Fri, Jul 19, 2019 05:30होमपेज › Aurangabad › पाकीटमारांचा ‘डल्लाबोल’;  गुन्हे शाखेने चौघांना पकडले

पाकीटमारांचा ‘डल्लाबोल’;  गुन्हे शाखेने चौघांना पकडले

Published On: Feb 05 2018 1:29AM | Last Updated: Feb 05 2018 1:23AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी निघालेल्या राष्ट्रवादीच्या मोर्चात पाकीटमारांनी चक्‍क ‘डल्लाबोल’ केला. यामुळे अनेक मोर्चेकरांची निराशा झाली. दरम्यान, शहर गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. 3) चार पाकीटमारांची गँग पकडली असून त्यांच्याकडून 17 हजार 600 रुपये रोकड, तीन मोबाइल, एटीएम, पॅन, आधार कार्ड आणि एक पाकीट जप्त करण्यात आले. 

प्रमोद उमेश प्रधान (21, रा. गल्ली क्र. 4, मिसारवाडी), बाळू भागाजी मकळे (22, रा. आंबेडकरनगर), मंगेश रमेश तुपे (19, रा. शताब्दीनगर) आणि प्रमोद दालचंद भुजे (18, रा. गल्ली क्र. 3, मिसारवाडी) अशी पकडलेल्या पाकीटमारांची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी दिली. 

दरम्यान, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल, हवालदार शिवाजी झिने, राजेंद्र साळुंके, पोलिस नाईक विलास वाघ, कॉन्स्टेबल सुनील धात्रक, गजानन मान्टे, विशाल सोनवणे यांच्या पथकाने अंदाजे पावणेसहा वाजता सभास्थळी गर्दीत लोकांचे खिसे चाचपडताना तरुणांच्या टोळीला पाहिले. संशयावरून त्यांना ताब्यात घेतल्यावर झडती घेतली. यातील मंगेश तुपे याच्या जवळ एक पाकीट आढळले. त्यात सचिन भास्कर ठुबे नावाचे आधार, विविध बँकांचे एटीएम, मतदान कार्ड आढळून आले. सोबतच प्रमोद प्रधान, बाळू मकळे आणि प्रमोद भुजे यांचीही झडती घेण्यात आली. त्यांच्याकडून तीन मोबाइल, 17 हजार 600 रुपये रोकड आणि पाकीट जप्त करण्यात आले.