Mon, Jun 17, 2019 02:12होमपेज › Aurangabad › महावितरणच्या ‘झटक्या’ने भाजी विक्रेत्याची आत्महत्या

वीजबिलाचा शॉक; भाजी विक्रेत्याची आत्महत्या

Published On: May 11 2018 7:52AM | Last Updated: May 11 2018 11:45AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

महावितरणच्या हलगर्जीपणाने गुरुवारी कळस गाठला. पत्र्याच्या दोन खोल्यांच्या घराला तब्बल पावणेनऊ लाख रुपये वीज बिल आल्यामुळे भेदरलेल्या एका भाजीपाला विक्रेत्याने बिल भरण्याच्या चिंतेतून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गारखेडा परिसरातील भारतनगरात घडलेली ही खळबळजनक घटना सकाळी उघडकीस आली. चुकीच्या बिलाला जबाबदार असलेल्या कारकुनाला महावितरणने तडकाफडकी निलंबित केले; परंतु आत्महत्येस जबाबदार महावितरणच्या संबंधित अधिकारी-कर्मचार्‍यांवर गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातेवाइकांनी घेतल्याने तणाव वाढला आहे. जगन्नाथ नेहाजी शेळके (43, रा. भारतनगर, गारखेडा) असे मृताचे नाव असून ते गजानन महाराज मंदिर चौकात हातगाडीवर भाजीपाला विकत असत. 

घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेळके यांना तीन दिवसांपूर्वी महावितरणने एक महिन्याचे बिल पावणेनऊ लाख रुपये दिले होते. त्यामुळे शेळके यांना धक्‍काच बसला. त्यामुळे त्यांनी महावितरणच्या कार्यालयात धाव घेऊन जास्तीच्या बिलाबाबत चौकशी केली. त्यावर महावितरणच्या अधिकार्‍यांनी बिल तर भरावेच लागेल, नसता तुमची मालमत्ता जप्त केली जाईल, असा इशारा दिला होता. तेव्हापासून ते तणावात होते. ही बाब त्यांनी पत्नीसह तिन्ही भावांना सांगितली होती. त्यावर भावांनी महावितरणच्या अधिकार्‍यांशी बोलून बिल कमी करता येते, अशी त्यांची समजूत घातली होती. दरम्यान, महावितरणचे कर्मचारी सतत घरी येऊन बिल भरण्यासाठी तगादा लावत होते. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून ते प्रचंड तणावात होते. अखेर बुधवारी मध्यरात्री घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.

पहाटे मुलाच्या नजरेस पडला मृतदेह
भारतनगरात पत्र्याच्या दोन खोल्यांमध्ये जगन्नाथ पत्नी आणि मुलासह राहत होते. त्यांना तीन मोठे भाऊ असून ते वेगळे राहून शहरातील विविध भागांत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. जगन्नाथ यांच्या दोन मुलींचा विवाह झालेला आहे. मुलगा अक्षय बारावीत शिकतो. तो बुधवारी रात्री मित्राच्या घरी झोपण्यासाठी गेला होता. तर पत्नी, अंबडला लग्‍नाला गेली होती. त्यामुळे जगन्नाथ हे घरी एकटेच होते. पहाटे पाचच्या सुमारास अक्षय घरी आला तेव्हा त्याला वडिलांचा मृतदेह नजरेस पडला.

वडिलांनी आत्महत्या केल्याचे अक्षय याने नातेवाईकांना फोन करून सांगितले. शेजारी व नातेवाईक यांनी जगन्नाथ यांच्याजवळ सुसाईड नोट बघितल्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांना कळविले. त्यांनी शेळके यांना बेशुद्धावस्थेत पोलिस व्हॅनने घाटी रुग्णालयात आणले. मात्र, सव्वादहा वाजता त्यांना तपासून मृत घोषित करण्यात आले. त्यांचा मृतदेह शवागृहात ठेवल्यानंतर नातेवाइकांनी पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठून घर जप्ती व कारवाईच्या धमक्या देणार्‍या महावितरणच्या संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यास सहमती दर्शविली. मात्र, नातेवाइकांनी एफआयआर दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली. ही बाब पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक लक्ष्मीनारायण शिंगारे यांना कळताच त्यांनी आपल्या सहकार्‍यांसह घाटीत धाव घेतली. शवविच्छेदन झाल्यावर अहवाल प्राप्त होताच गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन दिले. बिल देणारा लिपिक सुशील कोळी यांना निलंबित करण्यात आले असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. 

कारकून निलंबित
वरिष्ठांचे आदेश मिळताच प्राथमिक चौकशी केली आहे. यात बिलिंग सेक्शनमधील कर्मचार्‍यांच्या डिसिबल पॉइंट घेण्यात चूक झाल्यामुळे एवढे बिल दिले गेले. या प्रकरणी सुशील कोळी हा कारकून दोषी आढळल्यामुळे त्याला निलंबित केले आहे. दरम्यान, या बिलाची ऑनलाइन दुरुस्ती 7 मे रोजी करण्यात आली आहे. याला अप्रूव्हल मिळणे बाकी होते. त्यामुळे हे बिल ग्राहकांना न देता अप्रूव्हल आल्यानंतरच बिल देणे अपेक्षित होते, त्याआधीच बिल देण्यात आले. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे. याचा अहवाल लवकरच वरिष्ठांकडे सोपवण्यात येणार आहे, असे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले.


निलंबित केले तर गुन्हा का नाही?
पोलिस निरीक्षक लक्ष्मीनारायण शिनगारे यांनी नातेवाइकांना महावितरणचा कर्मचारी कोळी यांना निलंबित केल्याचे सांगितले. त्यावर जर चुकीमुळे कर्मचारी निलंबित केला तर त्यावर गुन्हा का नोंदविला जात नाही, असा सवाल नातेवाइकांनी उपस्थित केला. हा वाद सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होता. त्यानंतर नातेवाईक निवेदन घेऊन पोलिस आयुक्‍त कार्यालयात गेले. मात्र, तेथे वरिष्ठ अधिकारी उपलब्ध नसल्याने कोणाचीही भेट न घेताच शिष्टमंडळ घाटीत परतले.

दहा लाख नुकसान भरपाई द्या
जगन्नाथ यांचा बळी महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच गेला असून ते कुटुंबातील प्रमुख व्यक्‍ती होते. कमावता व्यक्‍ती गेल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यामुळे महावितरणने त्यांना दहा लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. तसेच, संबंधित दोषींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी त्यांचा भाऊ विठ्ठल शेळके यांच्यासह मनसेचे गौतम आमराव, आशिष सुरडकर, गजन गोंडापाटील व संकेत शेटे यांनी केली.


मृताच्या नातेवाइकांनी महावितरणच्या अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी कायम ठेवली. गुन्हा नोंदवून दोषीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाइकांचा पवित्रा कायम राहिल्याने गुरुवारी शवविच्छेदन झालेच नाही. सायंकाळी 6 वाजेनंतर पोलिसही घाटीतून निघून गेले. त्यामुळे आता शुक्रवारीच जगन्नाथ यांच्या मृतदेहाचे विच्छेदन होणार आहे. 

महावितरणचे वाढीव बिल आल्याने जगन्नाथ शेळके यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईक सांगत आहेत. आठ लाख 75 हजार 830 रुपयांचे बिल त्यांना आले होते. मात्र, त्यांनी वरिष्ठांकडे दाद मागितली की नाही याचा तपास सुरू आहे. पुंडलिकनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. - लक्ष्मीनारायण शिनगारे, पोलिस निरीक्षक, पुंडलिकनगर

दोषींवर लवकरच कठोर कारवाई 
या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य अभियंता सुरेश गणेशकर सर्वच बाजूने चौकशी करणार आहेत. त्यांच्या अहवालानंतर या प्रकरणात कर्मचार्‍यांपासून अधिकार्‍यांपर्यंत दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. 
- ओम प्रकाश बकोरिया, सहव्यवस्थापकीय संचालक, महावितरण

Tags : Suicide, Electricity Bill, Aurangabad