसांनी दिगंबर वाघमारे व बाबासाहेब शिंदे या दोघांना ताब्यात घेतल्यावर सर्व प्रकार समोर आला.

हंडा व बनावट नाणी जप्त
पोलिसांनी दिगंबर व शिंदे दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे एक पितळी हंडा व 257 नाणी सापडली. पोलिसांनी ती तपासली असता बनावट असल्याचे समोर आले. त्यामुळे ज्ञानेश्‍वर सोनवणे यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून एक लाखाला फसविल्याची तक्रार दिली. 

त्यानुसार गुन्हे शाखेच्या एका पथकाने गुप्तधन काढून देणारे तिघे यवतमाळचे असल्याचे कळाल्यावर शुक्रवारी जाऊन बळीराम जाधव, दिलावर खान पठाण व गणेश गायकवाड या तिघांना अटक केली. यापैकी दिलावर खानचे किराणा दुकान आहे. तर बळीराम मजुरी व गणेश हा वेल्डिंग दुकानात कामाला होता. या तिघांनी असे अनेक गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी व्यक्त केली आहे. पोलिस त्यादृष्टीने तपास करत आहेत.