Mon, May 20, 2019 18:42होमपेज › Aurangabad › गुरू लॉन्समधून अडीच लाखांचे दागिने लंपास

गुरू लॉन्समधून अडीच लाखांचे दागिने लंपास

Published On: Feb 05 2018 1:29AM | Last Updated: Feb 05 2018 1:21AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

लग्‍न सोहळ्याआधी शनिवारी हळद समारंभाला बीड बायपासवरील गुरू लॉन्समध्ये दाखल झालेल्या नियोजित नववधूच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. हळद समारंभानंतर अंगावरील दागिने काढून बॅगमध्ये ठेवले असता ती बॅग चोरट्यांनी लंपास केली. यात तब्बल आठ तोळे सोन्याचे दागिने, पैंजण असा एकूण अडीच लाखांचा ऐवज होता. याप्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले; परंतु ते अस्पष्ट आल्याने तपासात अडथळा निर्माण होत आहे.

याबाबत सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सांगितले की, हर्सूल परिसरातील सेवानिवृत्त अधिकारी रमेश गुलाबराव घोडके यांचा मुलगा रोहित याचे मनोज दुरूगकर यांची मुलगी स्नेहा यांचे रविवारी लग्‍न होणार होते; परंतु शनिवारी हळदीचा कार्यक्रम असल्याने ते बायपासवरील गुरू लॉन्स मंगल कार्यालयात गेले. हळदीच्या समारंभामुळे नियोजित वधू स्नेहा हिच्या अंगावर चार तोळ्यांचा हार, तीन तोळ्यांचा नेकलेस, एक तोळ्याची कर्णफुले, शंभर ग्रॅमचे चांदीचे पैंजण आणि चांदीचा पट्टा घातला होता. कार्यक्रम संपल्यानंतर स्नेहा हिने दागिने काढून खोलीतील बॅगमध्ये ठेवले. रात्री दहा वाजेच्या सुमारास दोन अल्पवयीन चोरट्यांनी त्या खोलीत प्रवेश करून अडीच लाखांच्या दागिन्यांची बॅग लंपास केली. रात्री साडेअकरा वाजता स्नेहासह सर्व नातेवाईक खोलीत गेले असता त्यांना दागिन्यांची बॅग लंपास झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत लॉन्समधील सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यांना खोलीतून दोन अल्पवयीन चोरटे बॅग घेऊन जाताना दिसले.