औरंगाबाद : प्रतिनिधी
एप्रिल महिन्यात सरासरी कमाल तापमान 40 अंशांपेक्षा जास्त राहिले. शेवटच्या आठवड्यात तापमान 42 अंशांपर्यंत पोहोचले आहे. कमाल तापमानाबरोबरच आता किमान तापमानातही वाढ होऊ लागल्याने पंखा, कुलरही आता गरम हवा मारू लागले आहेत.
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून पारा 42 अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने दिवसभर उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, सायंकाळनंतर रात्रीचे तापमान हे 24 ते 26 अंश सेल्सिअस राहत असल्याने वातावरण आल्हाददायक होते. मंद व हलका वाहणार्या वार्याने गारवा निर्माण होत होता. मे महिन्यात मात्र कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. पारा हळूहळू 43 अंशांच्या दिशेने सरकू लागला आहे. त्यासोबतच किमान तापमानातही वाढ होत आहे. सोमवारी (दि. 2) 27 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. आगामी आठवड्यात 27-28 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे.
बुधवार-गुरुवारी 44 पर्यंत जाण्याचा अंदाज
मे महिन्यातील 9 आणि 10 रोजी कमाल तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
उष्माघातापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
उष्माघाताची लक्षणे दिसून आल्यास, चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घर थंड ठेवण्यासाठी पडदे व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. सकाळी दहा वाजेपूर्वी जास्तीत जास्त कामांचा निपटारा करावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय चौधरी यांनी केले आहे. दुपारी बारा ते साडेतीन या वेळेत बाहेर जाण्याचे टाळावे. गडद रंगाचे, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळा. मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात. उन्हाच्या वेळेत स्वयंपाक करणे टाळावे.