Thu, Mar 21, 2019 15:56होमपेज › Aurangabad › ‘विरोधकांना अर्थशास्त्राची पुस्तके देण्याची गरज’

‘विरोधकांना अर्थशास्त्राची पुस्तके देण्याची गरज’

Published On: Jun 16 2018 9:06AM | Last Updated: Jun 16 2018 9:06AMऔरंगाबाद : विशेष प्रतिनिधी

राज्यावर कर्जाचा डोंगर उभा असल्याची विरोधकांची भाषा दिशाभूल करणारी आहे. आर्थिक परिस्थिती कशी असते, हे समजण्यासाठी विरोधकांना अर्थशास्त्राची पुस्तके देण्याची गरज आहे, असा टोला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी शुक्रवारी (दि.15) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला.

ते म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 वर्षांच्या कालावधीपेक्षा युतीच्या साडेतीन वर्षांच्या काळात राज्याचा सर्वांगीण आर्थिक विकास झाला आहे. राज्याच्या सकल उत्पन्नात मोठी वाढ झालेली आहे. विरोधक राज्यावर कर्जाचा डोंगर असल्याचे वक्‍तव्य करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. 

मराठवाड्यात 1 ते 31 जुलै या कालावधीत दोन कोटी 91 लाख 74 हजार झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दली. औरंगाबाद जिल्ह्यास 44 लाख 44 हजार, तर नांदेड जिल्ह्यास 60 लाख 21 हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वृक्ष लागवडीच्या आढावा बैठकीनिमित्त शहरात आलेल्या मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. प्रशांत बंब, आ. अतुल सावे, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे,  विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर आदी या वेळी उपस्थित होते. वृक्ष लागवडीच्या माध्यमातून मराठवाडा हिरवागार करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. त्यासाठी ग्रीन आर्मी, इको बटालियन यांची स्थापना करण्यात आली आहे. यंदा जालना जिल्ह्यात 36 लाख 26 हजार, बीड जिल्ह्यात 26 लाख 6 हजार, उस्मानाबाद जिल्ह्यात 27 लाख 68 हजार, लातूर जिल्ह्यात 33 लाख 46 हजार, परभणी जिल्ह्यात 34 लाख 16 हजार, तर हिंगोली जिल्ह्यात 29 लाख 47 हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

सव्वा कोटी झाडे जिवंत

2016 या वर्षी मराठवाड्यात लावण्यात आलेल्या 54 लाख 19 हजार झाडांपैकी 39 लाख 50 हजार, तर 2017 या वर्षी लावण्यात आलेल्या 93 लाख 38 हजारांपैकी 75 लाख 63 हजार, अशी एक कोटी 15 लाख 13 हजार झाडे जिवंत असल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केला. वृक्षारोपणाची स्थिती पाहण्यासाठी नागपुरात कमांड रूमची स्थापना केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.

‘त्यांचे’च निस्तरत आहोत

विरोधकांनी 15 वर्षांच्या कार्यकाळात राज्याची तिजोरी रिकामी केली होती. त्यांनीच निर्माण केलेले प्रश्‍न आम्ही निस्तरत आहोत. विरोधकांनादेखील हेच हवे असल्याचे मुनगंटीवार यांनी 
स्पष्ट केले.